‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा!!!’ १९४३-४४च्या काळात नेताजी सुभाषचंद्रांचा आवाज देशाच्याच नाही, तर आशियाई देशांतील भारतीय मुलाच्या, प्रत्येक भारतीयांच्या मनामनात स्वातंत्र्याची ज्वाला पेटवत होता. हजारो भारतीय आपली घरेदारे विकून नेताजींना स्वातंत्र्यलढ्यासाठी पैसा उभा करून देत होते. महिला आपलं स्त्रीधन (सोनं, दागिने) अत्यंत विश्वासाने ‘आझाद हिंद फौजे’साठी देऊन टाकत होत्या. असेच एक स्वातंत्र्याच्या क्रांतीने भारलेले कुटुंब म्हणजे मणिपूरच्या मोइरांग येथील सिंग घराणे. हेमम नीलमणी सिंग हे सेवा समिती, मोइरांग या संस्थेचे कार्यकर्ते तर होतेच, पण अतिशय कुशाग्र बुद्धीची देणगी मिळालेले नीलमणी समाजाभिमुख, पुरोगामी आणि म्हणूनच राष्ट्रीय विचारांचे प्रणेते होते.
१९४२ पासूनच जपानी सैन्य मणिपूरला जिंकण्याचे प्रयत्न करीत होते. शेवटी मार्च १९४४ मध्ये जपानी सैन्याच्या तीन तुकड्या भारतीय हद्दीत शिरल्या. परिणामी, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मणिपूरातील म्यानमार सीमेलगतच्या चुराचांदपूर आणि फ्रझवाल जिल्ह्यांतील १७व्या ब्रिटिश रेजिमेंटला आपली ठाणी सोडून पळून जावं लागलं. दि. १४ एप्रिल, १९४४ या दिवशी नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्सव मणिपुरी समाज साजरा करीत असतानाच, स्थानिक नेत्यांच्या सहकार्य आणि संमतीने इंडो-जपानी सैन्याने मोइरांग येथे स्वतंत्र भारताचा झेंडा प्रथम फडकावला. या समारंभाला साधारण ५० लोक उपस्थित होते. त्यात हेमम नीलमणीही होते. या हृद्य प्रसंगाचे साक्षीदार झाल्यावर नीलमणी यांनी घरी येऊन वडिलांशी बोलणे केले आणि आपले राहते घर ‘आझाद हिंद फौजे’चे भारतातले पहिले प्रमुख कार्यालय म्हणून फौजेचे अधिकारी एस. ए. मलिक यांना सुपूर्द केले. अर्थात, नीलमणींचे वडील एच. थंबालिजाओ सिंगही याच घरात राहत होते. या घराची विशेषता अशी की, सुप्रसिद्ध अशा लोकतक तलावापासून ते अगदी जवळ होते. या तलावात नैसर्गिकपणेच पाणवनस्पतींची तरंगती बेटे तयार होतात. त्यामुळे ब्रिटिश सैन्यापासून काही धोका जाणवताच पळून जायला, लपायला इथे अनेक सोयीस्कर जागा होत्या. जपानी आणि हिंद फौजांसाठी भोजन व्यवस्था करणे, पुढच्या चाली खेळण्यासाठी जागोजागी संपर्क प्रस्थापित करणे, ब्रिटिश फौजेच्या गुप्त बातम्या मिळवणे,अशी कामे तरुण नीलमणी करू लागले. या सगळ्या काळात सिंग कुटुंबाने ‘आझाद हिंद फौजे’साठी रुपये २१ हजार मात्र अशी वैयक्तिक देणगी दिली. आपले धान्याचे कोठार तर त्यांनी आधीच उघडून दिले होते. ‘आझाद हिंद’चे अधिकारी त्यांना आदराने ‘सेठजी’ म्हणत असत.
पण, येणारा काळ अधिकाधिक अवघड होत चालला होता. आंतरराष्ट्रीय पटलावर जपान, इटली, जर्मनीची हार होऊ लागली होती. ताज्या दमाच्या ब्रिटिश तुकड्या हल्ल्याचा जोर वाढवू लागल्या होत्या. मे महिन्यानंतर पावसाची झोड उठत होती. जपानी सैन्याला अन्नधान्याची भयंकर कमतरता जाणवू लागली होती. म्यानमारकडून रसद मिळेनाशी झाली होती. ब्रिटिश मात्र भारतभरातून, प्रामुख्याने बंगालमधील शेतकरी वर्गाकडून लुटलेले अन्नधान्य सैन्याला सहजगत्या पुरवू शकत होते. असो. तर बिशनपूर जिल्ह्यात घडलेले हे तुंबळ युद्ध अनेक महिने चालले. नीलमणी यांचा या सर्व युद्धकाळात सक्रिय सहभाग होता. पण, दि. १५ जुलै, १९४४ नंतर हार स्पष्ट दिसू लागली. पण, शरण जाणे मणिपुरी रक्तात बसणारे नव्हते आणि ब्रिटिश तुकडीच्या हाती लागले असते, तर मरण अटळ होते. नीलमणींच्या कुटुंबालाही काही काळ लपून राहावे लागणार होते. शेवटी नीलमणी आणि काही नेतेमंडळींनी नेताजी सुभाषचंद्र बोस जिथे होते तिथे म्हणजे रंगूनला जायचे असे ठरले. भयंकर निबिड अशा जंगलातून, कोसळणार्या पावसात हा प्रवास सुरू झाला. मधल्या काळात त्यांना मलेरिया झाला. ज्या मियाँग दवाखान्यात त्यांना भरती केले होते, तिथेही बॉम्ब हल्ले सुरू झाले होते. पण, शेवटी ५८ दिवसांनंतर सगळ्या जीवघेण्या संकटांतून वाचत ते सुभाषचंद्रांना भेटले. वडिलांनी देणगी दिलेले रु. तीन हजार मात्र त्यांना सुपूर्द केले. रंगूनमधील मणिपुरी तरुणांना ‘आझाद हिंद फौजे’चे प्रशिक्षण द्यायचे काम तिथे त्यांनी सुरू केले.
हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या हल्ल्यानंतर मात्र ‘आझाद हिंद फौजे’ला शरण जावे लागले. दि. ८ सप्टेंबर, १९४५ रोजी नीलमणींनाही अटक केली गेली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले. शेवटी ऐतिहासिक ‘लाल किल्ला ट्रायल’ म्हणून ओळखल्या जाणार्या न्यायालयाच्या आदेशानंतर दि. १८ एप्रिल, १९४५ रोजी त्यांना कलकत्त्याला आणले गेले. तिथून मजल दरमजल करीत मणिपूरमधील इंफाळजवळील आपल्या गावी पोहोचायला ८ मे उजाडला होता. या सगळ्या काळात नीलमणींना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच जाणवले होते. स्वतः फारसे शिक्षित नसूनही त्यांनी पुढच्या काळात अनेक शाळा, महाविद्यालय सुरू केली. हिंदी भाषा संपूर्ण भारतीय समाजाला जोडून पुढे नेणारी आहे, असा विश्वास त्यांना वाटत असे. त्यामुळे हिंदी शिक्षणावरही त्यांचा भर होता. मणिपूरचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी पुढे अनेक वर्षे पदभार स्वीकारला. या कामासाठी त्यांना १९९५ साली ‘गंगा सरणसिंग’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. युद्धकाळात मोइरांग ही युद्धभूमीच असल्यामुळे तिथला बाजार इतर एक हजार घराप्रमाणेच नेस्तनाबूत झाला होता. त्याच्या पुनर्बांधणीचे कामही नीलमणींच्या अध्यक्षतेखाली झाले. तसेच, ‘आझाद हिंद फौजे’चे स्मारक, नेताजींचा पुतळा उभारणीचे कामही देखरेखीखाली झाले. नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतात स्वच्छ, लोकाभिमुख, लोककल्याणकारी, रक्षक अशा लोकशाही सरकारची कल्पना केली होती. नेताजींच्या या शुद्ध विचारांचा पगडा त्यांच्यावर शेवटपर्यंत होता. नेताजींचा मणिपुरातील माणूस हीच त्यांची खरी अभिमानास्पद ओळख आहे. त्या प्रेरणेतूनच त्यांनी सहकारी संस्था उभारायला सुरुवात केली. रस्ते बांधणी कंत्राटदार, बँका, महिला संघटना अशा विविध आयामांत त्यांनी सहकाराचे महत्त्व पटवून दिले. त्यासाठी संपूर्ण मणिपूरपिंजून काढले. लोकांना सहकाराच्या शक्तीची ओळख करून दिली. मणिपूरमधील सहकारी संस्थांचे प्रणेते म्हणून हेमम नीलमणी यांनाच ओळखले जाते. नेताजींच्या परिसस्पर्शाने सोने होऊन गेलेल्या या थोर नेत्याची जीवनयात्रा दि. १३ फेब्रुवारी, २००२ रोजी संपली.
- अमिता आपटे