भोपाळ: 'द काश्मीर फाइल्स' चे निर्माते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळमध्ये जेनोसाईड म्युझियम बनवण्याची विनंती केली त्याला चौहान यांनी तात्काळ होकार दिला. या भेटीदरम्यान चौहान आणि अग्निहोत्री यांनी एकत्र वृक्षारोपण सुद्धा केले त्यावेळी अनेक काश्मिरी पंडित त्यांच्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.
जेनोसाईड म्युझियम मध्ये नरसंहाराच्या स्मृती, त्यांच्याशी निगडित दस्तावेज जपले जातात. येणाऱ्या पुढील पिढ्यांना याची माहिती व्हावी यासाठी हे प्रयत्न आवश्यक आहेत या साठी अशा प्रकारचे म्युझियम देशात बनणे आवश्यक आहे. मध्यप्रदेश राज्यात 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट टॅक्स फ्री केल्याबद्दल अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्री चौहान यांचे आभार मानले. "सर्व परिस्थिती विपरीत असूनसुद्धा काश्मिरी पंडितांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले याचमुळे आज ते अनेक उच्च पदांवर कार्यरत आहेत" असे अग्निहोत्री यावेळी म्हणाले.