शेट्टींचा ‘स्वाभिमान’ संकटात?

    04-Mar-2022   
Total Views |

Raju Shetti
 
 
 
राज्यात शेतकर्‍यांचा वीजप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करूनही महावितरणला जाग आलेली नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत महाराष्ट्रातील काँग्रेसचे हायकमांड होण्याच्या स्वप्नरंजनात गुंतलेले असताना, त्यांना शेतकर्‍यांच्या विजबिलांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ तरी कुठे असणार म्हणा! आता यावर ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे अध्यक्ष राजू शेट्टी खडबडून जागे झाले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात आज चक्का जाम आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. ऊर्जामंत्र्यांशी फोनवर गुफ्तगू करूनही शेट्टींचं समाधान काही झालं नाही. समाधान तरी कसं होईल म्हणा, दोन असमाधानी माणसांचा संवाद व्यर्थच की! पण, असा या शेतकर्‍यांसाठी चक्का जामची घोषणा करणार्‍या राजू शेट्टींचा आजवरचा राजकीय प्रवासही असाच तळ्यातमळ्यातला! आधी महायुती आणि नंतर जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करून सत्तेची फळं चाखणार्‍या महाविकास आघाडीच्या गोटात राजू शेट्टी सामील झाले. लोकसभेला ज्या शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी शेट्टींना धूळ चारली, त्याच सेनेच्या सरकारला त्यांनी पाठिंबा दिला. त्याचा मोबदला म्हणून राष्ट्रवादीकडून शेट्टींना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत स्थानही मिळाले. मात्र, तरीही राज्यपालांच्या पवित्र्यामुळे शेट्टींचे खासदारकीनंतर आमदारकीचे स्वप्न भंग पावले. मग काय, शेट्टी यांनी मित्रपक्षाचा वायदा विसरत थेट राज्य सरकारविरूद्धच रणशिंग फुंकले. ऊस हंगामात ‘एफआरपी’च्या विषयावरून सरकारविरोधातच आघाडी उघडली. पण, ‘एफआरपी’चे सरकारने दोन तुकडे पडल्याने शेट्टी तोंडघशी पडले आणि त्यांनी आपला मोर्चा आता शेतकर्‍यांच्या वीजप्रश्नांकडे वळवला आहे. अगदी चार महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे की नाही, याचा विचार करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा शेट्टी यांनी दिला होता. शरद पवार, अजित पवार यांच्यावरही त्यांनी शरसंधान साधत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. मात्र, पोकळ धमक्या देऊनही अद्याप शेट्टी महाविकास आघाडीच्या झोपाळ्यातच झोके घेत आहेत. आता आमदारकीसाठी तिघाडीला त्यांनी पाठिंबा दिला खरा. पण,आमदारकी लटकली आणि इकडे ‘स्वाभिमान’ संकटात सापडल्याने भूमिकाही बदलली. तेव्हा शेट्टी साहेब, स्वाभिमान सोडून हे असं वागणं बरं नव्हे!
 

उशिरा सुचलेले शहाणपण!

 
नाशिकमध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अर्थात ‘सबकुछ भुजबळ’ ठरलेले साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले खरे. मात्र, आता दिवाळीपश्चातही साहित्याचे हे धुमारे मार्च उजाडला तरीही धगधगत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी महामंडळाच्या ‘अक्षरयात्रा’ नियतकालिकातील अध्यक्षीय मनोगतातून संमेलन निमंत्रक ते आयोजकांवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. साहित्य संमेलन एकट्या भुजबळांचे झाल्याचा घणाघात त्यांनी केल्याने साहित्यविश्वातही एकच खळबळ उडाली. गंभीर बाब म्हणजे, ‘स्वागताध्यक्षापुरती एका नेत्याची परवानगी द्या. दुसर्‍या कोणत्याही नेत्याला व्यासपीठाचा वापर करू देणार नाही,’ असे आश्वासन देत फसवणूक केल्याची कबुलीदेखील खुद्द ठाले-पाटलांनीच त्यांच्या लेखातून दिली. पंचतारांकित साहित्य संमेलन घेण्याच्या नादात साहित्य महामंडळाचा हेतू व धोरणाचा बळी दिला. संमेलन उस्मानाबादसारखे साधे आणि लोकांचे व्हावे, अशी अट घालूनही त्याला फाट्यावर मारण्यात आले. संमेलन नाशिक शहरापासून २० किलोमीटर दूर भुजबळांच्या संस्थेतच ठेवण्यात आहे. त्यामुळे येण्या-जाण्याची सोय असूनही बहुतांशी नाशिककर साहित्य मेजवानीसाठी फिरकलेच नाही. तसेच, संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांनी गैरहजेरीबाबत व्यक्तीशः न कळवता स्वागत आणि साहित्य मंडळाची कोंडी करण्यात कोणतीही कसर न सोडल्याची टीकाही ठाले-पाटलांनी यावेळी केली. पण, ठाले-पाटील साहेब, संमेलन भुजबळांच्या चरणी वाहिलेलं होतं, ही बाब नवीन नाहीच. जितका प्रचार भुजबळांनी खासदारकीला आपटण्याआधी केला नसेल, तितका प्रचार त्यांनी संमेलनात करून घेतला. बोले तो सबकुछ भुजबळ! संमेलनातील पिशव्या, डायरी, पेन, बॅनर, स्टेज, बातम्या, चॅनल, ग्रंथदिंडी असं सगळं काही भुजबळ आणि भुजबळचं! इतकच काय जिथे संमेलन पार पडलं ती जागाही भुजबळांचीच! पण, भुजबळांसोबत ठाले-पाटलांचे नाव प्रत्येक ठिकाणी होतचं की! मग त्याचवेळी ठाले-पाटलांनी या सगळ्या प्रकाराला पूर्णविराम का नाही लावला? प्रसिद्धीची हौस फिटल्यानंतर आता सगळं भुजबळांवर ढकलण्यात काय अर्थ? यालाच म्हणतात, उशिरा सुचलेलं शहाणपण!!!
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.