मुंबई : भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, 'मुंबईची नवी लाइफलाईन ठरणाऱ्या मेट्रोच्या कारशेडबाबतही अशीच धोरणशून्य भूमिका घेतल्याने दिवसागणिक बसणारा कोट्यवधींचा फटका महाराष्ट्राला सोसावा लागतो आहे' अशी टीका त्यांनी केली आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या हट्टापायी महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, "केवळ मुख्यमंत्र्यांच्या अहंकार आणि हट्टापायी राज्यातील महत्वाचे प्रकल्प अडवून त्यांना स्थगिती दिल्याने विकासाला खीळ बसली आणि राज्याला त्याची किंमत मोजावी लागली हे आता तरी आघाडी सरकारला समजले असावे. क्षुल्लक स्वार्थ आणि जनतेच्या हितापेक्षाही स्वतःचा अहंकार जपण्यासाठी शिवसेनेने मूठभरांना हाताशी धरून नाणार प्रकल्पाला विरोध केला. भाजपसोबत सत्तेत असूनही प्रकल्पाची अधिसूचना रद्द करून आपण ठरवू ते धोरण अशी हट्टी भूमिका शिवसेनेने घेतल्याने कोकणाच्या विकासाचा महत्वाचा टप्पा असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अडगळीत गेला." असा टोला लगावला.
पुढे ते म्हणाले की, "आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरही शिवसेनेने आपली नकारघंटा कायमच ठेवली. केवळ नाणारच नव्हे तर मुंबईची नवी लाइफलाईन ठरणाऱ्या मेट्रोच्या कारशेडबाबतही अशीच धोरणशून्य भूमिका घेतल्याने दिवसागणिक बसणारा कोट्यवधींचा फटका महाराष्ट्राला सोसावा लागत आहे. आपल्या हट्टाची किंमत महाराष्ट्राच्या जनतेला मोजावी लागत असून विकासावरही त्याचा परिणाम होत आहे हे आता तरी ठाकरे सरकारने लक्षात घ्यावे. नाणारबाबत जसे उशिरा शहाणपण सुचत आहे, तो शहाणपणा मेट्रो कारशेडसाठीही दाखवावा." असे आवाहन त्यांनी केले आहे.
"सत्तेवर आल्यापासून ठाकरे सरकारने दाखवता येईल असे एकही काम महाराष्ट्रात उभे केले नाही. उलट फडणवीस सरकारच्या चांगल्या योजना स्थगित करून आपल्या कोत्या मानसिकतेचाच पुरावा दिला. जलयुक्त शिवारसारखी शेतकरी हिताची योजना बंद पाडली, कारशेड प्रकल्प रद्द केला, आणि नाणारवरही गंडांतर आणले. आता नाणार प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याने कोकणाला विकासाची नवी दिशा मिळणार आहे." असे त्यांनी म्हंटले.
तर, "ठाकरे सरकारला जनहिताच्या योजना राबवायच्या नसतील तर किमान केंद्राच्या पुढाकाराने सुरू असलेल्या विकास योजनांमध्ये खोडा तरी घालू नये. राष्ट्रीय महामार्गाच्या अनेक कामांत खंडणीखोर घुसल्याने रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच तशी तक्रार केली आहे. मलिदा ओरपणे बंद करा. आपल्या हातून काही चांगले होत नसेल तर किमान अन्य कोणी जे चांगले काही करत असेल त्यात अडथळे तरी आणू नका. नाणारच्या निमित्ताने राज्याच्या जनतेचे ठाकरे सरकारला हेच साकडे समजा. ठाकरे सरकारला सुबुद्धी देवो, आमची प्रार्थना." असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.