तृप्ती देसाईही गुन्हेगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2022   
Total Views |

trupti
कीर्तनकार पुरुष आणि महिलेच्या लैंगिक संबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाले. त्यावर समाजातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत तृप्ती देसाई यांनी म्हटले की, “लोक कीर्तनकारांच्या पाया पडतात. यांनीच असा निर्लज्जपणा केला. मी त्यांचा भांडाफोड करीन आणि कारवाईची मागणी करीन.” तृप्ती देसाई यांनी दिलेल्या धमकीमुळे या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या महिलेने घाबरून विष प्यायले. पुरुषाने असे कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून बंदोबस्त ठेवला गेला आहे. महिला आणि पुरुषाचे संबंध यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. कारण, सगळ्यांनाच तथागत बुद्धांची सम्यक् बुद्धी किंवा महान तपस्वी साधु-संताची इच्छा वासनेपलीकडची मोक्षप्राप्ती झालेली नाही. दोन वयस्क व्यक्तींनी स्वत:च्या संमतीने संबंध केले. अर्थात, समाजमनाच्या नीतिमत्तेत ते बसत नाही, हा भाग वेगळा. पण त्यानंतरही एक प्रश्न उरतोच की, या दोघांकडून समाजमान्यतेप्रमाणे वर्तन झाले नाही म्हणून त्यांना कुणीही घाबरवणे, त्यांच्या कुटुंबांची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, असे वर्तन आणि वक्तव्य करणे हे कोणत्या समाजमान्यतेत आहे? हे कोणत्या कायद्याशी संमत आहे? नीती-अनीती आणि कायदा-त्याची तत्त्वे ही माणसांसाठी की माणसं त्यांच्यासाठी, हा प्रश्न पुरातन आहे. या घटनेने समाजात चर्चा-विवादाला ऊत आला. पण ज्या समाजात बलात्कार, भ्रष्टाचार आणि खून केलेले लोकही खुशाल मंत्रीबिंत्री होतात. त्यांच्या मिरवणुका काढून जंगी सत्कारही लोक करतात. त्याच समाजात या घटनेबाबत (भलेही ती समाजमान्य नाही) इतके टोकाचे पाऊल? त्या व्हिडिओतील महिलेला विष प्यावेसे वाटले, यातच सर्व काही आले. यापुढच्या आयुष्यातही या दोघांना आणि घरादाराला काय भोगावे लागणार, याला शब्दच नाहीत. त्यांच्या चुकीचे प्रायश्चित असेल, असेही बहुतेकांचे मत असणार. पण दुसर्‍यांच्या वैयक्तिक जगण्याला विकृतपणे समाजात उघड करणे, हासुद्धा एक सामाजिक गुन्हाच आहे. त्यात जर त्या माणसांसंबंधित कोणत्याही कृत्यामुळे कुणाच्या जगण्याला बाधा येत नसेल, तर त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास उद्युक्त करणे, हा तर मोठा गुन्हाच. तृप्ती देसाईंच्या विधानामुळे त्या महिलेने विषप्राशन केले असेल, तर तृप्ती देसाई यासुद्धा गुन्हेगारच!
राहुल गांधी आणि मनोरंजन
“मी असतो तर त्यांना चाकू मारला असता. त्यांचा खून केल्यानंतर आत्महत्या कराययची होती,” इति पुरोगामी निधर्मी आणि सदासर्वदा गांधीजींच्या अहिंसेचा जप करणारे राहुल गांधी. मुळात राहुल गांधी यांच्या विधानांना तसे फारसे गंभीर घेऊ नये, हे सगळ्यांनाच पटते. पण ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नसतेच काळ सोकावतो’ हे महत्त्वाचे. या न्यायाने ‘आलूपासून सोना’ बनवण्याचा महत्त्वाचा शोध लावणार्‍या राहुल गांधींच्या म्हणण्याला महत्त्व नसले, तरी त्यामुळे राजकारणात गांधी घराण्याची तळी उचलणारे सोकावणार. ते तर प्रत्यक्ष राहुल गांधींपेक्षाही भयंकर बोलायला सिद्ध होतील, हे नक्की.उन्नावच्या ‘त्या’ प्रकरणात मागासवर्गीय समाजबांधवांशी संवाद संपर्काबद्दल बोलताना राहुल गांधींनी अशी चाकूची आणि खुनाखुनीची भाषा केली. त्यांच्या या वाक्यात काय नाही? दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. न्याय आणि कायदा-सुव्यवस्थेपेक्षा कायदा हातात घ्या, हिंसा करा, असा थेट संदेशही आहे. दुसरे असे की, ते असेही म्हणतात की, चाकू मारल्यानंतर आत्महत्या करायची होती. हा खरा राहुल गांधी टच. कारण, जर एखादी व्यक्ती प्रतिकार करण्यासाठी सबळ असेल, तर ती आत्महत्या का करेल? याचाच अर्थ ती व्यक्ती तेवढी समर्थ नसणारच? थोडक्यात, दुर्बल आणि हतबल असल्यामुळेच त्या व्यक्तीवर अन्याय होऊ शकतो. ही साधी बाबही राहुल यांना माहिती नसेल का? पण बोलायचे काहीतरी असा खाक्या असल्याने राहुल असेच काहीना काही बोलतात. त्यात ते ‘भगवा दहशतवाद’ ते ‘लोग मंदिर में लडकी छेडने जाते हैं’ असेही बिनदिक्कत म्हणून जातात. अर्थात, त्यांचाही एक विशिष्ट चाहतावर्ग आहेच म्हणा. पण तो त्यांना निवडणुकीत मत देत नाही इतकेच. पण यावरही राहुल यांची विशेष टिप्पणी आहे की, ते सत्तेच्या काळात जन्मले, पण त्यांचा जीव सत्तेत रमत नाही म्हणे. काय म्हणावे? पण लोकांचे म्हणणे आहे की, जर सत्तेत जीव रमत नसेल, तर मग जसा त्यांच्या ‘मातोश्रीं’नी सोनिया गांधींनी आतला आवाज ऐकून पंतप्रधान पद नाकारले होते म्हणे, तसेच राहुल यांनीही आतला आवाज ऐकावा.पण राहुल यांचे हे म्हणणेही असेच असावे. काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचे. त्यामुळे ऐकायचे आणि मनोरंजन करून घ्यायचे, इतकेच आपल्या हातात...
 
@@AUTHORINFO_V1@@