दुटप्पी ढोंग्यांची ओरड!

    31-Mar-2022
Total Views |
sharad
 


शरद पवारांना बंधुप्रेमाची, एकतेची चिंता कधीपासून सतावू लागली? कारण, त्यांची हयात एका समाजाला दुसर्‍या समाजासमोर उभे करण्यातच गेली. हिंदूंमध्ये एकी होऊ नये म्हणून जातीयवादाला, एका विशिष्ट समाजावर आघात करणार्‍या संघटनांना, इतिहास विद्रुप करणार्‍या नवइतिहासकारांना, जाती-जातीत महापुरुषांची वाटणी करणार्‍या फुटपाड्यांना प्रोत्साहन देण्याचेच काम त्यांनी केले.
 
'द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामुळे देशातील एक विचार मारला जात असून, बंधुप्रेम संपवले जात असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच केले. अर्थात, ‘द काश्मीर फाईल्स’वरून बोंबाबोंब करणारे शरद पवार एकमेव नाहीत. त्यांच्याआधीही तथाकथित धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी वगैरे विशेषणे लावून घेणार्‍या भोंदूंनी ‘द काश्मीर फाईल्स’वरून बरळण्याचे प्रताप केलेच होते. त्याने काही फरक पडला नाही अन् ‘द काश्मीर फाईल्स’ मात्र ‘२०० कोटी क्लब’मध्ये सामील झाला, अधिकाधिक दर्शकांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र, ‘द काश्मीर फाईल्स’मुळे एक विचार मारला जात असल्याचे विधान प्रथमच शरद पवारांच्या तोंडून आले, ते महत्त्वाचे व त्याचे निराळ्या अर्थाने स्वागतही केले पाहिजे. कारण, स्वातंत्र्यापासून देशातल्या काँग्रेसी सरकारांनी सत्तेसाठी मुस्लिमांचे वारेमाप लांगूलचालन करण्याचाच विचार अंगीकारला. तोच विचार वेगवेगळ्या राज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही उचलला व दाढी कुरवाळण्यालाच प्राधान्य दिले. परिणामी, कोणी गुपचूप हिंदूंच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करो वा कोणी हिंदूंच्या मुली-महिलांवर बलात्कार करो वा कोणी हिंदूंचे खुलेआम शिरकाण करो वा कोणी हिंदूंना आपले घरदार सोडून पलायनासाठी अगतिक करो, आपले थोबाड बंदच ठेवण्याचे काम प्रत्येक काँग्रेसी, डाव्या, छद्मधर्मनिरपेक्षतावाल्यांनी वा तटस्थ, निर्भीड, निष्पक्ष माध्यमांनीही केले.
 
आज मात्र तसे राहिलेले नाही, २०१४ साली देशाचा राजकीय पट बदलला आणि त्यातूनच सारीकडे हिंदुत्वनिष्ठ-राष्ट्रनिष्ठ विचारांचा जागर होत असल्याचे दिसते. ‘द काश्मीर फाईल्स’ला मिळणारा प्रतिसाद त्याचेच प्रतिबिंब आणि त्याने तोच विचार मारला जो हिंदूंना दडपू पाहत होता, हिंदूंना उद्ध्वस्त करू पाहत होता, हिंदूंना नेस्तनाबूत करू पाहत होता. त्याचे दुःख शरद पवारांना होणे साहजिकच, कारण त्यांचा पिंड मुस्लीम तुष्टीकरण करताना हिंदूंना धुडकावणाराच होता व आहे. पण, ‘द काश्मीर फाईल्स’मुळे आतापर्यंत लपवून ठेवलेल्या हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराच्या घटना जनतेसमोर आल्या. यापुढे अशा प्रसंगांची लाटच येईल, त्यात शरद पवारांसारख्यांचा विचार आणखी कैक वेळा मारला जाईल व तसेच व्हावे, हीच इथल्या हिंदूंची, राष्ट्रनिष्ठांची इच्छा आहे, त्याचा शरद पवारांना त्रास होत असेल तर होऊ द्या.
शरद पवारांचा पुढचा मुद्दा बंधुप्रेम संपवले जात असून देशात एकता राहणार नाही, हा आहे. पण, शरद पवारांना बंधुप्रेमाची, देशाच्या एकतेची चिंता कधीपासून सतावू लागली? कारण, त्यांची अवघी हयात एका समाजाला दुसर्‍या समाजासमोर उभे करण्यातच गेली. त्यांनी कधीच राज्याला वा देशाला बंधुप्रेमाचा, एकतेचा विचार दिलेला नाही. उलट हिंदूंनी परस्परांबद्दल बंधुप्रेमाची भावना जोपासू नये, हिंदूंमध्ये एकी होऊ नये म्हणून जातीयवादाला, हिंदूंमधील एका विशिष्ट समाजावर आघात करणार्‍या संघटनांना, इतिहासाचे विद्रुपीकरण करणार्‍या नवइतिहासकारांना, जाती-जातीत महापुरुषांची वाटणी करणार्‍या फुटपाड्यांना प्रोत्साहन देण्याचेच काम शरद पवारांनी केले. त्यातलेच कितीतरी समाजविघातक लोक आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली विधानसभा अन् विधान परिषदेत आमदारकी, सरकारांत मंत्रिपदे उपभोगत आहेत.
 
खुद्द शरद पवारांनीदेखील पेशवे-छत्रपती, पगडी-पागोट्याबाबतची विधाने केली होती, ती काय बंधुप्रेम वा देशाच्या एकतेसाठी? तर अजिबात नाही; त्या माध्यमातून राज्यातील समाजा-समाजात वितुष्ट निर्माण व्हावे आणि आपली राजकीय पोळी भाजली जावी, हाच शरद पवारांचा डाव होता. त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीतील दोन समाजांत तेढ निर्माण करण्याच्या उद्योगांची जंत्री गोळा केली, तर त्यावरही ‘जातीयवादी पवार फाईल्स’ नावाचा चित्रपट तयार होईल. ते दुटप्पी ढोंगी शरद पवार ‘द काश्मीर फाईल्स’वरून आरडाओरड करतात, हा कोडगेपणा नव्हे तर काय?
 
दरम्यान, आज बंधुप्रेम आणि देशाच्या एकतेवर प्रवचन झोडणारे शरद पवार ९०च्या दशकात कुठे दडून बसले होते? त्यावेळी वा त्यानंतरही काश्मिरी हिंदूंचा छळ करणार्‍या, काश्मिरी हिंदूंची कत्तल करणार्‍या धर्मांध मुस्लिमांना बंधुप्रेमाचा, एकतेचा उपदेश करण्यासाठी ५० वर्षांचा, ६० वर्षांचा, ७० वर्षांचा अन् आता ८० वर्षांचा योद्धा मैदानात का उतरला नाही? अजूनही वेळ गेलेली नाही, काहीच महिन्यांपूर्वी इस्लामी जिहाद्यांनी जम्मू-काश्मिरातील हिंदूंना निवडून निवडून ठार मारण्याचे काम केले होते. त्या पार्श्वभूमीवर आज बंधुप्रेमाची, एकतेची भाषा करणारे शरद पवार महाराष्ट्र सोडून जम्मू-काश्मीरमध्ये झेप घेऊ शकतात. तिथे जाऊन शरद पवारांनी बंधुप्रेमाचे, एकतेचे सल्ले द्यावेत, काश्मिरी हिंदूंच्या घरावर धर्मांध मुस्लिमांनी केलेले अतिक्रमण हटवावे, हिंदूंना त्यांची घरेदारे, जमीनजुमला पुन्हा मिळवून द्यावा व एक आदर्श वस्तुपाठ निर्माण करावा. काड्या करणे, फोडाफोडी करणे वा उचापत्या करण्यातून काळवंडलेली सदैव भावी पंतप्रधान वा देशाला न लाभलेल्या उत्तम पंतप्रधान म्हणजेच शरद पवारांची प्रतिमा काही प्रमाणात नक्कीच उजळेल. आज बंधुप्रेम आणि एकतेची भाषा वापरणार शरद पवार असे काही करतील का? तर नाहीच, त्यापेक्षा ते तोंडाची वाफ दवडण्यात वेळ घालवतील अन् मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी हिंदूंनाच चार शब्द सुनावतील. पण, हिंदूदेखील त्यांना व त्यांच्या विधानांनाही लाथाडतीलच, हे शरद पवारांनी लक्षात ठेवावे.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ची प्रशंसा करण्यालाही शरद पवारांनी विरोध केला. पण, लाखो काश्मिरी पंडितांना रातोरात त्यांच्या मातृभूमीतून पिटाळून लावले, त्याचा शरद पवारांनी कधी विरोध केल्याचे दिसले नाही. आज ती वस्तुस्थिती दाखवली तर ते शरद पवारांना सहन झाले नाही. पंतप्रधानांच्या कौतुकाने एकतेत बाधा निर्माण होईल, द्वेष वाढेल, असे शरद पवारांचे म्हणणे आहे. म्हणजे, ‘इस्लामी जिहाद्यांनी नरसंहार केला तरी द्वेष पसरला नाही अन् आम्ही फक्त चित्रपट पाहिला, तर लगेच द्वेष पसरला,’ असेच शरद पवारांच्या विधानावर उपहासाने म्हणावे लागेल. अर्थात, शरद पवारांना या सगळ्यातून आपली मतपेटी शाबुत ठेवायची आहे. धर्मांध मुस्लिमांनी हिंदूंचा छळ करून जम्मू-काश्मीरची वाट लावली तरी ते शरद पवारांना चालणार आहे. एकेकाळी शरद पवारच देशाचे संरक्षणमंत्री होते, तेव्हा त्यांनी नेमके काय केले असेल, याचा अंदाजही त्यांच्या अशा भूमिकेवरून बांधता येतो. ‘द काश्मीर फाईल्स’ने विस्मरणात जाऊ शकणारा इतिहास पुन्हा जगासमोर आणला, तसाच प्रकार शरद पवारांच्या भूमिकेबाबतही होऊ शकतो, त्यावरही फाईल्स निघू शकतात. तोपर्यंत शरद पवारांना ओरड करायची असेल तर करु द्यावी, त्याने काही फरक पडणार नाही!