श्रद्धा सांगळे या एक अत्यंत अभिनव उपक्रम राबवित असून मोठ्या कल्पकतेने या उपक्रमातून त्यांनी समाजसेवा आणि व्यवसाय यांची उत्तम सांगड घातली आहे. लहान मुले, त्यांचे बालपण, त्यांच्या पुढच्या आयुष्याची पायाभरणी ही त्यांच्या बालपणातच होते. याची जाणीव असल्याने या मुलांचे बालपण जपले पाहिजे, याच भावनेतून ‘सवंगडी’सारखा उपक्रम त्या राबवितात. खेळ आणि संस्कार यांच्यामार्फत मुलांचे भावविश्व घडवणार्या श्रद्धा सांगळे यांच्याविषयी...
फलटणसारख्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गावात श्रद्धा यांचा जन्म झाला. वडील ‘सीआयडी’मध्ये असल्याने घरात वडिलांच्या शौर्यकथा ऐकतच त्यांचे बालपण गेले. घरात तीन मोठ्या बहिणी या शेंडेफळ. त्यांची आईही समाजकार्यात आणि तिचा स्थानिक राजकारणातही मोठा सहभाग होता. त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. म्हणूनच “आज माझ्या संपूर्ण शैक्षणिक आणि समाजकार्याची गंगोत्री ही आई-वडिलांच्या कामात आहे,” असे श्रद्धा सांगतात. इयत्ता नववीमध्ये असतानाच पितृछत्र हरपल्याने पोलिसात जाण्याचे स्वप्न त्यांना सोडून द्यावे लागले. त्यामुळे स्वतःच्या करिअरचा वेगळा मार्ग त्यांनी निवडला. लहानपणापासूनच चौकस बुद्धी असल्याने पदवीसाठी ‘केमिस्ट्री’ हा विषय निवडला. पदवी उत्तीर्ण होतानाच आयुष्याची दुसरी ‘इनिंग’ सुरू झाली ती म्हणजे संसाराची. ते साल होते १९९५.
लग्नानंतर दोन-तीन वर्षांतच मुलगा झाला. आपल्या मुलाचे संगोपन करत असतानाच काहीतरी वेगळे करण्याच्या हौसेने त्यांनी सातार्यास बालसंगोपन केंद्राचे एक वर्षाचे शिबीर केले. तब्येतीच्या काही अडचणींमुळे काही काळ त्यांना सातारा-मुंबई हा प्रवास करावा लागत होता. याच आवडीमधून पुढे शिक्षण क्षेत्रात प्रवेश झाला. मुलाच्याच शाळेत म्हणजे कमला निंबकर बालभवन, फलटण येथे त्यांनी शिक्षिका म्हणून शिकवायला सुरुवात केली. येथूनच पुढे याच क्षेत्रात काम करण्याची, प्रयोगशील राहण्याची वृत्ती तयार झाली. स्वतःच्या मुलाचे संगोपन करता करता, या क्षेत्रात तसेच भाषा क्षेत्रात संशोधन करण्याची त्यांना संधी मिळाली. २००० साली त्यांना ‘टाटा ट्रस्ट’ची ‘फेलोशिप’ मिळाली. या ‘फेलोशिप’मुळे भाषा या क्षेत्रात काम करता आले. खूप मूलभूत संशोधन करण्याची संधी मिळाली. तसेच वेगवेगळ्या भाषा बोलणार्या, वेगवेगळ्या प्रदेशांतून येणार्या मुलांसाठी अभ्यासक्रमसुद्धा श्रद्धा यांच्या संशोधनातूनच तयार केला गेला. स्वतःच्या मुलांचे संगोपन, शिक्षण क्षेत्रातील काम करता करता सुमारे दहा वर्षे निघून गेली. या संपूर्ण काळात शहराकडच्या मुलांमध्ये आणि गावाकडच्या मुलांमध्ये खूप फरक तयार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्रद्धा सांगतात जेव्हा मी मुंबईत आले तेव्हा मला येथील मुलं खेळण्या-बागडण्याच्या वयात टीव्हीवरील ‘कार्टून्स’ बघण्यात रमली आहेत. जिथे ‘गोट्या-लगोर्या’ खेळण्याच्या त्या वयात घरात बसून ‘कार्टून्स’वर बोलत आहेत. या गोष्टी मला खूप विचित्र वाटल्या. ज्या वयात शारीरिक, मैदानी खेळ करून दमायचे, त्याच वयात या सर्वांच्या आहारी जाऊन मुले त्यांचे बालपण हरवून बसत आहेत. पालकांकडेही त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशा काळात या प्रश्नांवर उत्तरे शोधली पाहिजेत, मुलांचे बालपण असे वाया जाता नये, बालपणाच्या रम्य आठवणी त्यांच्याही वाट्याला आल्या पाहिजेत, याच कळकळीतून, जाणिवेतून जन्म झाला ’सवंगडी’चा.
’सवंगडी’ काय आहे? तर ’सवंगडी’ मुलांचे बालपण जपणारी, संस्कार करणारी, मुलांना खेळांची, तसेच मित्र-मैत्रिणी जमवण्याची आवड निर्माण करणारी एक संस्था आहे. इथे फक्त खेळच नाही, तर एकूणच मुलांचे भावविश्व घडवण्याचे काम’सवंगडी’ करते. ’सवंगडी’ सुरु करण्याचा विचार जेव्हा मनात आला तेव्हा कुठल्याही व्यवसायाला सुरुवातीच्या काळात ज्या अडचणी येतात, त्या सर्व अडचणींचा सामना श्रद्धा यांनाही करावा लागला. सुरुवात जागा शोधण्यापासून झाली. मुंबईसारख्या शहरात अशा जागा मिळणे किती अवघड असते, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण, असाच शोध घेत असताना श्रद्धा यांना एका सामाजिक संस्थेने त्यांची जागा दिली. अशा रीतीने जागेचा शोध संपला आणि ’सवंगडी’च्या प्रवासाची सुरुवात अशी झाली. संस्थेने जागा दिली जरी असली असली, तरी ती खूप दिवसांपासूनची पडिक होती. त्यामुळे ती साफ करून घेऊन त्यामध्ये व्यवसाय करायचा आणि त्यातून मासिक भाडे द्यायचे आणि दुसरी अट म्हणजे, त्या जागेत वाचनालय सुरू करायचे. या दोन्ही अटी स्वीकारून त्या पूर्ण केल्या आणि ‘सवंगडी’ची सुरुवात झाली. सुरुवातीला पाच-सहाच पालकांनी विचारणा केली होती. हा एवढासाच प्रतिसाद बघून श्रद्धा यांच्या पोटात गोळा आला होता. कारण, जर कोणी उपक्रमाकडे आलेच नाही तर पुढे असे होणार? पण, या काळात कुटुंबाने खूप साथ दिल्याचे श्रद्धा सांगतात. त्या म्हणतात की, “जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला ‘हम्प्टी-डम्प्टी’, ‘जॅक अॅण्ड जील’ यांसारखे तगडे प्रतिस्पर्धी होते आणि तिथे खूप प्रलोभने होती आणि ‘ग्लॅमर’सुद्धा होते. पण, मी सुरुवातीपासूनच निर्धार केला होता की, अशा कुठल्याही गोष्टी ’सवंगडी’मध्ये होणार नाहीत. त्यामुळे मला थोडा वेळ वाट बघायला लागली. पण, आता सर्व नीट सुरू आहे,” असे श्रद्धा सांगतात. इथे प्रत्येक मुलाचा विचार केला जातो. त्याला दुसरं घरंच आहे, अशी वागणूक मिळते. हे बघितल्यावर पालकांनीच ’सवंगडी’ची प्रसिद्धी सुरु केली. मुलांनासुद्धा इथे परत परत यावेसे वाटते, या भावना ’सवंगडी’मार्फत निर्माण झाल्या आणि तेच ’सवंगडी’चे यश आहे.
इथे वेगळे काय होते, तर खेळ आणि ‘खेळातून शिक्षण’ या गोष्टीला खूप महत्त्व आहे. सुरुवातीला घरातल्या सामानातून, टाकाऊ गोष्टींमधून, तर कधी कुठल्याही साधनांशिवाय खेळ शोधून, गोष्टी, गाणी म्हणून इथे मुलांना शिक्षण दिले जाते. श्रद्धा यांनी अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही अभ्यास केला असल्याने शिक्षणाची पद्धत ही विद्यार्थीकेंद्रित असायला हवी, याचे महत्त्व मला समजले. त्याचाच वापर त्यांनी इथे केला. मुलांमध्ये स्वावलंबन, स्वयंशिस्त हे गुण बाणवले जावेत, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यावर भर दिला जात असल्याने पालकांनाही आता त्याचे महत्त्व समजायला लागले आहे. ‘सवंगडी’ची अजून एक कल्पक गोष्ट म्हणजे तिथले वाचनालय. वाचन या गोष्टीची स्वतःलाही आवड असल्याने श्रद्धा यांनी त्या गोष्टीचा इथेही समावेश केला आहे. येथील वाचनालयात ही मुले स्वतः हवे ते पुस्तक घेतात, वाचतात आणि अत्यंत काळजीपूर्वक ते परत आणून ठेवतात. हे स्वयंशिस्तीचे धडे लहान वयापासूनच मिळणे खूप महत्त्वाचे असते आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच ही सवय लागणार आहे, हीच ’सवंगडी’ची शिकवण आहे. अतिशय अभिनव कल्पनेतून जन्म घेऊन, कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता हा प्रवास गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे आणि पुढेही जात राहील. याचमुळे कोरोनासारख्या काळातही ’सवंगडी’चा प्रवास चालूच राहिला. आता येणार्या काळात ’सवंगडी’च्या अनेक ठिकाणी शाखा सुरू करणे हे ध्येय आहे. आजही खूप ठिकाणांहून मागणी होत असते, पण आम्हीच पूर्ण तयार नसल्याने पुढे जात नव्हतो. पण, आता येणार्या काळात आम्ही तयार आहोत असे श्रद्धा ’सवंगडी’च्या भविष्यातील योजनांबद्दल सांगतात. त्या म्हणतात की, “येथून पुढे गेलेल्या मुलांनी आयुष्यात काहीतरी बनावे, भरपूर यश मिळवावे, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. मुलांच्या चेहर्यावरचे समाधान आणि त्यांच्या आठवणींच्या कोपर्यात ’सवंगडी’चे नाव जपून ठेवले जाणे हे इतर कुठल्याही सन्मानापेक्षा मोठेच आहे. ’सवंगडी’मधून पुढे जाऊन कित्येक मुलांनी विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवला आहे, हेच ’सवंगडी’चे यश आहे.” श्रद्धा यांना त्यांच्या या प्रवासात कुटुंबाची मोलाची साथ लाभली आहे. घरच्यांनी त्यांना खूप सांभाळून घेतलं आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा खूप कमी लोकच ’सवंगडी’कडे येत होते, तेव्हा घरच्यांनी श्रद्धा यांना धीर दिला, वाट बघायला सांगितली आणि त्याचेच फळ त्यांना आज मिळत आहे. लहान मुलांची शिक्षिका होण्यापेक्षा, त्यांची ’सवंगडी’ बनून त्यांचे भावविश्व घडवण्यात कृतार्थता मानणार्या श्रद्धा सांगळे यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.
"महिलांनी एकमेकींना सहकार्य केले पाहिजे, एकमेकींचा आदर केला पाहिजे आणि एकमेकींना सन्मानाने वागवले पाहिजे. जर हे आपण करू शकलो, तर महिला दिन हा फक्त एकाच दिवसापुरता मर्यादित न राहता वर्षाचा प्रत्येक दिवस हा ‘महिला दिन’ असेल."
- श्रद्धा सांगळे
लेखक : हर्षद वैद्य