साहित्यप्रांतांत मुशाफिरी करणार्‍या लीला शहा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Apr-2022   
Total Views |

leela
आतापर्यंत ६७ पुस्तके प्रकाशित झालेल्या आणि गेल्या ५० वर्षांपासून साहित्याच्या विविध प्रांतांत नियमित लिखाण करीत असलेल्या लीला शहा यांच्याविषयी जाणून घेऊया...
 
साहित्याच्या विविध प्रांतांत मुशाफिरी करणार्‍या डोंबिवलीतील लेखिका लीला शांताकुमार शहा यांच्या एकूण ३२ पुस्तकांचे प्रकाशन ‘अरिहंत’ प्रकाशनाने जानेवारीमध्ये केले. ‘लिम्का बुक ऑफ रेकार्ड’मध्येसुद्धा केवळ २२ पुस्तके एकाच प्रकाशनाने केली असल्याची नोंद आहे. पण लीला यांनी सध्या तरी ‘लिम्का बुक’साठी कोणताही प्रयत्न केला नाही. लीला यांच्या साहित्यप्रवासाविषयी जाणून घेऊया. लीला शहा यांचे संपूर्ण बालपण श्रीक्षेत्र तुळजापूर येथे गेले. त्यांच्या गावात चौथीपर्यंत शाळा होती. त्यामुळे गावातील सरकारी शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतरच्या शिक्षणासाठी त्यांना सोलापूरची वाट धरावी लागली. सोलापूरमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्याने त्या घरात राहूनच अभ्यास करीत असत. केवळ एक ते दोन महिने नातेवाईकांकडे राहून शाळेत जात असत. ज्या संस्थेत त्यांनी प्रवेश घेतला होता, त्याठिकाणी वसतिगृहाचीदेखील व्यवस्था होती. मात्र, त्या संस्थेत गरीब मुलींना जास्त काम करायला सांगितले जात होते. त्यामुळे एका मुलीला कमी गुण मिळाले होते. मुलींना जास्त काम लावले जात असल्याने कमी गुण मिळाले असल्याचे सांगत त्याविरोधात लीला यांनी बंड पुकारले.
 
 
 
लीला यांनी शाळेच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतल्याने त्यांचे नाव शाळेतून कमी केले. त्यानंतर ‘सरस्वती विद्यामंदिर, सोलापूर’ येथे त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. केशवसुतांचे पुतणे द. मो. दामले हे या शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांनी लीला यांच्या वडिलांची समजूत काढली. आता बोर्डाची परीक्षा असल्याने तिने नियमित शाळेत आले पाहिजे. त्यासाठी तिची सोलापूरमध्ये राहण्याची व्यवस्था करा, असे सांगितले. अकरावी झाल्यानंतर काही वर्षे लीला यांनी घरीच अभ्यास केला. लहान वयातच लीला यांचा विवाह झाला. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण अर्धवट राहिले. १९५३ साली लीला यांचा विवाह झाला आणि त्या मुंबईत आल्या. त्यांना गुजराती, मराठी भाषा येत होत्या. लहानपणापासूनच लिखाणाचा त्यांना छंद होता. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. त्यांच्या त्या कवितेचे सर्वांनी कौतुक केले. लीला यांचे आजोबा, मामा कवी होते. पणजोबा कवी आणि कीर्तनकारदेखील होते. तसेच त्यांच्या आई यादेखील उत्तम कवयित्री आणि कीर्तनकार होत्या. त्यामुळे साहित्यिक वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. साहित्याचे बीज त्यांच्यातही रूजत होते. लीला यांच्या घरी ग. दि. माडगूळकर, व. पु. काळे यासारख्या अनेक लेखक, साहित्यिक येत होते. त्यांचे बालपण त्यांच्या सान्निध्यात गेले. तसेच सिंधुताई सकपाळ, जलपुरूष राजेंद्र सिंह यांचेदेखील त्यांच्या घरी येणेजाणे होते.
 
लीला यांच्या पहिल्या पुस्तकाला कुसुमाग्रजांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांचे पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित झाले आहे. पहिल्या कादंबरीला विजय तेंडुलकरांची प्रस्तावना, पहिल्या कथासंग्रहाला यु. म. पठाण यांची प्रस्तावना, कवितासंग्रहाला द. भा. धामणस्कर यांनी प्रस्तावना दिली आहे. आतापर्यंत त्यांची ६७ पुस्तके प्रकाशित झाली आहे. गेल्या ५० वर्षांपासून त्या नियमित लिखाण करीत आहेत. अनेक दर्जेदार मासिकातून कथा, कविता, कादंबर्‍या, अनेक ललितलेख प्रकाशित झाले आहेत. लीला यांनी रागदारीवर चाली लावून गीतज्ञानेश्वर, गीत महावीर, गीत बाहुबली, भजन यांचे अनेक कार्यक्रम कथाकथन, कवितावाचन, व्याख्यानाचेही अनेक जाहीर कार्यक्रम झाले आहेत. ‘नर्मदेच्या क्षितिजापार’ या कादंबरीची अंधांसाठी ‘ऑडिओ कॅसेट’ त्यांनी तयार केली आहे. मराठी इतिहास संशोधन मंडळात त्या सदस्या आहेत. ‘श्रविका’ मासिकाच्या संपादक मंडळावर ३० वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. लीला यांच्या अरिहंत प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ३२ पुस्तकांमध्ये भजन, दोन पदार्थांची पुस्तके, छोट्यांची २२ पुस्तके, चरित्रगीते यांचा समावेश आहे.
 
लीला यांना वाचन आणि लिखाणाचा छंद आहे. त्यांना प्रवास करायला आवडते. शास्त्रीय संगीत आणि नृत्याचीदेखील त्यांना आवड आहे. माणसे जोडणे त्यांना आवडते. ‘अखिल भारतीय जैन मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी २०१७ मध्ये भूषविले आहे. लीला यांच्या दोन ते तीन कथा या गुजराती भाषेतदेखील भाषांतरित करण्यात आल्या आहेत. त्यांच्या साहित्याची चोरी होण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यापैकी ‘चांदणेस्पर्श’ ही कविता ‘अक्षर’ दिवाळी अंकात छापून आली होती. सुनीता अपशंकर यांनी ती कविता छापली होती. लीला यांनी खडसावल्यानंतर त्यांनी माफीपत्र ही लीला यांना पाठविले. त्यानंतर एका अकलूजच्या संस्थेनेही त्यांच्या साहित्याची चोरी केली आहे. पण त्याठिकाणी जाऊन पाहिल्यास त्या संस्थेचे कार्यालय त्याठिकाणी आढळून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
‘ढगांच्या देशात दीपू’, ताराबाई मोडक बालसाहित्य पुरस्कार, ‘अल्बर्ट श्वाईटझर’, ‘डॉ. राजेंद्रसिंह’, ‘कविता पर्यावरणाच्या आणि नवविचारांच्या...’ या पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मयाचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी जैन साहित्य परिषेदेचे चार वेळा पुरस्कार, बालकुमार साहित्य संमेलन, ‘त्याचे नाव होते कार्व्हर’ या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे. कोमसापचा ‘साहित्यसेवा पुरस्कार’ त्यांना मिळालेला आहे. अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. या हरहुन्नर लेखिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@