सकाळचा गजर वाजताच लवकर उठून मुलाबाळांचा, नवर्याचा आणि सासू-सासर्यांचं जेवण आटोपत, ठरलेली लोकल पकडणार्या सर्व महिलांना हवाहवासा आजचा वार्षिक दिवस. 365 दिवसांतून एकाच दिवशी येणारी ही तारीख आज आपण खूपच खास असल्याची जाणीव करुन देते. घर, कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने होणारा शुभेच्छांचा वर्षाव आणि भेटवस्तू पाहून दिवसभर चेहरा हसरा राहतो. दुसर्या दिवशी पुन्हा रोजचीच आपली जिंदगी! तेच सकाळचं उठणं, घरातल्यांचं जेवण, लोकल पकडणं, बाजारहाट करत घरी येणं, मुलांचा अभ्यास घेणं अन् जेवण उरकलं की, चला आजचा दिवस संपला, असं मनाला सांगत झोपी जाणं. हीच काय आपली जिंदगी, अशी मनोधारणा एका विशिष्ट वयानंतर आपल्या सर्व महिलांचीच असते. नोकरदार महिला असो वा गृहिणी, आपल्यापैकी कित्येक स्त्रिया या संसाराच्या रोजच्या रहाटगाड्यालाच आपलं सुख मानतात. आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार झाल्यानंतर मूल, घरसंसारात काहीतरी राहून गेलंय, ही उणीव सतत मनात राहते. कित्येकदा संसाराच्या सुखात मनासारखं करिअर घडवता येत नाही. कधी घर सांभाळण्यासाठी करिअरची साथ सुटते. तरीही आपण सांसारिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असल्याची समजूत घालत समाधानी राहतो. कधीकाळी या विचारांच्या प्रवाहात मीदेखील होते. घरसंसारात नवरा आणि मुलीमागेच आयुष्य पुढे सरकत होतं. मात्र, जसजसा घरातला आर्थिक डौलारा वाढू लागला, तशी आपलीही चुणूक दाखवता येईल, अशी संधी शोधायला मनातूनच होकार मिळाला.
मी आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्र शिकण्यास सुरुवात केली. मनातल्या कित्येक विचारांचं काहूर आपसूकच शांत झालं. विचारांना एक योग्य वळण मिळत असल्याचं आध्यात्मिक अभ्यासातूनच लक्षात येऊ लागलं. हळूहळू या अभ्यासाच्या मदतीने जगण्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. त्यातूनच वास्तुशास्त्र, अंकशास्त्र आणि ‘स्पिरीच्युअल हीलिंग’ या क्षेत्रात उद्योजिता म्हणून यशस्वी झाले. आज हा अनुभव तुमच्यासमोर मांडताना एक वेगळंच आत्मिक समाधान मिळतंय. 12 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रवास हा आता उत्तम अंकशास्त्रज्ञ, टॅरो कार्ड रिडर आणि पीएच.डी वास्तू एक्सपर्ट इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. माझ्या संस्थेचे नाव ‘अमृताज् स्पिरीच्युअल’ असं आहे आणि आता ‘इंटरनॅशनल अॅस्ट्रोलॉजी फेडरेशन’ या संस्थेची नोेंदणीकृत वास्तू सल्लागार म्हणून मी काम करत आहे. आत्तापर्यंत 500 हून अधिक वास्तुपरीक्षण, 800 पेक्षा जास्त अंकशास्त्रीय पत्रिका आणि आसपास 400 लोकांना हे ज्ञान दिले आहे, शिकवले आहे. या प्रवासात मी आज व्यक्ती म्हणून स्वतंत्र विचारसरणीची व्यक्ती झाले. अर्थात, या सर्व घडामोडीत माझा नवरा अमेय आंबेरकर, मुलगी आर्या आणि माझा परिवार सदैव माझ्यापाठीशी खंबीरपणे उभा राहिला.
हाच सल्ला मला तुम्हा सर्व मैत्रिणींना द्यायचाय. तुमची इच्छाशक्ती अधिक प्रबळ करायची असेल, तर सकाळच्या आपला पहिला चहा खास आपल्यापुरताच ठेवा. हा वेळ कोणासोबत घालवू नका आणि नको तो विचार आणि चिंता करण्यात तर नाहीच नाही. चहाचा घोट घेत त्या 15 मिनिटांसाठी शांत राहा. बोलणं टाळा आणि स्वतःचा ’मी टाईम’ ‘एन्जॉय’ करा. या वेळेत तुम्ही भविष्यातील महत्त्वपूर्ण योजनांचे वेळापत्रक आखू शकता. स्थिरावलेल्या मनात ठरलेला निर्णय हा कमीत कमी वेळात पूर्ण करण्याची ऊर्जा या सकाळच्या वेळेत मिळते. या छोट्याछोट्या गोष्टी खूप मोठा बदल घडवू शकतात. नेहमी सकारात्मक राहा आणि प्रत्येक दिवस तुमचा अशी खूणगाठ मनाशी बांधा. दिवसाच्या पहिल्या प्रहारातील काही मिनिटं तुमची हे वेळेचं गणित मांडून पाहा आणि बघा किती सुंदर गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील!
- डॉ. अमृता आंबेरकर
(लेखिका वास्तुशास्त्र सल्लागार असून पीएच.डी पारंपरिक वास्तू, पिरॅमिड वास्तू, रत्नाध्याय आणि आध्यात्मिक वास्तुशास्त्र आहेत.)