मुंबई: भाजपचे आमदार अमित साटम यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना ट्विटरवरून उत्तर दिले आहे. "आपले कर्म शेवटी आपल्याकडेच येते हे आयुक्तांनी लक्षात ठेवावे आणि कुठलाही छुपा राजकीय अजेंडा राबवू नये" असा सल्ला अमित यांनी मुंबईचे आयुक्त संजय पांडे यांना दिला आहे. या ट्विटरवरील पोस्टच्या माध्यमातून अमित साटम यांनी संजय पांडे उद्देशून असे म्हटले आहे की " हे खूप चांगले आहे आपला नंबर शेअर करून लोकांशी संवाद साधला आहे पण हे कृतीतूनही उतरले पाहिजे. आम्हाला माहित आहे की तुम्हांला काहीतरी कामगिरी देऊन या पदावर पाठवले आहे, पण तुम्ही ही कामगिरी बजावण्यात शक्ती वाया घालवण्याऐवजी कामात लक्ष द्याल आणि मुंबईत कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवाल." पुढे त्यांनी या पदाचा दुरुपयोग करून कुणाचातरी राजकीय अजेंडा राबवून विरोधकांवर अन्याय कराल तर लक्षात ठेवा आपले कर्म आपल्याकडेच येते असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदभार स्वीकारल्यावर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मुंबईकर जनतेला आवाहन केले होते. या पोस्ट मध्ये आपला मोबाईल नंबर देऊन त्यांनी कुणाला पोलीस दलाच्या कामांमध्ये सुधारणा सुचवायचे असल्यास जरूर संपर्क करावा असे मुंबईकरांना सांगितले होते. स्कॉटलंड यार्डशी तुलना केले जाणारे मुंबई पोलीसदल जनतेच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी सदैव सज्ज आहे असे आश्वासनही या पोस्टमधून संजय पांडे यांनी दिले होते.