मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडींनंतर, महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनाही आयकर विभागाने समन्स बजावले होते, अशी माहिती हाती आली आहे. या व्यवहारांसंबंधींची कागदपत्रे आणावीत आणि माझ्या आदेशाशिवाय आयकर कार्यालय सोडू नये, असा सक्त आदेश आय.टीच्या तपास अधिका-यांनी आयुक्तांना दिले होते. ही नोटीस शुक्रवारी समोर आली आहे.
१० मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता मुंबईतील सिंदीया हाऊस येथे येताना हिशोबांची पुस्तके (बुक्स ऑफ अकाऊंट) आणि अन्य कागदपत्रे स्वत: किंवा अधिकृत व्यक्तीमार्फत घेऊन येण्याचा आदेश चहल यांना बजावण्यात आला.‘या नोटिसी प्रकरणी मी आयकर विभागाने गेलो नाही, भेट दिलेली नाही तसेच या नोटीसला योग्य प्रकारे उत्तर दिले आहे. आम्ही याप्रकणी काहीही नियमबाह्य केलेले नाही, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली.
यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर एक महिन्यांपूर्वी आयकर अधिका-यांनी धाड टाकली होती. तब्बल २०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे समोर आले होते. या प्रकरणी आयकर विभागाच्या सहाय्यक संचालक विभागातील तपास अधिका-यांनी चहल यांना नोटीस बजावली असल्याचे समोर आले आहे.
कोरोना काळात मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्र्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर या धाडी टाकण्यात आल्या, असे कळते.
एप्रिल २०१८ ते मार्च २०२२ पर्यंत स्थायी समितीने जी कंत्राटे समितीसमोर मांडली आणि जी मंजूर केल्यानंतर त्याचे ठराव पारीत झाले. त्या संबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन आयकर विभागाकडे देण्याची सूचना आयुक्तांना देण्यात आली. या चार वर्षांमध्ये जी काही कंत्राटे देण्यात आली , त्या सगळ्यांमध्ये भष्ट्राचार झाला असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. ही सर्व कंत्राटे आणि कंत्राटदारांची यादी , सर्व कागदपत्रे घेऊन येण्याची नोटीस आयुक्तांना देण्यात आली.