नवी दिल्ली: केरळमधील नन बलात्कार प्रकरणात बिशप फ्रँको मुलक्कल याची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला पीडित ननने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.पीडितेने केरळ उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील केले. या खटल्यात अपील दाखल करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने निकालाच्या तारखेपासून ९० दिवसांची मुदत दिली होती. राज्य सरकारने अपीलात म्हटले आहे की, पीडितेने दिलेले पुरावे, अनेक साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे हे दर्शवितात की, बिशप फ्रँको मुलक्कलने बलात्कार केला होता.
केरळ सरकारने असेही म्हटले आहे की, फिर्यादीने सादर केलेले पुरावे तपासल्याशिवाय, खटल्याच्या न्यायाधीशांनी पूर्वनियोजित विचारांच्या आधारे निर्णय दिला. पुराव्यांचा चुकीचा विचार करून पीडितेची बदनामी करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला. ५७ वर्षीय मुलक्कलने २०१४ ते २०१६ या कालावधीत अनेकदा आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप ननने केला होता. मुलक्कल त्या कालावधीत रोमन कॅथलिक चर्चचे जालंधर बिशप होते. मात्र, त्याविरोधात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फादर बिशप फ्रँको मुलक्कल याची निर्दोष मुक्तता केली होती.