८ मार्च 'जागतिक महिला दिन' म्हणजे महिलांच्या हक्काचा दिवस. हा दिवस कोणी सहल काढून तर कोणी विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करतात. अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संस्था देखील या दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवतात. पण यंदा केईएम रुग्णालयामध्ये केवळ महिलांसाठीच विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
"घे भरारी रक्तदानासाठी" या संकल्पनेवर आधारित जीवनदाता सामाजिक संस्था गेली दोन वर्ष महिलांना रक्तदानाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिला रक्तदानात मागे आहेत, हा शिक्का थोड्याफार प्रमाणात पुसण्यासाठी आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आणण्याचा हा प्रयत्न जीवनदाता सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येतो. मार्च २०२० ला सुरू करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमास पहिल्याच वर्षी जवळपास ४०० महिलांनी हजेरी लावली होती. या निमित्ताने महिलांची एकजूट आणि त्यांच्यातील समाजासाठी काहीतरी करण्याची भावना दिसून येते.
या महिला विशेष रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सदस्य नितीन कोलगे यांच्या मातोश्री श्रीमती सत्यवती सत्यवान कोलगे यांच्या हस्ते होणार असून ८ मार्च २०२२ जागतिक महिला दिनी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तसेच महिलांनी हा दिवस रक्तदान करून साजरा करावा, असे आवाहन जीवनदाता सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क मीनल कुडाळकर ८२०८६१४४६०
आरोही काळे ८०८२५०७१९३
विजया जाधव ८९२८५१६५३६ व रक्तपेढी समुपदेशक
कविता ससाणे ९१३७५५३७७४ यांच्याशी संपर्क साधावा.