नवी दिल्ली : तामिळनाडूत परदेशामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पाद्रीला अटक करण्यात आली. पाद्री आणि त्याच्या पत्नीने ६ लोकांकडून १० लाखांहून अधिक रक्कम गोळा केली. पीडित लोकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पाद्रीला बेड्या ठोकल्या.
रोजंदारीवर काम करणाऱ्या पुरुषोत्थमन यांचा मुलगा समिकन्नूची पाद्री जोसेफ राजा याच्याशी ओळख झाली. त्यानंतर जोसेफ आणि त्याची पत्नी राघवा संगीथा यांनी पुरुषोत्थमन यांना सांगितले की, जर पैश्यांची व्यवस्था केली तर ते पुरुषोत्थमनच्या मुलाला परदेशात नोकरी मिळवून देऊ शकतात. त्यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून पुरुषोत्थमन यांनी पाद्री व त्यांच्या पत्नीकडे तब्बल ४.९ लाखांची रक्कम दिले होते. मात्र, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर असेच आमिष दाखवून आणखी ५ जणांना फसवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या जोडप्याने ६ गरिबांकडून तब्बल ११.७ लाखांचा रुपये गोळा केली. पण संबंधित पीडितांना रोजगार मिळालाच नाही. पिडीतांनी त्या जोडप्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पीडितांनी वडाळूर पोलिसांकडे तक्रारी केल्यानंतर पाद्री जोसेफ राजला अटक केली, मात्र त्याची पत्नी फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.