वनवासी कल्याण आश्रमाच्या हुशार, मेहनती कार्यकर्त्या वैशाली दिनकर देशपांडे यांची ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली. हा पुरस्कार ‘मालतीदेवी माधवराव पटवर्धन स्मृतिप्रीत्यर्थ’ दिला जातो. नुकताच पुण्यामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सध्या वैशालीताईंकडे प. महाराष्ट्र प्रांत महिला कार्य सहप्रमुख म्हणून दायित्व आहे.
जनसेवा ही ईश्वरभक्ती,
बोध यातला उमजूया,
विश्वासाने बंधुत्वाचे,
नाते सर्वा सांगूया...
‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या कार्यकर्त्यांना वैशालीताई स्वतः व त्यांचे बहुमोल कार्य परिचित आहेच, पण समाजात सर्वत्र हे कार्य पोहोचावे, असे मनापासून वाटले. आई-वडील आणि पाच भाऊ अशा कुटुंबांत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. घरात संघ प्रचारकांचे नेहमी जाणे-येणे असे. त्यांचे विचार ऐकून त्यांचे कार्य पाहून मनात एक तीव्र इच्छा निर्माण झाली होती की, असे काहीना काही काम मला पण करायचे आहे. घरातून विरोध होणार नाही, याची खात्री वाटत होती. कारण, मोठा भाऊसुद्धा विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होता.
वैशालीताई नववीत असताना त्यांचे मातृछत्र हरपले. त्या लहानपणापासून पाहत होत्या की, त्यांची आई दासबोधाचे वाचन करत असे. आई आजारी असताना वैशालीताई आपल्या आईला दासबोध वाचून दाखवत असत. पुढे तीन वर्षे त्यांनी दासबोध मंडळाचे काम केले. विविध शिबिरांचे आयोजन केले. दासबोधाचा सखोल अभ्यास केला. सध्या भगवद्गीतेचा अभ्यास सुरू आहे. देवावर श्रद्धा आहे. भक्ती करण्यावर विश्वास आहे. पण भक्तिमार्ग मात्र सर्वसामान्यांपेक्षा जरा वेगळा आहे. ’जनसेवा हीच ईश्वरभक्ती’ या उक्तीवर ठाम विश्वास आहे. वैशालीताईंचे बीएपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावी म्हणजे मूर्तिजापूरमध्ये झाले. मराठीमध्ये एमएची पदवी मात्र अकोल्याला जाऊन-येऊन मिळवावी लागली. शिक्षण चालू होते. कविता करण्याची आवड होती. लेख लिहिण्याची आवड होती. नागपूरच्या तरुण भारतमध्ये त्यांचे काही लेख प्रसिद्ध झाले आहेत. एवढेच नाही, तर पाच वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यात त्या कार्यरत होत्या.
राष्ट्र सेविका समितीच्या तर बालपणापासून सेविका होत्या.गाण्याची आवड होती. त्यातही चार परीक्षा दिलेल्या आहेत. पत्रकारितेचा अभ्यास केला आहे. अशा या गुणी मुलीने एमएनंतर दोन वर्षे शिक्षिकेची नोकरी केली. आता विवाहासाठी घरच्यांचा आग्रह सुरू झाला. अपेक्षा एकच होती, अट एकच होती की, पुढील आयुष्य समाजकार्यासाठी २००२ झोकून देण्याची तयारी असावी आणि अगदी हवा तसा जीवनाचा जोडीदार मिळालासुद्धा. संघ कार्यकर्त्यांचे घरी येणे-जाणे होते. त्यांच्या ओळखीने मध्ये दिनकर देशपांडे यांच्याबरोबर वैशालीताई यांचा विवाह झाला. दिनकर देशपांडे हे गोवा प्रांत संघटनमंत्री म्हणून कार्यरत आहेत. विवाहाच्या आधी ते भंडारा व गडचिरोली या भागात पाच वर्षे संघ प्रचारक होते. २००१ मध्ये दोघेही पती-पत्नी त्यांचा मुलगा चार महिन्यांचा असतानाच या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यात आले. गेली २१ वर्षे ते अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या सेवाभावी संघटनेचे पूर्णकालीन कार्यकर्ते आहेत. ही संघटना गेल्या ७० वर्षांपासून वनवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संपूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यात विविध आयामाअंतर्गत कार्यरत आहे. याआधी दोघेही मेळघाट, छत्तीसगढ, सिक्कीममध्ये याच कामात होते. छत्तीसगढ, रायपूरमध्ये ‘नॉर्थ-ईस्ट’च्या पहिली ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या 70 मुलींची त्यांच्यावर जबाबदारी होती. आताही त्या मुलींशी संपर्क आहे.
एका सेवाभावी संघटनेचे पूर्णकालीन कार्यकर्ते बनणे ही काही साधी गोष्ट नाही. पण या अवघड, खडतर वाटेवरचा प्रवास, प्रेमळ जोडीदाराच्या साथीने किती सोपा होऊन जातो हे यांच्यासारख्या अनेक पूर्णकालीन कार्यकर्त्या जोडप्यांना पाहून सहज पटते. एवढी साधी राहणी व त्यांचे कार्य पाहून या सर्व कार्यकर्त्यांची वैचारिक उंची किती मोठी आहे, ते जाणवते. ही उंची गाठण्यासाठी मानसिक, शारीरिक, बौद्धिक स्तरावरची ताकद पणाला लावावी लागते, म्हणजे काय ते वैशालीताईंचे ‘ब्लॉग’ वाचून कळते. हे ‘ब्लॉग’ म्हणजे स्वानुभवाचे उत्स्फूर्त वर्णन आहे. रायपूरच्या शबरी आश्रमामध्ये शिकणार्या विद्यार्थिनी असोत की, मेळघाटमध्ये विविध जनजाती-आदिवासी पाड्यांवर भेटलेल्या व्यक्ती असोत, या सर्वांबरोबर एक जीवाभावाचे नाते वैशालीताई व दिनकर यांचे जोडले गेले आहे. मुलींच्या शिक्षणासाठी वैशालीताई जेव्हा हातातील बांगड्या काढून देतात, दिनकर दारोदारी जाऊन पैसे गोळा करतात.
त्यातील एक जण ‘नॅचरोपॅथी’ डॉक्टर बनते. जर्मनीला जाऊन पुढील अभ्यास करून येते या लेकीच्या यशाबद्दल त्यांना दोघांना वाटणारा अभिमान आणि तिलाही या आई-बाबांबद्दल वाटणारी आस्था, हे वर्णन वाचून मन भारावून जाते. ईशान्य भारतात गेल्या दोन शतकांपासून ख्रिश्चन मिशनरी यांचा प्रचंड प्रभाव आहे. असे म्हणतात, देशरक्षणासाठी अथवा विस्तार वादासाठी तीन सैन्यदले कार्यरत असतात, पण इंग्रज एक चौथे दल घेऊन आले होते. ते म्हणजे, मिशनरी दल. कधी लोभाने तर अनेक वेळा भीतीने लोक धर्मांतर स्वीकारतात. अशाच एका कुटुंबाचे वर्णन वैशालीताई एका ‘ब्लॉग’मध्ये करतात.एका कुटुंबातील तीन भाऊ ख्रिश्चन धर्म स्वीकारतात, आई-वडील या धर्मांतराला विरोध करतात, निदान त्यांच्या धाकट्या मुलीला तरी धर्मांतर करावे लागू नये, या जिद्दीने आठ वर्षांच्या मुलीला रायपूरमध्ये ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या शबरी आश्रमात पाठवतात. हे वर्णन वाचताना डोळे भरून येतात. त्या पालकांच्या मनातील संघ आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांबद्दलचा विश्वास पाहून मात्र खूप अभिमान वाटतो. परत एकदा वैशालीताईंना मिळालेल्या ’समाजभूषण’ या पुरस्कारासाठी मनापासून अभिनंदन.
- मोहिनी पाटणकर