आमचाही महिला दिन...

    09-Mar-2022   
Total Views |

womens day
"माझा फोटू? माझा फोटू काढणार?” असे म्हणत ती सुरुवातीला स्मित नंतर गडगडाटी हसू आणि अचानक रडू लागली. डोळ्यातले अश्रू पुसत ती म्हणाली, “माझाबी फोटू कुणी काढला, ते बी अशा शहाण्या सुरत्या लोकांसगट हे सोप्न वाटतं.” यावर तिच्या सोबतच्या अकराजणी हसू लागल्या. एक म्हणाली, “आम्ही दिसाढवळ्या कधीबी झोपत नाय. पण, आज आम्ही अशा खुर्च्यांवर पहिल्यांदा बसलो बगा. म्हणून झोप इवू लागली.” या दोघी आणि त्यांच्या सोबतच्या दहाजणी होत्या, ‘देवनार डम्पिंग ग्राऊंड’वर कचरा वेचणार्‍या महिला. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कचरावेचक महिलांना कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार केला आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’, सा. ‘विवेक’ आणि ‘पार्क’च्या या कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी १२ कचरावेचक भगिनींनी आपले अनुभव कथन केले.
 
 
त्यामध्ये दैनंदिन आयुष्यातले जगणे, प्रश्न, कचरा वेचताना आणि विकताना आलेले अनुभव, ‘डम्पिंग’वरची गुन्हेगारी, नशा, त्यामुळे मुलींची लग्न लवकर करावी लागतात. त्यातही नवविवाहितांपैकी अर्ध्या मुलींना त्यांचे पती सोडून देतात. ‘डम्पिंग’वर आणि इतरत्र माजलेला भ्रष्टाचार, दलदल याबद्दल अनुभव कथन केले. या सगळ्या समस्या त्या अगदी हसून सांगत होत्या. त्यांचे म्हणणे रडून काय समस्या सुटणार आहेत? गुन्हेगारी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल त्यातल्या ज्येष्ठ महिलेचे म्हणणे होते, “हे बघा, कुणी पुरुष अंगावर आला, तर तरणी असो का म्हातारी तिनं त्या पुरुषाला बदडून काढलं पाहिजे. त्यामुळं ५० वर्षं म्हणजी वयाच्या पाचव्या वर्षापासून गोवंडीच्या ‘डम्पिंग’वर कचरा येचते. कचरा येचून मुलांना शिकवलं, लेकीची लग्नं केली. आम्ही भाकरी मिळाली, तरी बी खूश आणि नाय मिळाली तरी बी खूश राहतो.” यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या व्यवस्थापक शिवानी नेमावरकर यांनी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात कचरावेचक भगिनींना बोलते केले.
 
 
सा. ‘विवेक’च्या कार्यकरी संपादक अश्विनी मयेकर, दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘एचआर’कन्सलटंट नयना नाईक यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. माणसाच्या जगण्यात इतका संघर्ष आणि दु:ख असू शकते का? त्यातही ती महिला प्रत्येक प्रसंगाला धीराने तोंड देत आपल्या कुटुंबासाठी धडपडते. मुलांना शिकवते. त्यांचा संसार वसवते. अशा कचरावेचक महिला आणि त्यांच्या कुटुंबाच्या उत्थानासाठी काय उपक्रम करता येतील, प्रयत्न करता येतील, यावरही दै. ‘मुंबई तरुण भारत’, सा. ‘विवेक’ आणि ‘पार्क’च्या महिला कर्मचार्‍यांनी मत व्यक्त केले. कचरावेचक भगिनींसोबत साजरा केलेला महिला दिवस हा आयुष्याचा अनमोल ठेवा आणि जीवनाचे मौल्यवान शिक्षण देणारा होता, असे मत प्रत्येकीने व्यक्त केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.