कोरोना महामारीपूर्वी ‘वर्क फ्रॉम होम’ या काहीशा मर्यादित संकल्पनेने आता सर्वच क्षेत्रात व्यापक स्वरुप धारण केलेले दिसते. परंतु, या कामकाज पद्धतीचा बर्याच क्षेत्रांमध्ये आजही अवलंब सुरु असला तरी त्याचे फायदे-तोटे लक्षात घेऊन संस्थांनी त्याअनुसार योग्य ते बदल करणे, धोरणनिश्चिती करणे क्रमप्राप्त ठरावे. त्याविषयी सविस्तर...
घरी बसून अथवा ऑफिसपासून दूर राहून कामकाज करण्याचे बदल कोरोना महामारीनंतर आता सर्वांच्या माहितीचेच नव्हे, तर अगदी सराव-सवयीचे झाले आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या कामकाजबंदीपासून विभिन्न नियंत्रणांवर व्यावसायिक गरजा व ग्राहकांसह कर्मचार्यांचे हित साधण्याची सांगड कंपन्यांपासून कर्मचार्यांपर्यंत सर्वांनीच घातलेली दिसून गरज होती. यातूनच लवचिक कामकाज, घरून काम करणे , सरमिसळ पद्धतीसह व एवढेच नव्हे, तर दुरून काम करणे हे कामकाजी टप्पे कसे विकसित झाले, ते पाहणे लक्षणीय ठरते. हे काम अर्थातच तसे आव्हानात्मक होते. मुख्य म्हणजे, अशा काम करण्याच्या वातावरणाचा सराव वा सवय तशी कुणालाच नव्हती. शिवाय अशा व्यवस्थापन शैलीचा अनुभवसुद्धा नव्हता. कामाच्या ठिकाणी व कामाच्या संदर्भात परस्पर संपर्क-संवाद ही तशी नित्याची कामकाज पद्धत. त्याचे परंपरागत फायदे सर्वांच्या माहितीचे-फायद्याचे. वर्षांनुवर्षे अशा प्रकारे काम करणार्या कंपन्या व कर्मचारी या उभयतांपुढे म्हणूनच या महामारीने मोठे आव्हान उभे केले होते.
विख्यात ‘एचआर’ व्यवस्थापन सल्लागार ‘कंपनी पर्सर’ने या संदर्भात केलेल्या अभ्यासानुसार ‘कोविड-१९ व त्यानंतरच्या काळात सुमारे ४० टक्के कंपन्यांपुढे कोणती व कशा प्रकारची कामकाज पद्धती विकसित करायची व स्वीकारायची यासंदर्भात संकटसदृश स्थिती निर्माण झाली होती. ‘पर्सर’च्या अभ्यासामध्ये या मोठ्या व्यावसायिक संकटावर तोडगा काढून मात करणे व कोरोनाच्या दीर्घकालीन व संभावित आव्हानावर ज्या प्रकारे मात केली गेली, त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना गरजेनुरूप कल्पकतेची जोड दिली गेली व म्हणूनच अशक्य बाब शक्य होऊ शकली. सकृतदर्शनी पाहता, कामाची दैनंदिन पद्धत म्हणून दुरून काम करताना थेट संवाद-संपर्क यांचा अभाव असतो. कामाच्या संदर्भात अधिकारी-सहकारी व इतर संबंधितांमध्ये संवादाची आवश्यकता ही असतेच. या संवाद-संपर्कामुळे काम आणि व्यवहारात सुलभता न सहजता उपलब्ध होत असते. त्यामुळे कामाला उत्पादकतेची जोड मिळते. परस्पर मार्गदर्शन-मदत मिळू शकते. याउलट ऑनलाईन वा दूरस्थ पद्धतीने काम करताना या सार्या बाबी उपलब्ध नसतात. या व्यावहारिक मर्यादा मुळातून समजून घेऊन त्यानुरूप व्यवस्था करणे आवश्यक व फायदेशीर ठरते.
त्यामुळे ज्या ठिकाणी सध्या वा भविष्यात दीर्घकाळपर्यंत दूरस्थ किंवा घरातून काम करण्याचा विचार असेल अथवा ज्याठिकाणी सध्याही दूरस्थ कामकाज पद्धतीचा अवलंब करण्यात येत असेल, तर अशा ठिकाणी काही मूलभूत व महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक ठरते. या आवश्यक बाबींमध्ये कामासाठी आवश्यक तंत्रज्ञान सक्षम संवादक्षमता, सहकार्यावर आधारित समन्वय, कामाचे प्राधान्य, ऑनलाईन नियोजन व त्याची अंमलबजावणी इ. चा समावेश करणे अपरिहार्य ठरते. थोडक्यात व तपशिलासह सांगायचे म्हणजे, संगणकीय तंत्रज्ञानासह प्रसंगी दीर्घकाळापर्यंत काम करण्यासाठी आवश्यक मूलभूत सेवा उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. नव्या दूरस्थ कामकाज पद्धतीमध्ये ही बाब मूलभूतरित्या आवश्यक ठरते. बदलत्या व बदलणार्या कार्यपद्धतीचा सर्वांना परिचय व सराव करणे आणि करवून घेणे अधिकारी व कर्मचारी उभयंतासाठी समान स्वरुपात आवश्यक आहे.
या तांत्रिक व कार्यपद्धतीविषयक बाबींना मानवीय पैलूंची जोड दिल्यास ही नवी कार्यपद्धती यशस्वी होऊ शकते. दूरस्थ कामकाज पद्धतीचे मूलभूत यशच मुळी या मुद्द्यावर अवलंबून असते. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी व कामकाज करताना एकमेेकांशी थेट व प्रत्यक्ष संवाद, विचार-मुद्द्यांची देवाणघेवाण, मार्गदर्शन, प्रसंगी समस्यांची सोडवणूक यामुळे कामकाज सुसह्यच नव्हे, तर आनंदी व उत्पादकसुद्धा होऊ शकतात. यापैकी काही मुद्द्यांची जरी अंमलबजावणी होऊ शकली तरी सद्यःस्थितीत ते निश्चितच महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी कार्यसंस्कृती व वैयक्तिक आणि एकत्रित मानसिकता सांभाळणे कामाला नेहमीच पूरक ठरते. सध्याच्या प्रत्यक्ष वा दूरस्थ-प्रत्यक्ष अशा संमिश्र वा विविध प्रकारच्या कार्यपद्धती असो, बदलत्या काळानुरूप विकसित व प्रचलित झालेल्या कामकाज पद्धतींना काम करणार्यांच्या मानसिकतेची काळजी घेणे अवश्यक ठरते. या मानसिकतेचा थेट संबंध सर्वांचा कामाच्या ठिकाणाच्या साद-प्रतिसादावर अवलंबून असतो, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
कार्यसंस्कृतीची निवड व त्याचा अवलंब ही बाब दूरस्थ कामकाजात पूरक ठरते. या नव्या व लवचिक कार्यपद्धतीत कामाच्या पद्धती म्हणजेच कार्यसंस्कृती कशी असावी ते स्थानिक स्तरावर ठरविणे योग्य ठरते. नेमक्या गरजा व काम आणि कर्मचार्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक गरजांची पूर्तता करण्याचे काम कार्यसंस्कृती करू शकते. त्यामुळे या नव्या व आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून यशस्वी होण्यासाठी संबंधित कंपनी वा व्यवसाय क्षेत्रानुरूप कार्यसंस्कृतीचा विकास करण्याची नवी गरज निर्माण झाली आहे. दूरस्थ-प्रत्यक्ष अथवा संमिश्र यापैकी एक अथवा या विविध कार्यपद्धतींवर आधारित कार्यपद्धती लवचिक व स्थानिक गरजांची पूर्तता करताना इतर बाबी वेगवेगळ्या असल्या तरी त्याला आपसात व परस्पर विश्वासाची जोड मिळणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. विशेषत: एकमेकांच्या परोक्ष व प्रत्यक्ष संवाद-संपर्क नसताना परस्पर व आपसातील विश्वास हा असा मुद्दा ठरतो. ज्यामुळे या नव्या व आवश्यक कामकाज पद्धतीने यशापयश अवंलबून असते.
कामकाजाच्या दृष्टीने अधिकांश वेळी वरिष्ठ अधिकार्यांचे त्यांचे सहकार्यांवर नियंत्रण राहणे आवश्यक असते. अनेक अधिकारी कर्मचार्यांना, तर अशा नियंत्रणावर आधारित पद्धतीनेच काम करण्याची सवय असते. अशांसाठी या नव्या कार्यपद्धतीचा विकास करताना प्रत्येक सूचना-व्यवहारांचा आधार स्वतःसह परस्पर विश्वासावर आधारित कार्यपद्धतीचा विकास करून त्यांचा पुरेपूर अवलंब करणारे नेतृत्व व सहकारी असा ताळमेळ होणे, नव्या कामकाजाच्या यशस्वितेसाठी आवश्यक आहे व त्यादृष्टीने प्रयत्नांना साथ घायला हवी. यासंदर्भात सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, दूरस्थ पद्धतीने कामकाज करण्याची पद्धत यशस्वी होण्यासाठी संबंधित कंपनी व कामकाजानुसार नेमक्या व उपयुक्त पद्धतीचा अवलंब करायला हवा, यामध्ये कामकाजाचे स्वरुप, प्राधान्य, समस्यांची सोडवणूक, उपयुक्त संवाद, मार्गदर्शन, परस्पर विश्वास व काम करण्याची खात्री, प्रयत्यांची उपयुक्तता, व्यावसायिक गरजांनुरुप कार्यसंस्कृती, कामाची नेमकी व लवचिक पद्धती इ.वर भर देणे महत्त्वाचे ठरते.
दूरस्थ काम करण्याच्या पद्घतीला अधिक व्यापक व उपयुक्त स्वरुप देण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करून त्यावर मात करणे आवश्यक ठरते. यावरच या नव्या कामकाज पद्धतीचे यश अवलंबून आहे. सद्यःस्थितीचा विचार करता मर्यादित असो वा स्थायी स्वरुपात, पण दूरस्थ काम करण्याचा अवलंब करणे आता अपरिहार्य ठरले आहे. त्याचे स्वरुप वेगळे असेल, गरज मात्र सर्वमान्य ठरली आहे. यातूनच एक वेगळी कार्यसंस्कृती आता विकसित झाली आहे. औद्योगिक क्षेत्राचा यशस्वी विकास त्यावर अबलंबून आहे. एका वेगळ्या व आव्हानपर परिस्थितीत अनुभवी अधिकारी-कर्मचार्यांनी ज्या निर्धाराने व कल्पकपणे या नव्या कार्यपद्धतीचा शोध घेतला व विकास केला ती यशोगाता पुढे अनेकांना अनेकार्थांनी मार्गदर्शक ठरेल.
दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन सल्लागार आहेत.)