खाकीतील जीवनदूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2022   
Total Views |

police
 
 
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करण्याबरोबरच मुक्या प्राण्यांना जीवन देणारे खाकीतील ‘जीवनदूत’ ज्ञानेश्वर एकनाथ शिरसाठ या पोलीस कर्मचार्‍याविषयी...

 
ज्ञानेश्वर शिरसाठ यांचा जन्म दि. २ मे, १९८४ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात झाला. वडील ठाणे पोलीस दलात असल्याने त्यांचे बालपण ठाण्यातच गेले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने प्राथमिक शिक्षण पालिकेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर, वर्तकनगर येथे झाले. पुढे ज्ञानसाधना महाविद्यालयमधून कला शाखेत त्यांनी पदवी मिळवली.
 
वडिलांनी इतक्या तुटपुंज्या पगारातही एवढे शिक्षण दिले, हीच त्यांच्यासाठी समाधानाची बाब. महाविद्यालयीन जीवनात ज्ञानेश्वर एकांकिका स्पर्धा, नाटकांमध्येही ते काम करीत. तेव्हा वामन केंद्रे सरांच्या शिबिराला जाऊन त्यांनी अभिनयाचेही धडे गिरवले. अभिनयामुळे संस्कार काय असतात, हे त्यांना शिकायला मिळाल्याने आयुष्याची खरी जडणघडण लक्षात आली. पण, फक्त कलेने पोट कसे भरणार? याची विवंचना त्यांना सतावत होती. वडिलांची पोलीस खात्यातील सेवा त्यांनी जवळून पाहिली होती. पोलिसांना कुठला सण नाही की, उत्सव नाही ; किंबहुना कुटुंबालाही वेळ देताना होणारी कुचंबणा ज्ञानेश्वर यांनी पदोपदी अनुभवली. तरीही अपरिहार्यता म्हणून २००३ साली ज्ञानेश्वर पोलीस खात्यात भरती झाले. खरं तर हे क्षेत्र त्यांचे नव्हतेच, तरीही वडिलांकडून प्रेरणा घेऊन सचोटीने सेवा बजावण्याचे ध्येय उराशी बाळगून ज्ञानेश्वर यांनी जनसेवेचा ध्यास घेतला. स्वतः कष्टात दिवस काढल्याने दुसर्‍याचे दुःख त्यांना कळत होते. त्यामुळे पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर आपला अर्धा पगार ते समाजसेवेवर खर्चू लागले. यात रस्त्यावरच्या गोरगरिबांना जेवण देणे, उबदार कपडे देणे, वयोवृद्धांना साह्य करणे सुरू केले. दरम्यान, ज्ञानेश्वर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कार्यालयाच्या आवारात प्रसूत झालेल्या कुत्रीचा उपासमारीने तीन दिवसांतच मृत्यू ओढवला, तिची चार पिल्ले अनाथ झाली. पावसात भिजलेल्या त्या पिलांपैकी दोन गॅस्ट्रोने दगावली, तर दोन श्वान आता १५ वर्षांचे झालेत. मन हेलावून गेल्याने तेव्हापासून ज्ञानेश्वर यांच्या भूतदयेला प्रारंभ होऊन ते प्राणिमित्र बनले.
 
निसर्गातील पशुपक्षांबाबत संवेदनशील बनून मांजर, कुत्रे, साप, जंगली जनावरे आणि पाळीव प्राण्यांच्या सेवेचा वसा त्यांनी घेतला. त्यांची ही प्राणीसेवा आजही अव्याहतपणे सुरू आहे. दररोज किमान ५० मुक्या प्राण्यांची भूक भागवण्याचा शिरस्ता ज्ञानेश्वर यांनी कायम ठेवला आहे. ज्येष्ठ सर्पमित्र चंद्रकांत कंग्राळकर हे त्यांचे ‘वाईल्ड लाईफ’मधील गुरू असल्याचे ते सांगतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनेक विषारी, बिनविषारी सर्पाची सुटका करून जंगलात सुखरूप सोडल्याचे ज्ञानेश्वर सांगतात.
 
पोलीस खात्यात सेवा बजावताना ज्ञानेश्वर यांना अभिनय व गाण्याची आवड निर्माण झाली. त्यातून अनेक मनोरंजनाच्या तसेच पोलीस जनजागृतीपर कार्यक्रमात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम करीत असताना पर्यावरणाला हानी पोहोचवणार्‍या प्लास्टिकच्या वापराबाबतही ते कायम जनजागृती करीत असतात. ‘जीवोहंम चॅरिटी’च्या माध्यमातून त्यांचे मदतकार्य सुरूच असते. वन्यप्राण्यांसाठी येऊरच्या जंगलात कृत्रिम पाणवठे उभारून प्राण्यांची तृष्णा भागवण्याचा स्तुत्य उपक्रम गेली अनेक वर्षे ते राबवत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल विविध प्रसारमाध्यमांनी वेळेवेळी घेतली असून Federation Indian Animal Protection Organisation या संस्थेसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय वनविभाग आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संस्था आदी विविध संस्थांनी ज्ञानेश्वर यांना विविध पुरस्कारांनी गौरवले आहे. ठाणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत असताना अपघातग्रस्त तरुणाला वेळीच प्रथमोचार करून जीव वाचवल्याबद्दल पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ‘जीवनदूत’ पुरस्काराने गौरवल्याचे ज्ञानेश्वर आवर्जून नमूद करतात.
 
ठाणे शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येविषयी चिंता व्यक्त करीत श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्बीजीकरण करणे गरजेचे असल्याचे मत ते व्यक्त करतात. तसेच, हे श्वान वृद्ध झाल्यावर त्यांची खाण्यापिण्याची होणारी आबाळ त्यांना अस्वस्थ करते. तेव्हा अशा श्वांनासाठी एखादा वृद्धाश्रम असावा, असे त्यांना वाटते. याशिवाय ठाणे शहरात पशू पक्ष्यांच्या उपचारासाठी एकही शासकीय दवाखाना नसल्याकडे लक्ष वेधून मृत झालेल्या प्राण्यांसाठी दफनभूमीही नसल्याची खंत व्यक्त करतात. तेव्हा, भविष्यात प्राण्यांचे कलेवर रस्त्यावर वा इतस्ततः पडून कुजण्यापेक्षा त्यांचे सुयोग्यरितीने दहन करण्यासाठी ठाण्यात एखादी ‘इलेक्ट्रिक’ शवदाहिनी स्वखर्चाने उभारण्याचा मानस ज्ञानेश्वर बोलून दाखवतात. नवीन पिढीला संदेश देताना ज्ञानेश्वर, निसर्गाचे संवर्धन करण्याबरोबरच मुक्या प्राण्यांनाही जगण्याचा हक्क द्या. प्राणी हे निसर्गसाखळीतील महत्त्वाचे घटक असल्याने त्यांच्यावर भूतदया दाखवा, असे सांगतात.अशा या खाकीतील जीवनदूताला भावी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@