संघर्षाचे वारे अन् चर्चेची दारे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2022   
Total Views |

china
 
 
आंतरराष्ट्रीय संबंधात कोणताच देश कोणत्याही देशाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, अशी सर्वसाधारण धारणा असते. मात्र, आशिया खंडातील चीन-पाकिस्तान आणि भारत यांचे संबंध हे याला अपवाद ठरले आहेत. पाकिस्तानला वेळोवेळी मदत करून भारताला जेरीस आणण्याचा एक प्रकारचा अयशस्वी प्रयत्न चीनने अनेकदा केला आहे. मात्र, त्यास त्यात यश मिळाले नाही. त्यातच २०१४ पूर्वीचा भारत आणि आताच भारत यात आता फरक आहे. जगातील सर्वच राष्ट्रांत भारताची प्रतिमा ही एक शांतताप्रिय राष्ट्र असण्याबरोबरच सर्वंकष विकासाकडे वाटचाल करणारे राष्ट्र अशी ओळख आहे. त्यामुळे भारताच्या भूमिकेकडे आता जगाचा आवाज किंवा धारणा म्हणूनदेखील काळजीपूर्वक बघितले जाते. अशावेळी कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने भारताला डिवचण्याचा प्रयत्न करणार्‍या चीनला पुन्हा एकदा भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
  
 
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी दिल्लीत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेत भारताची चिंता ज्या स्पष्टतेने व्यक्त केली, त्यावरून भारताची कठोर भूमिका दिसून येते. पूर्व लडाखमधील वादग्रस्त भागातून चीनला आपले सैन्य माघारी घ्यावे लागेल, तरच संबंध सामान्य होण्याच्या दिशेने वाटचाल करता येईल, असा भारताने पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत पुनरुच्चार या चर्चेत केला. वांग यी गुरुवारी अचानक भारत दौर्‍यावर आले होते. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशिवाय त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली. वांग यी यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. कारण, दोन्ही देशांमध्ये दोन वर्षांपासून सीमावादावरुन बरेच मुद्दे चर्चेत आहेत. नोटाबंदीच्या काळात चीनचे वरिष्ठ मंत्री पहिल्यांदाच भारतात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यावेळी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता, तर काबूलहून ते अचानक दिल्लीत पोहोचले होते. या घटनेचा विचार करता आताही वांग यी यांचे दिल्लीत येणे, हे कदाचित चीनला सध्यातरी वाद संपवायचे आहे, याचे लक्षण मानले जाऊ शकते.
 
 
जो देश अलीकडे भारताशी थेट चर्चा करायला तयार नव्हता, त्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आता भारतात येण्यासाठी पुढाकार घेऊन मोठा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, जून २०२० मध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. यात भारताचे काही जवान हुतात्मा झाले होते. यानंतर चीनने झपाट्याने तेथे सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ दूर करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या १५ फेर्‍या झाल्या आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चर्चेच्या प्रत्येक फेरीत चीनने आडमुठी भूमिका घेतल्यामुळे गतिरोध संपण्याचे नाव घेत नाही. त्यामुळेच शुक्रवारी अजित डोवाल यांनीही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले की, सध्याची स्थिती दोन्ही देशांसाठी चांगली नाही. भारताची चिंताही रास्त आहे. कारण, चीन दोन्ही देशांमध्ये तणाव वाढविणारी विधाने आणि कृतीही करताना दिसतो.
 
 
गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या घटना समोर आल्या होत्या आणि त्यानंतर भारताने याचा तीव्र निषेध केला होता. जयशंकरही अनेक दिवसांपासून चीनच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. चीन करारांचे पालन करत नसल्याने त्यांची नाराजी अधिक आहे आणि त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडत आहे. साहजिकच आतापर्यंत चीनचा भारताशी संबंध सुधारण्याचा कोणताही हेतू नव्हता. पण, आता रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात जागतिक राजकारण झपाट्याने बदलत आहे. चीनदेखील भारताची मजबूत स्थिती जाणून आहे. अलीकडेच जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक घेतली. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर भारताने अवलंबलेल्या तटस्थतेच्या धोरणामुळे अमेरिकेसह अनेक देश अस्वस्थही झाले आहेत. त्यामुळे कुठे तरी चीननेही नरमाईची भूमिका घेतलेली दिसते. गलवान वाद कमी करून भारताप्रति मवाळ भूमिका दाखवण्याची ही मोठी संधी आहे, असे कदाचित चीनला वाटत असावे. वांग यी यांनी भारतात येऊन आपल्या समकक्षांशी झालेल्या चर्चेत भारताची चिंता समजून घेतल्या असतील, तर त्याचा परिणाम येत्या काळात दिसून यायला हवा आणि तरच त्यांचा हा ऐनवेळचा प्रवास सार्थकी लागेल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@