सौ चुहे खाके...

    05-Mar-2022   
Total Views |

taliban
देशात शांतता निर्माण व्हावी, कायदा- सुव्यवस्थेचे राज्य असावे, यासाठी शहरात संशयितांच्या घरी छापे मारले गेले. संशयित कोण, तर ज्यांच्या घरात शस्त्र आहेत, ज्यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत, असे लोक! तर शहरामधील अशा लोकांच्या घरात छापे मारून सरकारने ६० हजारांपेक्षा जास्त काडतूसं, १३ सैन्य वाहने, १३ टन बारूद, मोठ्या संख्येने रॉकेट लॉन्चर आणि ग्रेनेड हस्तगत केले. इतकेच काय तर छाप्यात नऊ अपहरणकर्ते, सहा ‘इसिस’चे दहशतवादी आणि ५३ चोरांना अटक केली आहे. या सगळ्यामुळे शहर सुरक्षित होणार असून, देशातही शांतता नांदेल. इतक्या तत्परतेने शहर आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षिततेसाठी अंमलबजावणी करणारे सरकार कुठचे बरे असेल आणि ते कारवाई केल्यानंतर सुरक्षित शांत होऊ शकणारे शहर तरी कोणते? ६० हजार काडतूसं आणि सैन्य वाहनं घरातल्या छापेमारीतून जप्त व्हावीत,असे भलतेच शस्त्रप्रेमी नागरिक कुठे बरे असतील? अगदी बरोबर, हे शहर दहशतवादाच्या जाळ्यात अडकलेलच असणार आणि ते शहर म्हणजे अफगाणिस्तानातले काबुल आणि शांतता कायदा-सुव्यवस्थेसाठी इतके प्रयत्नशील असणारे सरकार आहे अफगाणिस्तानचे तालिबानी सरकार! हसायला आले ना? ओठावर एक स्मित नक्कीच विलसले असेल? मनात आले असेल, ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को।’ पण, खरच आहे, जगभरात हिंसेची दहशत माजवणार्‍या आणि अन्याय-अत्याचाराचा आगडोंब उसळवणार्‍या तालिबान्यांना आता त्यांच्या सत्तेत शांतता हवी आहे, म्हणून अशी छापेमारी आवश्यक होती. कारण, शहरात शांतता निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे जबीहुलाह मुजाहिद या तालिबानी सरकारच्या प्रवक्त्याने या छापेमारीबाबत सरकारचे मत व्यक्त केले.
रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू असताना, चीनचे आशियाई आणि आफ्रिका खंडात विस्तारवादाचे आक्रमण सुरू असताना तालिबानी सरकारने ही छापेमारी का केली असेल? त्यांना कसले भय असेल? ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणे किंवा चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक! तसेच आहे. आपण हिंसा आणि दहशतीच्या बळावर सत्ता मिळवली. हिंसेचे परिणाम लोकांवर लादले. पण, हेच परिणाम आपल्यावरही उलटू शकतात, हेच भय तालिबान्यांना वाटले असावे. असो. तर काबुलमध्ये सामान्य नागरिकांच्या घरी रणगाडे, ग्रेनेड युद्धाची वाहने कशासाठी असतील? एकट्या काबुल शहरात ५३ चोर? गुन्हेगारीचे आणि अनीतीचे प्रमाण या देशात, या शहरात का वाढले असेल? तर उत्तर सोपे आहे ते म्हणजे देशात तालिबान्यांनी अनेक दशके माजवलेली हिंसा आणि दहशतवाद. दहशतवादाला घाबरून एकही उद्योग या देशामध्ये स्थिरावला नाही, ‘आमच्या धर्मात हे नाही चालत, ते नाही चालत’ म्हणत अनेक विकासाच्या यंत्रणा इथे बंद पाडल्या गेल्या. प्रगतीच्या प्रवाहापासून हे देश कोसो दूर गेले. ही दहशतवाद्यांची गरज होती. देशाची जनता जितकी गरीब, भेदरलेली राहील तितके त्यांची पिळवणूक- अडवणूक करणे सोपे, हे तालिबान्यांचे गणित! (हेच गणित आपल्या देशात नक्षलवाद्यांचेही आहे) तर अशा पार्श्वभूमीवर तालिबान्यांसारखे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये सत्तेत आले. पण, सत्ता हस्तगत करणे आणि सत्ता राबवणे या दोन्ही गोष्टी परस्पर भिन्न असतात. त्यामुळे सत्ता हस्तगत केली. तरीसुद्धा तालिबानी सरकार म्हणून देशात सपशेल नापास झाले.
त्यातच तालिबान्यांना जगातून कोणत्याही समर्थ देशाची साथ लाभली नाही. त्यामुळे कुणाकडून मदतीची अपेक्षाही नव्हती. आता हे सगळे सुरू असताना अमेरिकेने अफगाणी सरकारच्या नावे असलेला निधी गोठवला. हा निधी दि. 9/11च्या दहशतवादी हल्ल्यात बळी ठरलेल्या अमेरिकेतील कुटुंबांच्या कल्याणासाठी अमेरिका वापरणार आहे. हा निर्णय तालिबान्यांनी वरकरणी शांतपणे स्वीकारला आहे. कारण, त्यांना जगभरात दाखवायचे आहे की, ते हिंस्र नाहीत. आपलीप्रतीमा चांगली दिसण्यासाठी तालिबानी प्रयत्नशील आहेत. पण, काबुल शहरात छापेमारी का केली? हे बोलताना काबुलच्या महिलेने सांगितले की, “ज्या लोकांचे तालिबान्यांच्या आधीच्या सरकारशी चांगले संबंध होते, त्याच लोकांच्या घरात तालिबान्यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या नावे छापे मारले आहेत.” थोडक्यात, तालिबान्यांनाही सत्ता अबाधित राखण्यासाठी, असे काहीबाही करावे लागतच आहे. असो. मध्यंतरी रशिया युक्रेन युद्धात तालिबान्यांनी सबुरीने घ्यायचा सल्ला दिला होता. या सगळ्यांमुळे तालिबान्यांबद्दल जगभरात एकच चर्चा आहे. ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.