झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी दहिसर ते बांद्रा लाँग मार्च पदयात्रा काढणार - शेट्टी

    30-Mar-2022
Total Views |
 
 
gopal shetty
 
 
मुंबई : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी व झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकसभेचे सत्र पूर्ण झाल्यानंतर दहिसर ते वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयादरम्यान लॉंगमार्च पदयात्रा काढणार असल्याचे पत्र उत्तर भाजपचे मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
 
 
‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत अभय योजनेसंबंधी २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामार्फत ३८० अडकलेले उपक्रम आणि हजारो अन्य सरकारी जमिनींवरचे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण होणे शक्य आहे. तरीही आजपर्यंत यावर कोणतेही निर्णय झाले नसून म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येणा-या वसाहतींच्या घर विक्रीची मर्यादा १० वर्षांहून कमी केली. ही मर्यादा तीन वर्षांनी कमी केली असली तरी, खालच्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आदिवासींना पर्यायी घर देण्यासाठी मी गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न करत आहे, परंतू यावर काही ठोस कार्यवाही झाली नाही,' असे खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले.
 
 
०५ मार्च रोजी झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळावा यासाठी लोकसभेत केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना आपली व्यथा सांगितली होती आणि त्यांनी संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात लवकर यासंबंधी बैठक आयोजित करुन तोडगा काढू आणि केंद्र सरकार यासाठी संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी तयार आहे, अशी माहिती शेट्टी यांनी दिली. झोपडपट्टीवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी महानगरपालिका, एसआरए आणि म्हाडा या यंत्रणांचे लक्ष वेधून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने आणि योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने निर्देश द्यावेत, अशी अशी विनंतीही त्यांनी केली आहे.