माहेरघर विद्येचे, पाऊल राष्ट्रविकासाचे

    06-Mar-2022   
Total Views |



pune university
 
 
 
 
भारताची जगात ओळख एक ‘संपन्न राष्ट्र’ अशीच होती. सर्वच बाबतीत भारत ऐतिहासिक काळात समृद्ध असल्याचे दिसून आले आहे. जगाला गणित, ज्योतिष, शून्य, खगोलशास्त्र याची देणगी भारतानेच दिली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे हे स्थान ब्रिटिशांच्या आगमनाने कालौघात मागे पडले. मात्र, १९व्या आणि २०व्या शतकात महराष्ट्रातच नव्हे, तर भारतात पुणे शहराने आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याने अनेकांना अचंबित केले. त्यामुळेच पुणे विद्येचे माहेरघर म्हणून नावारूपास आले. ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’मार्फत पुण्यात भारतातील पहिले कार्यालय नुकतेच साकारण्यात आले आहे. लंडनमधून सुरु झालेली एक मोठी औद्योगिक क्रांती जगाने अनुभवली आहेच. त्याच शहराला आपल्या शैक्षणिक केंद्रासाठी एकेकाळी त्यांच्या दृष्टीने मागास असलेल्या देशातील शहरात येऊन केंद्र स्थापन करावे वाटणे व तशी कृतीदेखील त्यांनी करणे हे भारतासाठी देखील अभिमानास्पद आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या केंद्राची सुरुवात होण्याने आता आपण जगाच्या नजरेत नेमके कोठे आहोत, याची कल्पना आपणांस येण्यास नक्कीच मदत होणार आहे.
  
 
 
‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’ला बर्‍याचदा करिअर नेतृत्वाचे सर्वोच्च महत्त्व असलेले विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांतील नियुक्त्यांची पहिली पसंती येथून शिक्षण घेतलेले विद्यार्थी ठरत असतात. पुणे येथे सुरु झालेले हे केंद्र भारतीय युवकांसाठी याच दिशेने प्रवास करण्यासाठी नक्कीच साहाय्यभूत ठरेल, अशी शक्यता शिक्षण आणि करिअर क्षेत्रातील तज्ज्ञ यानिमित्ताने वर्तवित आहेत. ‘द युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’ (युइएल) हे लंडन ब्युरो ऑफ न्यूहॅम, लंडन येथे स्थित एक सार्वजनिक विद्यापीठ आहे. ज्याची बीजे १८९८ पासून रोवली गेली आहेत आणि १९९२ मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळालेले हे विद्यापीठ आता पुणे विद्यापीठात पहिले भारतीय कार्यालय स्थापन करत आहे.
 
 
 
सध्याच्या घडीला जागतिक पटलावर विचार केल्यास लंडनचा विस्तार त्यांच्या पूर्व बाजूला अधिकाधिक होत आहे. औद्योगिक आणि शिक्षणविषयक असणार्‍या उपलब्ध सुविधा हे त्यामागील एक कारणदेखील आहे. पूर्व लंडनमधील कॅनरी व्हार्फ, एक जागतिक आर्थिक केंद्र असून त्याच्या कार्यपद्धतीची सावली या विद्यापीठावर कायम पडताना दिसून आली आहे. ‘इस्ट लंडन’ गेल्या दोन दशकांमध्ये झपाट्याने बदलले आहे आणि ते तसेच पुढे जावे, यासाठी लंडन प्रयत्नशील असून त्यांना भारत हा त्या प्रवासातील एक मोठा आधार वाटत असल्याचेच त्यांच्या या केंद्र स्थापनेवरून दिसून येत आहे. आम्ही एक करिअर-नेतृत्व विद्यापीठ आहोत, जे आमच्या विद्यार्थ्यांना सतत बदलत्या जगात भरभराट होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, भावनिक बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता विकसित करण्यास सक्षम करते, अशा प्रकारचा आशावाद ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’चे ‘रिक्रूटमेंट डायरेक्टर’ डॅनियल कफ यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.
 
 
 
२०१८-१९ शैक्षणिक वर्षात इस्ट लंडन विद्यापीठाने अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र, संशोधन या क्षेत्रात प्रभाव आणि भागीदारी विकसित करण्यावर अधिकाधिक भर दिला आहे. तसेच, पदवीपूर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम देण्यावर या केंद्राचा भर असणार आहे. भारतातील उद्योग रोजगार वाढवण्यासाठी ‘युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट लंडन’च्या धोरणात्मक दृष्टिकोनाची घोषणा केली आहे. युके सार्वजनिक विद्यापीठाचे पहिले दक्षिण आशिया कार्यालय पुणे येथे ‘ग्लोबल स्टुडंट सेंटर’स्थित असणार आहे. या केंद्राचा जर आपण दुसर्‍या बाजूने विचार केल्यास हे केवळ एक शैक्षणिक केंद्र ठरेल असे नाही, तर दक्षिण आशियातील नागरिक आणि विद्यार्थी यांच्याशी भारताचा अधिकाधिक समन्वय दृढ होण्यासाठीदेखील हे केंद्र आगामी काळात महत्त्वाची भूमिका बजाविताना दिसणार आहे. दक्षिण आशियातील राष्ट्रात आजही भारत पुढारलेला आहेच. मात्र, यामुळे आता भारताचे विश्वबंधुत्वाचे धोरण संपूर्ण क्षेत्रात पोहोचण्यास नक्कीच गती प्राप्त होईल. सध्याच्या घडीला लंडनचे स्थान जागतिक पटलावर अमेरिकेइतके जरी महत्त्वाचे नसले, तरी युरोपियन राष्ट्रात असणारे त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. भारतात लंडनमार्फत होणारे हे प्रयत्न भारताला युरोपियन राष्ट्रांशी अधिक दृढ होण्यास आगामी काळात नक्कीच साहाय्यभूत ठरण्याची शक्यता आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.