वय लहान, कर्तृत्व महान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2022   
Total Views |
 

ashwini adhav 
 
 
वय लहान असले, तरी इच्छाशक्तीच्या बळावर मोठमोठी कामेही लिलया केली जातात. नाशिकमधील सेवाव्रती अश्विनी आढाव यांच्याकडे पाहिले की, त्याची खात्री पटते. वयाच्या अवघ्या २०-२१व्या वर्षी त्यांनी अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी आणि कुटुंबीयांनी सोडून दिलेल्या वा रस्त्यावरील बेवारस आजी-आजोबांना आईच्या मायेने सांभाळण्यासाठी ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’ची स्थापना केली. जाणून घेऊया त्यांच्या याच कर्तृत्वाबद्दल...
 
 
प्रवाहाविरोधात चालण्याची ताकद असली की, वयाचा मुद्दा गौण ठरतो आणि अगदी लहानपणीच अवघ्या जगाला अचंबित करणारे काम व्यक्तीच्या हातून घडते. घरचा वा बाहेरचा, कोणाचेही आर्थिक पाठबळ नसताना गंभीर व्याधीग्रस्त रुग्ण आणि बेवारस आजी-आजोबांचा मायेने, प्रेमाने सांभाळ करणार्‍या फक्त २४ वर्षे वयाच्या अश्विनी आढाव यांच्या कर्तृत्वाकडे पाहिले की, वरील विधानाची खात्री पटते. ज्या वयात मुला-मुलींना स्वतःचे भविष्य घडवण्याचीही समज नसते, त्या वयात अश्विनी आढाव यांनी थेट दुसर्‍याची सेवा करण्याचा, आजी-आजोबांचीच आई होण्याचा वसा घेतला. वयाच्या २०-२१व्या वर्षी २०१९ साली अश्विनी आढाव यांनी ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’ची स्थापना केली आणि त्यातूनच ‘जे का रंजले गांजले। त्यासि म्हणे जो आपुलें॥ तो चि साधु ओळखावा। देव तेथें चि जाणावा॥’ हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग प्रत्यक्षात आल्याचे पाहायला मिळाले.
 
अश्विनी आढाव यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातला. घरची गरिबी, त्यातच लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले. त्यानंतरही जिद्दीने शिक्षण पूर्ण करता करताच त्यांनी नाशिकमध्ये परिचारिका अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच दरम्यान परिचारिकेचे काम करत असल्याने अश्विनी आढाव यांचा दररोजच वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांशी संपर्क यायचा. अंथरुणावरील, स्वतःच्या हाताने कसलेही काम करू न शकणारे कित्येक रुग्ण दिवसभर रुग्णालयात एकेकटे असायचे. त्यावेळी अश्विनी आढाव यांच्या मनात विचार आला की, या रुग्णांचे कोणी जवळचे नाहीत का, कोणी घरातले त्यांच्यासाठी थांबत नाहीत का? अर्थातच, संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांना वैयक्तिक, सांसारिक, व्यावहारिक जबाबदार्‍यांमुळे रुग्णालयात थांबता येत नसेल.
 
पण, मग आपणच अशा रुग्णांसाठी पुढाकार घेऊन आधार दिला तर? या विचारातूनच अश्विनी आढाव यांनी इगतपुरी येथे ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’ची सुरुवात केली. पण, त्यांना ना कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला ना सहकार्य. कुटुंबीयांनी त्यांच्या या कल्पनेला सातत्याने विरोधच केला. पण, तरीही अश्विनी आढाव यांनी आपला मार्ग सोडला नाही, रुग्ण आणि बेवारस आजी-आजोबाच त्यांचे कुटुंब झाले.
 
दरम्यान, सध्या ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’चे संपूर्ण काम नाशिक शहरातून चालते. प्रारंभी त्यांच्या वृद्धाश्रमात एक आजी होत्या, जवळपास दोन महिन्यांपर्यंत अश्विनी आढाव यांनी त्यांचा सांभाळ केला. पण, नंतर मात्र रुग्णांची संख्या वाढत गेली. त्या रुग्णांच्या अंघोळीपासून वेणी-फणी, कपडे घालणे, जेवण, ‘डायपर’ बदलण्यासारखी कामे अश्विनी आढाव स्वतःच करू लागल्या. कारण, सर्वच रुग्ण अंथरुणाला खिळलेले, स्वतः काही करु न शकणारे होते. रुग्णांना सांभाळतानाच समाजात रस्त्यावर, चौकात, बाजारात कुठेही बेवारस स्थितीत आढळणार्‍या वृद्धांचा प्रश्नही समोर आला. त्यावेळी अश्विनी आढाव यांनी त्यांनाही सांभाळण्याचा निर्णय घेतला. आज ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’त १७ रुग्ण आणि बेवारस व्यक्तींची काळजी घेतली जाते. स्वतःच्या संसाराची स्वप्न पडतात, त्या इवल्याशा वयात अश्विनी आढाव इतक्या जणांचा सांभाळ करतात, हे कौतुकास्पदच! इथे सोळाया वर्षी ज्ञानेश्वरी लिहिलेल्या, १6व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणार्‍या शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अश्विनी आढाव ही महाराष्ट्रकन्या आज त्यांच्याच विचारांवर चालत असल्याचे दिसून येते.
 
दरम्यान, आश्रमात रुग्ण वा बेवारस व्यक्ती कशाप्रकारे येतात? तर बर्‍याचदा एखाद्या घरातील मुलगा वा मुलगी आपल्या आई-वडिलांना ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’त दाखल करण्यासाठी संपर्क साधतात. त्यात पक्षाघात झालेले रुग्ण व इतर व्याधीग्रस्त असतात. त्या रुग्णांच्या दैनंदिन गरजांसाठी, गोळ्या-औषधांसाठी संबंधित मुलगा वा मुलगी दर महिन्याला साधारण चार ते पाच हजारांपर्यंत पैसे देतात. ज्यांना मुलगा-मुलगी कोणीही नाही, त्या रुग्णांचा, बेवारस आजी-आजोबांचा मुद्दा वेगळा आहे. त्यांचा ठावठिकाणा बर्‍याचदा समाज माध्यमांतून वा कोणीतरी थेट आश्रमाला दूरध्वनीद्वारे संपर्क केल्याने समजतो. पण त्यांना थेट आश्रमात आणता येत नाही, तर त्यासाठी संबंधित ठिकाणच्या पोलीस ठाण्यात आश्रमाचा ‘फॉर्म’ भरून द्यावा लागतो, व्यक्ती बेवारस असल्याचे सांगावे लागते, व्यक्तीचा सांभाळ करण्यासाठी आश्रमात घेऊन जात असल्याचे नमूद करावे लागते. त्यानंतर संबंधित बेवारस व्यक्तीला ‘सुखाश्रेय’चा आसरा मिळतो.
 
‘सुखाश्रेय वृद्धाश्रम’ असल्याने इथे वृद्ध व्यक्ती, आजी-आजोबाच असतात. जन्माला आला तो मृत्यू पावणार, हे अंतिम सत्य आहे अन् अशा रुग्ण वा आजी-आजोबांचे अंतिम संस्कारही ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’द्वारे केले जातात, त्यात अश्विनी आढाव स्वतः भाग घेतात, स्मशानभूमीत जाऊन वारसाची भूमिका पार पाडतात. त्यांनी आतापर्यंत ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’तील सहा-सात जणांचा अंत्यविधी केला आहे.
 
 
दरम्यान, ‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’चे काम करतानाच अश्विनी आढाव यांचे लक्ष घोटीजवळील वनवासी पाड्यांवरच्या वंचित मुलांकडेही गेले. त्यांच्यासाठी काही करावे, असे त्यांनी ठरवले आणि त्यातूनच वस्त्रदानाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. मुंबई परिसरातील अनेक घरांतील मुले-मुली एक-दोनदा कपडे वापरले की, ते परत वापरतही नाहीत. असे कपडे गोळा करून वनवासी पाड्यांवरील मुला-मुलींना देण्याचे अश्विनी आढाव यांनी ठरवले आणि त्या दर अडीच-तीन महिन्यांनी त्या मुला-मुलींना कपडे देऊ लागल्या. कोरोनाच्या काळात सारीकडेच येण्या-जाण्याचे निर्बंध असल्याने गेल्या दीड वर्षांत सातत्याने वनवासी पाड्यांवर जाणे त्यांना शक्य झाले नाही, पण यापुढे निर्बंध मुक्ती झाल्यानंतर त्या पुन्हा आपले काम सुरू करतील. दरम्यान, आश्रमात सातत्याने नवनवीन रुग्ण, बेवारस आजी-आजोबा दाखल होत असतात. त्यातले अनेक जण जवळचे कोणीही नातेवाईक, मुलगा वा मुलगी नसलेलेही असतात. त्यावेळी त्यांच्या खर्चाचा प्रश्न येतो.
 
तो समाजाकडून मिळणार्‍या देणगीद्वारे भागवण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते पुरेसे ठरत नाही. आश्रमाला ‘८० जी’ प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने देणगीदारही मोठ्या प्रमाणावर देणगी देत नाहीत, सरकारी अनुदानही मिळत नाही. वाढदिवस, वर्षश्राद्ध, विवाहासारख्या प्रसंगी कोणी अन्न-धान्य, कपडे, खाऊच्या वस्तू वगैरे देतात. पण, बाकीचा खर्च अश्विनी आढाव यांनाच कसातरी उचलावा लागतो. त्यातच सध्याचा आश्रम भाड्याच्या जागेत असल्याने त्याचे भाडेही द्यावे लागते. तरीही अश्विनी आढाव आपले सेवाव्रत निष्ठेने निभावत आहेत. भविष्यात बेवारस आजी-आजोबांसाठी आश्रमाकडे स्वतःची जागा असावी, त्या ठिकाणी स्वतःची आश्रमाची इमारत बांधावी, असे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी अश्विनी आढाव यांना शक्ती मिळो आणि त्यांच्या माध्यमातून गंभीर व्याधीग्रस्त, बेवारस आजी-आजोबांना कायमचा निवारा मिळो, ही सदिच्छा!
 
‘सुखाश्रेय वृद्धाश्रमा’तील एका वृद्ध आजी-आजोबा दाम्पत्याने अश्विनी आढाव यांचे आपल्यासारख्या रुग्ण व बेवारसांचा सांभाळ करणारे सेवाकार्य पाहून त्यांच्यावर ‘मी देव पाहिला’ असा लेख लिहिला होता. तो लेख वाचल्यानंतर अश्विनी आढाव यांना आपण करत असलेल्या कामाच्या मोठेपणाची जाणीव झाली, तसेच काम करण्यासाठी आणखी हुरुप आला, त्यातील आजी-आजोबांच्या भावनाच अश्विनी आढाव यांच्यासाठी दररोज काम करण्याची प्रेरणा ठरल्या. - अश्विनी आढाव
 
 
@@AUTHORINFO_V1@@