पुणे : भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी,६ मार्चला बाणेर आगारात १०० इलेक्ट्रिक बसेस आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. यामुळे पुणे शहरात एव्ही ट्रान्सचा ताफा २५० पर्यंत विस्तारला आहे. ऑलेक्ट्रा ही भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील सर्वात अग्रेसर कंपनी ठरली आहे. सध्या पुण्यात १५० बस ऑलेक्ट्रा यशस्वीपणे चालवते. ऑलेक्ट्रा सुरत, मुंबई, पुणे, सिल्वासा, गोवा, नागपूर, हैदराबाद आणि डेहराडून येथे इलेक्ट्रिक बसचा ताफा यशस्वीपणे चालवत आहे.नवीन १०० इलेक्ट्रिक बसेसची भर पडल्याने पुणे शहरातील नागरिकांच्या वातानुकूलित, आरामदायी प्रवासाच्या अनुभवात चांगलीच वाढ होणार आहे. शहरी सार्वजनिक वाहतूक हे जगभरातील प्रदूषणाचे मुख्य कारण मानल जात. पण या बसेस मुळे शहरातील कार्बन उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी होईल. बसेस १०० टक्के इलेक्ट्रिक असल्याने शून्य उत्सर्जन आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये यात आहेत.
ऑलेक्ट्रा निर्मित अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस सुरत, गोवा, सिल्वासा, डेहराडून, मुंबई, पुणे आणि सुरत इत्यादी अनेक शहरांमध्ये कार्यक्षमतेने सेवा देत आहेत आणि सेवांना शहरांमधील प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामूळेच संबंधित इलेक्ट्रिक बसच्या ताफ्याचा विस्तार करण्यास तेथील वाहतूक संस्था इच्छुक आहेत. बसेसच्या अनावरणाप्रसंगी, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. के.व्ही. प्रदीप म्हणाले, "पुणे शहरात सध्याच्या १५० बसेसच्या ताफ्यात आणखी १०० इलेक्ट्रिक बसेसची भर घालताना ऑलेक्ट्राला अभिमान वाटतो. पुणे शहराचा समृद्ध वारसा जतन करतानाच ऑलेक्ट्राच्या इलेक्ट्रिक सार्वजनिक वाहतूक प्रणालीद्वारे प्रदूषण पातळी, ध्वनी प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या इलेक्ट्रिक बसेसनी या आधीच विश्वासार्हता आणि कार्यक्षमता सिद्ध केली आहे, आतापर्यंत पुण्यात ओलेक्ट्रा बसेसनी २ कोटी किलोमीटरहून अधिकचा प्रवास केला आहे.
या १२ -मीटर वातानुकूलित बसेसची आसन क्षमता ३३ प्रवासी अधिक चालक अशी आहे. इलेक्ट्रॉनिक नियंत्रित एअर सस्पेंशन आरामदायी सुखकारक प्रवासाची प्रचिती देते. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक आसनासाठी एक आपत्कालीन बटण आणि यूएसबी सॉकेट्स आहेत. बसमध्ये बसवण्यात आलेली लिथियम-आयन (ली-आयन) बॅटरी ट्रॅफिक आणि प्रवासी भारमान यानुसार एका चार्जवर सुमारे २०० किमी प्रवासाची सुविधा देण्यास सक्षम आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत असणाऱ्या या बसमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली आहे जी बसला ब्रेकिंगमध्ये गमावलेल्या गतीज उर्जेचा काही भाग पुनर्प्राप्त करण्यास मदत करते. हाय-पॉवर एसी आणि डीसी चार्जिंग सिस्टम ३-४ तासांमध्ये बॅटरी पूर्णपणे रिचार्ज करू शकते.