'राणा अय्युब' भारतातून काढतापाय घेणार इतक्यात...

ईडीने मुंबई विमानतळावर रोखलं!

    30-Mar-2022
Total Views |

Rana Ayyub
 
 
 
मुंबई : पत्रकार राणा अय्युब यांनी केट्टो या क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे देश सोडून जायची परवानगी नसतानाही त्या बुधवारी (दि. ३० मार्च) लंडनला जाण्याच्या तयारीत असताना मुंबई विमानतळावर त्यांना रोखण्यात आले. लुकआऊट सर्क्युलरच्या आधारे त्यांना ईडीकडून रोखण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
 
"आंतरराष्ट्रीय पत्रकारिता महोत्सवात सहभागी होण्यासाठी मी लंडनला चालले होते. मात्र मुंबई विमानतळावरच मला रोखण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाबद्दल मी कल्पना दिली होती. मात्र आज तिथे जण्यापासून मला थांबवण्यात आलं आहे.", असे राणा अय्युब यांचे म्हणणे आहे.
 
 
 
काय होतं प्रकरण?
पत्रकार राणा अय्युब यांची १ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध संपत्ती काही दिवसांपूर्वी ईडीकडून जप्त करण्यात आली. केट्टो या क्राऊड फंडिग साईटवरुन मिळवलेला मदतनिधी गैरपद्धतीनं वापरल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. हिंदू आयटी सेल या एनजीओचे संस्थापक विकास संक्रितायन यांनी हा आरोप केला होता.
 
 
 
राणा अय्युब यांनी केट्टोवर रिलीफ फंडच्या नावाखाली बेकायदेशीरपणे जनतेचा पैसा कमावला असल्याचे तक्रारीत म्हटले होते. याच आधारावर ईडीने ही कारवाई केली होती. २०२० ते २१ या काळात तीन मोहीमांसाठी राणा अय्युब यांनी केट्टो या क्राऊड फंडिग साईटवरुन निधी गोळा केला होता. आसाम, बिहार आणि महाराष्ट्रातल्या पुरग्रस्तांसाठी तसेच झोपडपट्टीवासियांना मदत म्हणून कोरोना काळातली मदत मोहीम यासाठी त्यांनी हा फंड उभा केला होता.
 
 
 
जवळपास २ कोटी ६९ लाख रुपयांचा मदतनिधी गोळा झाला असून यातले ७२ लाख स्वतःच्या नावावर, ३७ लाख बहिणीच्या खात्यात आणि १ कोटी ६० लाख वडिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचे उघड झाले होते. तसेच राणा अय्युब यांनी याच पैशातून ५० लाख रुपयांची एफडी केल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच ७४ लाख रुपये अय्युब यांनी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंड मध्ये जमा केल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
 
३१ लाख रुपये मदतीसाठी वाटण्यात आल्याचे राणा अय्युब यांनी सांगितले. पण त्यांनी प्रत्यक्षात १७ लाख रुपयांचीच बिलं दिली आहेत. त्यामुळे काही बिलं खोटी असल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले.