गुरु बिन कौन बतावे बाँट...

    01-Apr-2022
Total Views |
devbai
 
 
गेली पाच ते सहा दशके नृत्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेल्या, नुकतेच ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मानित अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. मंजिरी देव. त्यांच्या नृत्याविष्कारावर प्रकाश टाकणारा हा लेख...
डॉ. मंजिरी देव यांचे बालपण कोल्हापूरात गेले. कोल्हापूरला तसे नृत्याला पोषक, प्रोत्साहित करणारे वातावरण नव्हते. त्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीने नृत्य शिकण्याची काय गरज, असा समज. त्यामुळे अशा प्रतिकूल वातावरणातही आपल्या आईच्या सामाजिक दृष्टिकोनामुळे, अभ्यास आणि वाचनाच्या आवडीमुळे मंजिरी नृत्याविष्काराकडे वळल्या. नृत्यासारखी सुंदर शैली नाही, शास्त्रीय कला अवगत असणे महत्त्वाचे, या त्यांच्या आईच्या प्रभल्भ विचारांमुळे मंजिरी यांची पावलं नृत्याकडे वळली. आणि त्यात भर म्हणून बालवाडीतील वयातच आपली मुलगी इतकी सुंदर नृत्य करते, या आनंदामुळे नृत्याचे घुंगरू त्यांच्या मनात झंकारले. नव्याने कोल्हापूरात सुरू झालेल्या पं. बद्रीनाथ कुलकर्णी यांच्या ‘प्रकाश नृत्य कलामंदिरा’त कथ्थक आणि भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेण्यास मंजिरी यांनी सुरुवात झाली.
 
 
एका गुरूकडे निष्ठेने शिकावे, त्याची शैली पूर्णपणे आत्मसात करावी, असा विचार असलेल्या देवबाईंचे योगायोगाने चार गुरू होते. सुरुवातीस कोल्हापूरात असताना पं. बद्रीनाथ कुलकर्णी यांच्याकडे त्यांचे नृत्यशिक्षण झाले. परंतु, 1968 साली मंजिरी देव यांचे लग्न झाल्यानंतर त्या ठाण्यात स्थायिक झाल्या आणि कोल्हापूरात उत्तम नृत्यांगना असलेल्या त्या चक्क आठ वर्षं नृत्यापासून लांब राहिल्या. परंतु, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आशाताई जोगळेकरांमुळे नृत्यानंद अवतरला. जोगळेकर यांच्यासारख्या अत्यंत शिस्तप्रिय, प्रामाणिक आणि सर्वांग सुंदर नृत्य करणार्‍या गुरू त्यांना लाभल्या. आशाताईंनी देवबाईंच्या नृत्यकलेची रुजवात तर केलीच, शिवाय त्यांच्या नृत्यसाधनेला, आपल्या विद्यार्थ्यांना वंदनेनंतर ‘थाट ते बाँट’ कसे शिकवावे, याची शिस्त देवबाईंना आशाताईंमुळे लागली. त्यानंतर देवबाईंचे सुपुत्र तालमणी पं. मुकुंदराज देव लहान असताना गोपींचे बंधू पं. ब्रीजराज मिश्रा यांच्याकडे तबला शिकायला जात. त्यावेळी बाई स्वतःहून मुकुंदराज यांना सात-आठ वर्षे त्यांच्याकडे घेऊन जात. तेव्हा ‘पद्मश्री’ पं. नटराज गोपीकृष्ण महाराज मंजिरी देव यांना म्हणाले की, “अरे तुम भी नृत्य करती हो ना, तो नाच!!’ परंतु, गोपींची फी किती असेल, आशाताईंकडे नृत्य शिकत असल्यामुळे गोपींकडे शिकले, तर ताई नाराज होतील की काय, या भीतीने मंजिरी हे धाडस करत नव्हत्या. परंतु, ही गोष्ट त्या महान गुरूंना (आशाताईंना) कळल्यानंतर, “आधी घुंगरू बांधून महाराजांसमोर उभी राहा, नंतरच माझ्यासमोर ये,” असे म्हणत आशाताईंनी मंजिरी देव यांना प्रेमाने खडसावले. गुरूंचा मोठा आदर्श आणि माझी शिष्या माझीच राहील, याबद्दलची ताईंची खात्री या दोन्ही गोष्टींमुळे बाईंचे गोपींकडेदेखील शिक्षण सुरू झाले. गोपीजींची शैली शिकणे म्हणजे अहोभाग्यच! आनंदाचा, उत्साहाचा, चैतन्याचा सागरच ते! आणि जवळजवळ सहा वर्षं गोपीजींकडे मंजिरी नृत्य शिकल्या. आशाताईंकडून त्या परीक्षेचे, विद्यार्थ्यांसाठीचे नृत्य शिकल्या, तर महाराजांकडून सादरीकरणाचे नृत्य त्यांनी आत्मसात केले. सितारादीदींनीदेखील गोपीजींची ‘शागीर्द’ म्हणून काही चीजा-बंदिशी त्यांना शिकवल्या. गोपीजींच्या निधनानंतर ‘पुरुदाधीचजीन’सारख्या चालत्या-बोलत्या ग्रंथालयाचा गुरू रुपात प्रवेश झाला.
 
 
कथ्थक नृत्यात डॉ. मंजिरी देव यांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. श्रीराम देव यांच्याशी लग्न होऊन ठाण्यात आल्यानंतर जवळजवळ आठ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा नृत्य शिकण्यास सुरुवात केली. नृत्यकला प्रवाही ठेवण्यासाठी स्वतः ‘श्री गणेश नृत्यकलामंदिरा’ची स्थापना करून शेकडो विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे शिक्षण दिले. पण, त्यांना जाणवले की, नृत्य नुसते शिकवून फायदा नाही, तर विद्यार्थ्याला नृत्यातून किंवा शास्त्रीय कलेतून समृद्ध होता आले पाहिजे. नृत्य ही फक्त हौसेची गोष्ट नाही, तर अभ्यासाची गोष्ट आहे, हे सांगण्यासाठी कथ्थकवरील पुस्तकांची आवश्यकता होती, मातृभाषेत पुस्तके यावीत, तसेच नृत्य, वादन, संगीत याबरोबरीने व्याख्याने व्हावीत, संशोधन व्हावे, ही आस्था त्या गुरूंच्या मनात निर्माण झाली. या नृत्यसाधनेचा जर उपयोग करता आला, तर बौद्धिक साधनेबरोबर कलासाधना देखील प्रगल्भ होईल, हे आश्वासन त्यांना नेहमी वाटत असे. तसेच, नृत्य ही दृक्श्राव्य कला आहे. नृत्य करण्याचा जसा रियाज हवा, तसा बघण्यासाठीचादेखील एक रियाज हवा, त्याची वेगळी साधना हवी आणि ती साधना या पुस्तकांतून, व्याख्यानांतून विकसित होऊ शकते आणि त्यामुळे मंजिरी देव या नृत्यसाहित्याकडे देखील वळल्या. एवढेच नाही, तर त्यांच्या ‘नृत्यसौरभ’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कारदेखील प्राप्त झाला आहे.
 
 
नृत्यकला ही केवळ मनोरंजन करणारी कला नाही, तर ती अध्यात्मिक आनंदाकडे नेणारी कला आहे, व्यक्तिमत्त्व विकास करणारी ही कला आहे. व्यक्तीकडे बघताना त्या बघणार्‍याला आनंद वाटला पाहिजे, त्या नर्तकाच्या डोळ्यांत आत्मविश्वास वाटला पाहिजे, डोळ्यांनी हसता आले पाहिजे आणि हे डोळ्यांनी हसणे नृत्य शिकवते, या सर्व लकबी नर्तकात असतील, तर आपले नृत्य सकस होईल, असे नृत्यगुरू डॉ. मंजिरी देव यांना वाटते आणि त्यातूनच ‘नृत्यसौरभ’चा जन्म झाला.
 
 
आपली नृत्यदेवता नटराज, महादेव शंकर आहेत, हेच अनेकांना माहीत नव्हते. नटराज म्हणजे शोभेची मूर्ती, असे अनेकांना वाटायचे. त्यामुळे हा संभ्रम दूर करत, शिवशंकर स्वतः प्रदोषसमयी नर्तन करायचे आणि त्यांनी नृत्यकला विकसित केली, इथंपासून ही अत्यंत पवित्र नृत्यकला ज्याची श्रीगणेशाने तांडवातील ‘ता’ आणि लास्यातील ‘ल’ जवळ घेऊन ‘ताला’ची निर्मिती केली, अशा कथा आणि अशा गोष्टी नृत्य शिकणार्‍यांसच नाही, तर सर्वांना माहीत असणे फार आवश्यक होते. म्हणूनच अशा नृत्यपरंपरांची माहिती देणार्‍या पुस्तकांची आज नितांत आवश्यकता आहे. त्याचबरोबर शास्त्रीय कलांना महाराष्ट्रात चांगला वाव आहे, भरपूर प्रेम आहे. परंतु, महाराष्ट्राला स्वतःचे लोकनृत्य असले तरी शास्त्रीय नृत्य नसल्याची खंत डॉ. मंजिरी देव व्यक्त करतात.
 
 
आपण संपादित केलेले यश हे चिरकाल टिकण्यासाठी नितांत रियाज, कलासाधना यांची आवश्यकता आहे, नाहीतर आपल्यातील कला ही अल्पजीवी ठरु शकते. बाकीच्या गोष्टी आत्मसात करताना, यशोशिखरावर पोहोचताना सुद्धा कलेवरील निष्ठा, मेहनत हे कधीच मागे सारून जाता कामा नये. आत्ताच्या पिढीला ध्यास आहे, जिद्द आहे, फक्त आपल्याला मिळणार्‍या ज्ञानाला आपल्या गुरूकडून ते प्राप्त करत राहण्याची तृष्णा असणे महत्त्वाचे आहे. चटकन मिळालेले यश हे सकस नाही याची जाणीव असावी, त्याची चव नक्की घ्यावी, पण त्यात रमू नये. संघर्षाला पर्याय नाही, असा गुरूमंत्र डॉ. मंजिरी देव यांनी तरुणांना दिला आहे.
 
- वेदश्री दवणे  
'कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, त्यासाठी अखंड परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि ध्यास लागतो. - डॉ. मंजिरी देव