मुखवट्याआडचे राहुलायन

    06-Mar-2022   
Total Views |

Rahul Gandhi 
 
 
 
एक-दोन वर्षांपूर्वी राहुल गांधींनी म्हटले होते की, घराघरांतून युवक बाहेर येतील ते मोदींना दंडुक्यांनी मारतील, पण दैवगती निष्ठूर! राहुल गांधी यांचे भविष्य पूर्णत: चुकले आणि असे काही झालेच नाही. यावर राहुल गांधींच्या शिष्यांचे म्हणणे आहे, मग, काय झाले? आमचे राजकुमार म्हणाले होते की, युवक हातात दंडुके घेऊन येणार. त्यांनी म्हटल्याप्रमाणे तसे युवक आलेच आणि मोदींच्या संदर्भात दंडुके वापरले नाहीत, पण त्याच हाताने मतदान तर केले ना? असो, तसेही राहुल यांचा गाजलेला बटाट्यापासून सोन्याचा आविष्कार असो की, पदपथावर शेती करा, बटाटे उगवा त्यातून टोमॅटो केचअप उत्पादित करा, हा नवीन शोध असो. सगळे शोध असेच भन्नाट! राहुल गांधींच्या कल्पना इतक्या मौल्यवान असतात की, सामान्यच काय कोणतीही भारतीय व्यक्ती त्यांनी सुचविलेला आविष्कार प्रत्यक्षात आणतच नाही. आता खूप महत्त्वाचा शोधनिबंध सादर करत आहेत की, ‘रॉकेट सायन्स’ सांगत आहेत, अशा आवेशात राहुल गांधी यांनी जनतेला गुप्त माहिती दिली की, “पटापट पेट्रोलची टाकी ‘फुल्ल’ करा. मोदी सरकारची ‘निवडणूक ऑफर’ संपणार आहे,” असे विधान करून राहुल गांधी भारतीय जनता मूर्ख आहे, हे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण, एकट्या मोदींना वाटले म्हणून मोदी पेट्रोलचे भाव वाढवूही शकत नाहीत आणि कमीही करू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध आणि इतर संकटग्रस्त स्थिती, आर्थिक स्थित्यंतरे यावरून आंतरराष्ट्रीय बाजारात प्रत्येक गोष्टीचे भाव चढतात-उतरतात. सध्या जागतिक राजकारणात रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद उमटत आहेत. त्या अनुषंगाने जागतिक बाजारात पेट्रोलचे भाव वाढू शकतात. नेमकी हीच गोष्ट हेरत राहुल गांधी यांनी पेट्रोलबाबत असे म्हटले आहे. खरेतर राहुल गांधी भविष्यवेत्ताही नाहीत की भोळेभाबडेही नाहीत. राजकीय घडामोडीत स्वार्थ साधण्याची कुटील बुद्धी असणारे ते राजकारणी आहेत. आपल्याला राजकारण कळत नाही, हे म्हणत सदानकदा राजकारण करणार्‍या राहुल गांधींचा मुखवट्याआडचा चेहरा नेहमीच उघडा पडतो. खरेच आहे, एक चेहरे पे कई चेहरे लगाते हैं लोग...
 
 
 
‘ते’ आणि त्यांचे ‘रोखठोक’
 
"ऐकले का इंदू, तू लावलेल्या रोपट्याची फळं आपण आज चाखतोय. मी जीवंत असतानाच संघाच्या लोकांचे काम जोरात चालले होते. भविष्यात काँग्रेससमोर त्यांच्या विचारांचे आव्हान असणार, मला वाटलेच होते," त्यांनी कोटातला गुलाब हळुवार गोंजारत म्हटले. यावर त्यांच्या कन्यारत्नाने करारी नजरेने आणि पापण्यांची कैक वेळा उघडझाप करत म्हटले, “हो, पण आपणही काही कमी नाही. वसंतसेना, बाबा वसंतसेना! आज तुमचा, माझा आणि माझ्या नातवाचाही डंका ‘रोखठोक’पणे पिटत आहेत. रशिया-युक्रेनच्या युद्धात त्या मोदींनी तुमची तटस्थ नीती उपयोगात आणली, असेही ते सांगत आहेत. माहिती आहे की नाही?” हं! कुठेतरी मृत्यूनंतरच्या जगात त्या बाप-बेटीची अशी चर्चा रंगली असेल का? छे... छे... त्यांना तिथे तसे वाटले तरी इथे मला त्याचा काही फायदा होणार नाही. महामहिम थोर-थोर आदर्श महापुरुष देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्या तटस्थ भूमिकेची कॉपी मोदींनी केली, असे मी म्हटले. ते म्हणणे, दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचले पाहिजे. महामहिम अतिदयाळू मॅडम सरकारच्या चरणी माझे विधान पोहोचले की गंगेत घोडे न्हाले. हं, पण गंगेत नकोच. ते मोदी आणि योगींसारखे गंगा-गंगा करतात. त्यापेक्षा मिठीनदीत घोडे न्हाले, असे म्हणतो. कारण, मिठी नदी आमच्या जवळची आहे. काय म्हणता, मिठी नदी स्वच्छतेच्या प्रकल्पात काही काळेबेरे झाले. त्यामुळे मिठी नदी अजून नालाच आहे? त्या नाल्यात घोडा न्हाणार तर सोडा, सहिसलामत उभा राहिला आणि उभा राहून जगला, तरी खूप मोठे आहे? बस करा. तुम्ही लोकसुद्धा ना इतकं का ‘रोखठोक’ बोलता? मी ‘रोखठोक’ बोलतो, पण ते खोटे असते आणि अतिदयाळू मॅडम त्यांचे अति-अतिदयाळू राजकुमार, माझे आदरणीय काका, आमचे साहेब यांना खूश करण्यासाठीचे असते. तुम्हीसुद्धा माझ्यासाठी असे खोटे, पण स्तुती करणारे बोलत जा. मी अतिदयाळू मॅडम किंवा काका किंवा आमच्या साहेबांपेक्षाही थेट मुळाचीच म्हणजे पंतप्रधान नेहरूंचीच स्तुती केली. होतील ना मॅडम आणि राजकुमार खूश? करतील ना मला ते मुख्यमंत्री? नाही नाही... मला मुख्यमंत्री म्हणायचे नव्हते, ते आपले चुकून ओठावर आले. मी काय म्हणत होतो की, पंतप्रधान नेहरू यांची परराष्ट्रनीती... काय तो तटस्थपणा! काय ते गांधी घराणे!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.