मुंबई : ठाकरे सरकारचे विशेष सरकारी वकील असलेल्या प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याबद्दलचे कटकारस्थान शिजवण्याचं मुख्य ठिकाण आहे. याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचण्यात आला", असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सध्या सुरु असलेल्या अधिवेशानात ते बोलत होते.
गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करताना कशा प्रकारची कट कारस्थाने ठाकरे सरकार रचतेय याबद्दल खुलासा करणारे अनेक व्हिडीओ फडणविसांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. "तब्बल सव्वाशे तासांचे हे व्हिडीओ असून ते याठिकाणी दाखवले तर सभागृहाची इभ्रत जाईल.", असेही ते यावेळी म्हणाले.
"भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर २०१८ सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसंबंधित असलेल्या एका वादावर बनावट गुन्ह्याअंतर्गत नोंद करण्यात आली. याचबरोबर गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी या कार्यालयात ठरल्या. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचे काम यावेळी सरकारी वकिलांकडून करण्यात आलं. साक्षी कशा घ्यायच्या इथपासून ते पैसे कसे घ्यायचे इथपर्यंतचा सर्व घटनाक्रम यात आहे."