कोरेगाव-भीमाच्या लढाईच्या इतिहासाचे विश्लेषण

    05-Mar-2022   
Total Views |

१ जानेवारी १८१८ - कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव
 
 
 
गेली काही वर्षे दि. १ जानेवारी हा दिवस मोठ्या जनसमुदायातर्फे ‘कोरेगाव भीमा शौर्यदिन’ म्हणून साजरा केला जातो. १८१८ साली याच दिवशी ‘कोरेगाव भीमा’ या गावी जी लढाई झाली होती, तिचा संदर्भ या ‘शौर्यदिना’ला आहे. काही वर्षे १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील जयस्तंभाजवळ कुठलीही अप्रिय घटना न घडता शौर्यदिन साजरा होत होता. परंतु, २०१८ साली मात्र या दिवशी याठिकाणी सुनियोजित दंगल घडवली गेली. कोरेगाव-भीमा येथील लढाईला गेली काही वर्षे ‘पेशवे विरूद्ध महार’ (म्हणजेच ‘ब्राह्मण विरूद्ध दलित’) असा रंग देण्यात येत होता, त्याचा कळस पुण्यामध्ये झालेल्या चिथावणीखोर ‘एल्गार परिषदे’च्या निमित्ताने गाठला गेला आणि दुसर्‍याच दिवशी कोरेगाव-भीमा येथे दंगल झाली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. ‘विचारवंत’ म्हणवल्या जाणार्‍यांना अटकही झाली. माध्यमांमधून कोरेगाव-भीमा येथे दि. १ जानेवारी, १८१८ रोजी झालेल्या लढाईला उजाळा दिला जाऊ लागला. परंतु, अस्सल साधनांच्या साहाय्याने केलेले विवेचन मात्र अभावानेच समोर आले. ही उणीव रोहन जमादार (माळवदकर) लिखित ‘दि. १ जानेवारी, १८१८ - कोरेगाव-भीमा लढाईचे वास्तव’ या पुस्तकामुळे दूर झाली आहे.
 
 
 
कोरेगाव-भीमाची लढाई ही आकस्मिक परिस्थितीतून घडलेली घटना होती. मराठेशाही उतरणीला लागली होती. छत्रपतींच्यावतीने पुण्याहून पेशवे राज्य चालवत होते. म्हणजेच ‘पेशवाई’ ही वेगळी सत्ता नसून ती मराठ्यांच्या सत्तेचेच रूप होती. इंग्रज मराठी सत्तेवर चाफास आवळत चालले होते. त्याच धामधुमीत दुसरे बाजीराव सातार्‍याचे छत्रपती प्रतापसिंह यांच्यासह इंग्रजांना हूल देत पुण्यामध्ये येण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी त्यांच्याकडून आपण कोकणच्या दिशेने जात असल्याची आवई उठवली गेल्याने इंग्रजांना ते पुण्याकडे जातील याची कल्पनाच नव्हती. मराठ्यांचे सैन्य पुण्याच्या ईशान्येला असणार्‍या फुलगाव येथे (भीमा नदीच्या पश्चिम किनार्‍यावर) आल्याची कुणकुण लागताच पुण्यात असणार्‍या कर्नल बर्र या इंग्रज अधिकार्‍यानेशिरूर येथे असणार्‍या कॅप्टन स्टाँटन यांच्याकडून मदत मागितली. स्टाँटन शिरूरकडून फुलगावच्या दिशेने निघाला आणि त्याने फुलगावच्या लगतच्या भीमा नदीच्या पूर्वेला असणार्‍या कोरेगाव येथे मोर्चेबांधणी केली. तिथेच दि. १ जानेवारी, १८१८ रोजी ‘इंग्रज विरूद्ध मराठे’ अशी लढाई झाली. दुपारपर्यंत मराठ्यांची सरशी होत असताना, दुपारनंतर चित्र पालटले आणि इंग्रजांकडून तिखट प्रतिकार झाल्याने मराठ्यांना निर्णायक विजय मिळू शकला नाही.
 
 
 
लेखक रोहन जमादार यांनी ‘ही लढाई अनिर्णित होती’ असा निष्कर्ष मांडला आहे. हेतू साध्य झाला की नाही, यावर लढाईची निर्णायकता ठरवता येते, असे ते नमूद करतात. छत्रपती प्रतापसिंह आणि दुसरे बाजीराव यांना स्टाँटनकडे इंग्रजांची आणखी कुमक येण्यापूर्वी पुढच्या मुक्कामी जाणे आवश्यक होते, त्यामुळे त्यांना कोरेगावचा मुक्काम आणि तिथली लढाई लांबवण्यात रस नव्हता. त्यामुळे दि. १ जानेवारी रोजी संध्याकाळी इंग्रजांमध्ये लढण्याचे त्राण शिल्लक नाहीत, हे लक्षात आलेले मराठ्यांचे सैन्य (तिथे थांबून राहणे असा मूळ हेतूच नसल्याने) तिथून निघून गेले आणि ही लढाई अनिर्णित राहिली, असे असताना ‘ही लढाई म्हणजे पेशव्यांचा पराभव होता’ म्हणता येत नाही. (इ. स. १८२२ मध्ये इंग्रजांनी आपल्या शौर्याची आठवण सांगणार्‍या स्तंभाची स्थापना भीमा नदीकाठच्या कोरेगाव येथे करून त्याला ‘जयस्तंभ’ असे नाव दिले.
 
 
 
लढाईनंतर पुढची १०० वर्षे ‘जयस्तंभा’पाशी कुठल्याही प्रकारचा उत्सव झाला नाही. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘जयस्तंभा’ला भेट दिली. इंग्रजांनी महार समाजातील लोकांची सैन्यात भरती करणे बंद केले होते. उत्पन्नाचे अन्य साधन उपलब्ध नसलेल्या या समाजाच्या अर्थार्जनाचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी त्यांची लष्करभरती पुन्हा सुरू व्हावी म्हणून बाबासाहेब प्रयत्नशील होते. त्या अनुषंगाने महार समाजातील सैनिकांनी कोरेगावच्या लढाईत गाजवलेल्या शौर्याची आठवण जागवणे आणि इंग्रजांच्या सैन्यात महारांनी दिलेल्या योगदानाची जाणीव इंग्रजांना करून देणे, हा या भेटीमागचा प्रमुख उद्देश होता. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी या लढाईला ‘जातीअंतासाठी झालेली लढाई’ असे संबोधले नाही. निर्णायक यश टप्प्यात येत असताना पेशव्यांच्या सैन्याने हल्ला थांबवत माघार का घेतली हे सांगणे अवघड आहे, असे उद्गार बाबासाहेबांनी काढले असल्याच्या संदर्भाकडे (‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पीचेस अ‍ॅण्ड रायटिंग्ज’, खंड १७, भाग ३) रोहन जमादार लक्ष वेधतात. अलीकडे पसरवल्या जात असलेल्या ‘पेशव्यांचा पराभव झाला’ या दाव्यातला फोलपणाच यातून उघड होतो. बाबासाहेबांच्या भेटीचा संदर्भ हवा तसा वाकवून आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळ केला जात आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
  
 
 
कोरेगाव-भीमाच्या लढाईचे इंग्रजांच्या समकालीन अस्सल कागदपत्रांमधले संदर्भ हे या पुस्तकाचे सगळ्यात मोठे बलस्थान आहे. स्टाँटनने वरिष्ठांना पाठवलेले लढाईचे वृत्त, स्तंभ उभा करण्यासंबंधी झालेला पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष ‘जयस्तंभा’वर असलेला मजकूर आणि कोरलेली नावे यांचा रोहन जमादार यांनी बारकाईने अभ्यास केला आहे. इंग्रज असोत वा मराठे, दोन्ही बाजूच्या सैन्याकडून एकाच जातीचे अथवा एकाच धर्माचे सैनिक लढले नाहीत, हेही ते अधोरेखित करतात. सैनिकांच्या जातींवरून त्यांचे नेतृत्व करणार्‍या सत्ताधार्‍यांच्या जातीविषयी जी विधाने केली जातात तो ठरवून केलेला बुद्धिभेद असतो, हे निश्चित. विविध आक्षेपांचे खंडन करणारे पुस्तकामधले शेवटचे प्रकरणही अतिशय महत्त्वाचे आहे. या लढाईमध्ये इंग्रजांतर्फे सैनिक खंडोजी माळवदकर यांनीही मोठे शौर्य गाजवले होते आणि त्याबद्दल बक्षीस म्हणून ‘जयस्तंभा’ची निगराणी राखण्याची जबाबदारी इंग्रजांनी त्यांच्याकडे दिली. लेखक रोहन जमादार हे त्यांचे वंशज आहेत. त्यांच्या या पुस्तकाला हितशत्रूंकडून प्रचंड विरोध झाला, धमक्या दिल्या गेल्या. तसे असतानाही रोहन यांनी मोठी जोखीम पत्करून हे पुस्तक सर्वांसमोर आणले आहे. वास्तविक या पुस्तकामध्ये कुणाही व्यक्ती अथवा समाजाविरूद्ध अपमानास्पद वक्तव्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे इंग्रजांकडून शौर्य गाजवलेल्या महार सैनिकांचाही यामध्ये गौरवच केला आहे. लेखक रोहन आणि लेखन साहाय्यक सौरभ वीरकर यांनी नेटक्या स्वरुपात आणि नेमक्या शब्दांमध्ये नकाशांच्या साहाय्याने हा इतिहास आपल्यासमोर आणला आहे. इतिहासात रस असलेल्यांनी तर हे पुस्तक वाचावेच. परंतु, या ‘जयस्तंभा’शी भावना जोडलेल्या गेलेल्या सर्वांनीही ते वाचणे आणि डोकी भडकवण्यासाठी आतुर असलेल्या हितशत्रूंचा शांतपणे प्रतिवाद करणे आवश्यक आहे.
 
 
 
पुस्तकाचे नाव : १ जानेवारी १८१८ - कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव
लेखक : रोहन जमादार (माळवदकर)
प्रकाशक : भूमिका प्रकाशन
पृष्ठसंख्या : ९२
मूल्य : ५० रु
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रसाद फाटक

फर्ग्युसन कॉलेजमधून MCA शिक्षणानंतर सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी. माध्यमे, नाट्य, चित्रपट, साहित्य या विषयांत विशेष रस आणि फेसबुक, ब्लॉग आणि आता 'मुंबई तरुण भारत' या माध्यमांतून त्यावर सातत्याने लिखाण सुरू