महिला सक्षमीकरणासाठी झटणार्‍या रतीताई...

    08-Mar-2022   
Total Views |
 
ratee patkar
 
 
 
 
तुझ्या उत्तुंग भरारीपुढे
गगनही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे
असे म्हणणार्‍या बदलापूरच्या रतीताई पातकर. राजकारण, बांधकाम क्षेत्राचाही अनुभव गाठीशी असलेल्या रतीताई सध्या समाजकारणात सक्रिय आहेत. तेव्हा, आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या समाजकार्याचा
आढावा घेणारा हा लेख... 
 
 
रतीताई यांचा जन्म आणि बालपण भिवंडीचे. त्यांना एकूण चार बहिणी आणि दोन भाऊ. अशा या मोठ्या कुटुंबात त्या लहानच्या मोठ्या झाल्या. संस्कारक्षम कुटुंब असल्याने त्यांचा शिक्षणाकडे कायमच ओढा होता. त्यामुळे रतीताईंनादेखील शिक्षणाची आवड निर्माण झाली. त्यांचे शालेय शिक्षण प. रा. (परशुराम रामकृष्ण) विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण ‘बीएनएनसी’ महाविद्यालयातून पूर्ण झाले. ‘बी.कॉम’पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांचे वडील वस्त्रोद्योगात कार्यरत होते. तसेच त्यांना समाजकार्याचीदेखील आवड होती. त्यामुळे बचतगटांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ‘भाग्यश्री महिला पतपेढी’त संचालक म्हणून ही 11 वर्षं जबाबदारी सांभाळली. तसेच ‘वसुंधरा पतपेढी’त पाच वर्षं काम पाहिले. बदलापूर नगरपालिकेमार्फत ‘जरीमरी बचतगट’ हा शहरातील पहिला बचतगट सुरु करण्यातही रतीताईंनी पुढाकार घेतला. या बचतगटातील महिला चक्की चालवित होत्या. त्यांच्या या बचतगटाला कोकण विभागाचे रोख एक लाख रुपयांचे पहिले बक्षीसही प्राप्त झाले. अशाप्रकारे रतीताई 10 ते 12 बचतगटांशी संबंधित आहेत. तसेच बचतगटांच्या माध्यमातून त्यांनी 100हून अधिक महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. ‘महिला सक्षमीकरण’ हाच त्यामागचा हेतू. महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांना त्यांचे सर्व निर्णय स्वत: घेण्यास सक्षम असावे, त्यासाठी महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधीसोबत आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट आपोआपच साधले जाईल, असेच रतीताईंना वाटते.
 
 
रतीताईंचे पती नंदकिशोर (रामभाऊ) पातकर हे राजकारणातील एक सक्रिय असे व्यक्तिमत्त्व. ते नऊ वर्षं कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत नगराध्यक्ष होते, तर 20 वर्षं नगरसेवक होते. सासरचा उंबरठा ओलांडल्यानंतर रतीताईसुद्धा घरातील राजकीय वातावरणाशी समरस झाल्या. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचाही आरंभ झाला. त्यांनी भाजप ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्ष म्हणून सात वर्षं जबाबदारीही पार पाडली. समाजकारणांपेक्षा राजकारणात राहून महिलांसाठी आणि एकूणच समाजासाठी चांगले काम करता येईल, असे त्यांना वाटू लागले. ‘कोविड’ काळात रतीताईंनी सामाजिक दातृत्व दाखवित समाजातील गरजूंना मदत केली. मास्क, सॅनिटायझर, ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्यांचे, गरजूंना अन्नधान्य वाटपही केले. त्याचबरोबर नगरपालिकेला रुग्णशय्या उपलब्ध करून दिल्या. व्हेंटिलेटर्स दिले. ‘कोविड’ रुग्ण सापडतील त्या त्या इमारती सॅनिटाईझही करुन घेतल्या. ‘कोविड’ प्रतिबंधक लसीकरणावेळी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. प्रारंभी लसीकरणासाठी सरकारी रुग्णालयांत गर्दी असल्याने काही नागरिकांनी खासगी रुग्णालयांतून लस घेणे पसंत केले. पण, प्रत्येकालाच पैसे देऊन लस घेणे शक्य नव्हते. यावेळी देवदूत बनून रतीताईंनी 100 ते 150 नागरिकांना स्वखर्चाने लस दिली.
 
 
समाजकार्याबरोबरच बांधकाम व्यवसायाचा अनुभवही रतीताईंच्या गाठीशी आहे. रतीताईंनी एका इमारतीच्या पायापासून ते संपूर्ण इमारतीच्या उभारणीपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. ‘ओम कलावती’ नावाची इमारत त्यांनी उभारली. तसेच बदलापूरमधील नागरिकांना त्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चे धडेही दिले आहेत. शिवदर्शन सोसायटीत त्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चा वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही केली. त्यामुळे 65 इमारतींना आता 24 तास पाणी उपलब्ध होत आहे. रतीताईंवर कौटुंबिक जबाबदारीही असल्याने त्यांना राजकीय क्षेत्रात पूर्णपणे सक्रिय होणे शक्य नव्हते. मुले लहान होती. पती राजकारणात असल्याने ते घराबाहेर असायचे. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि घर अशी दुहेरी जबाबदारी रतीताईंवरच होती. तरी पडद्यामागून त्यांचे काम मात्र सुरू होते. रतीताईंच्या मोठ्या मुलाने अमेरिकेतून ‘एमबीए’ केले आहे, तर छोटा मुलगा वैमानिक आहे. त्यामुळे घरच्या जबाबदार्‍यांतून वेळ मिळत असल्याने वेळ समाजकार्यासाठी खर्ची करण्याचा निश्चय रतीताईंनी केला आहे.
 
 
बदलापूरमध्ये एक ‘सुपर स्पेशालिटी’ असे रुग्णालय असावे, ज्यामध्ये नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतील, असे रतीताई म्हणतात. तसेच लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगले उद्यान उभारायचीही त्यांची इच्छा आहे. ‘बॉटनिकल गार्डन’ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. बदलापूर शहरात पार्किंगची समस्या मोठी असून ही मार्गी लागावी, असेही रतीताईंना वाटते. बदलापूर हे पूर्वी शुद्ध हवेसाठी प्रसिद्ध होते. पण, गेल्या काही वर्षांत बदलापूरकरांना अशुद्ध हवा आणि पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उल्हास नदी म्हणजे बदलापूर शहराला लाभलेले एक वरदान. धार्मिकदृष्टीने देखील या नदीला खूप महत्त्व आहे. या नदीला स्वच्छ ठेवणे आणि तिचे सुशोभीकरण करणे, हाच त्यांचा मानस आहे. हे सर्व काम करण्यासाठी घरातून चांगला पाठिंबा मिळत आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मनपरिवर्तनाची गरज असल्याचे सांगत रतीताई म्हणतात की, “महिला सुरक्षित नाहीत. महिला जेव्हा खर्‍या अर्थाने सुरक्षित होतील, त्याच दिवशी आपण खर्‍याअर्थाने ‘जागतिक महिला दिन’ साजरा करू शकतो.” तेव्हा समाजकारणाच्या वाटेवर यशस्वी वाटचाल करणार्‍या रतीताईंना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.
 
 
"महिलांनी सर्वप्रथम स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, महिलेचे आरोग्य चांगले असेल, तरच ती कुटुंबाची काळजी घेऊ शकते. महिला अनेकदा स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्याचाही माझा मानस आहे."
 
- रती पातकर
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.