इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या माध्यमातून कृषिक्रांती घडविणारा उद्योजक

    25-Mar-2022
Total Views |
 

kustubh dhonde  
 
 
स्वतःच्या संकल्पनांना आकार द्यायचा असेल, तर स्वतंत्र काम करण्याशिवाय पर्याय नाही. या वृत्तीने काम करुन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून कृषिक्रांती घडविणार्‍या ‘ऑटोनेक्स्ट प्रा. लिमिटेड’च्या कौस्तुभ धोंडे यांच्या उद्यमभरारीचा आणि त्यांनी उद्योजकांना केलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा आढावा घेणारा हा लेख...
 
 
आपल्या समाजात एक सर्वसाधारण समज असा आहे की, नोकरी ही उद्योगापेक्षा सुरक्षित, तर उद्योग हा जणू एक असुरक्षित जुगार. परंतु, कौस्तुभ धोंडे या उद्योजकाचे मत मात्र अगदी याउलट. कौस्तुभ मानतात की, व्यवसायापेक्षा नोकरी करणे जास्त जोखमीचे. त्यांच्या मते, नोकरी ही दुसर्‍यांवर अवलंबून असते. त्यामुळे आपण जिथे नोकरी करतोय, ती कंपनीच जर बंद पडली, तर सगळेच अवघड ठरु शकते. पण, स्वतःची कंपनी असेल, तर आपल्या हातात खूप काही गोष्टी असतात. आपल्या सर्व संकल्पना आपण मुक्तपणे राबवू शकतो. त्यामुळे आपल्याला प्रगती करण्यासाठी नोकरीपेक्षा उद्योजक होणे, जास्त फायदेशीर ठरते. त्याचमुळे नोकरीपेक्षा उद्योजक होणे कमी जोखमीचे. म्हणूनच नोकरीपेक्षा उद्योजक होणे कधीही श्रेयस्कर असल्याची कौस्तुभ यांची ही धारणा तमाम नोकरदार वर्गालाही विचारप्रवृत्त करेल, अशीच!
 
 
 
मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढाकार घेऊन स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा करणारे कौस्तुभ धोंडे यांची कारकिर्द कौतुकास्पदच म्हणावी लागेल. 2016 साली नवी मुंबईच्या ‘डी. वाय. पाटील कॉलेज’मधून अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. अभियांत्रिकी म्हणजे मोठ्या पगाराची नोकरी, एकदम उच्चभ्रू जीवन अशी एक सर्वांची धारणा असते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून जगभरातील आर्थिक उलथापालथींमुळे एकूणच रोजगाराच्या संधी कमी झालेल्या दिसतात. तेव्हा काळाची पावले वेळीच ओळखून स्वतःचे उद्योगविश्व साकारण्याचे कौस्तुभ यांनी ठरवले आणि पदवी शिक्षण पूर्ण करून थेट व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
 
 
 
‘ऑटोनेक्स्ट प्रा. लि.’ या नावाने त्यांनी कंपनी स्थापन केली. महाविद्यालयात त्यांचा स्टार्टअप्सशी सातत्याने संबंध येत असल्यामुळे आपल्या कल्पनांना आपणच प्रत्यक्षात उतरवावे, या मानसिकतेतून कौस्तुभ यांनी व्यवसायाकडे वाटचाल सुरु केली.
त्यावेळी कौस्तुभ यांच्यासमोर त्यांच्या व्यवसायाच्या संकल्पनेला घरच्यांचा पाठिंबा मिळवणे, हे सर्वात मोठे आव्हान होते. या आव्हानाबद्दल कौस्तुभ सांगतात की, “माझ्या घरात अजिबात व्यवसायाची पार्श्वभूमी नाही. वडीलही नोकरी करणारेच. त्यामुळे घरात जेव्हा मी माझ्या व्यवसायाची संकल्पना मांडली, तेव्हा विरोधच झाला. नातेवाईक, घरातले सर्व कायम सांगायचे की, हे सर्व सोड. ‘इंटरव्ह्यू’ दे, नोकरी कर, ‘सेटल’ हो. पण, मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो आणि काम करत राहिलो. जेव्हा माझ्या व्यवसायात मला यश मिळायला लागले, तेव्हा घरच्यांचा विरोध मावळायला लागला. आता त्यांचा विरोध पूर्णपणे पाठिंब्यात रूपांतरित झाला आहे. कुठल्याही नवोद्योजकाने स्वतःला सिद्ध करणे महत्त्वाचे आहे. घरचे विरोध करणारच. कारण, ते त्यांच्या मानसिकतेच्या विरोधात ते असते, पण आपण मागे न हटता जर आपले काम करत राहिलो आणि स्वतःला सिद्ध केले तर नक्कीच घरच्यांचा विरोध मावळून तो पाठिंब्यात रूपांतरित होऊ शकतो,” असे कौस्तुभ स्वानुभवातून सांगतात.
 
 
 
कौस्तुभ धोंडे यांची ’ऑटोनेक्स्ट प्रा. लि.’ ही कंपनी प्रामुख्याने विजेवर चालणार्‍या ट्रॅक्टर्सची निर्मिती करते. पूर्वी शेतीसाठी लागणार्‍या विद्युत उपकरणांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते चार्जिंग स्टेशन्सचे. तसेच तशा प्रकारच्या कुठल्याही पायाभूत सुविधा उपलब्धही नव्हत्या. पण, कौस्तुभ यांनी जेव्हा स्वतः गावांमध्ये फिरून शेतकर्‍यांशी संवाद साधला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सुविधा उपलब्ध आहेत, पण त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर मात्र होताना दिसत नाही. पूर्वी भारनियमन किंवा वीजपुरवठाच त्या गावामध्ये नसणे या समस्या होत्या. पण, आता या समस्या बर्‍यापैकी कमी झालेल्या दिसतात. त्यामुळे आता विजेवर चालणारे ट्रॅक्टर्स हे वापरणे अतिशय सुलभ आहे आणि या ट्रक्टरच्या ‘चार्जिंग’साठी कुठलीही नवीन सिस्टीम तयार करण्याची गरज भासत नाही. ‘सिंगल फेज’ वीजपुरवठ्यावरसुद्धा हे ट्रॅक्टर्स अगदी सहज चार्ज होतात. त्यामुळे अत्यंत सुलभ असे उपकरण. एकदा संपूर्ण ‘चार्ज’ केले की, दिवसभर कामांसाठी हे ट्रॅक्टर्स वापरता येऊ शकतात. याविषयी कौस्तुभ सांगतात की, “सुरुवातीला ट्रॅक्टर्ससारखे एवढे मोठे उपकरण बनवणे खूप जोखमीचे होते. कारण, खूप मोठी गुंतवणूक यासाठी लागते. ती कमी करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा छोट्या रोबोट्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. हे रोबोट्स बनवून आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना प्रभावित करू शकलो आणि त्यामुळेच आम्ही पुढच्या काळात ट्रॅक्टर्सची निर्मिती करू शकलो.”
 
 
 
kustubh dhonde  
 
 
 
पूर्वी उद्योगजगतात असे काहीसे वातावरण होते की, आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण कोणी गुंतवणूकदार गुंतवणूक करायला पुढे येत नाही. पण, आता परिस्थिती बदलली आहे. आता बरेच गुंतवणूकदार गुंतवणूक करायला तयार असतात. पण, त्यांना बरेचदा चांगले, दर्जेदार असे उत्पादन मिळत नाही की, ज्यामध्ये ते गुंतवणूक करू शकतील. त्यामुळे आपल्याला ही दरी कमी करण्यासाठी त्यादृष्टीने काम करणे गरजेचे आहे, असे कौस्तुभ आग्रहाने सांगतात. कौस्तुभ सांगतात की, “आपण न डगमगता स्वतःवर विश्वास ठेवून काम केले पाहिजे आणि आपले उत्पादन किंवा आपला व्यवसाय लोकांसमोर आणला पाहिजे. लोकांना खात्रीशीर वाटेल, अशा स्वरूपात तो मांडला पाहिजे, तरच व्यवसाय मोठे होऊ शकतील. विशेषतः आपल्या मराठी लोकांनी ही ‘नोकरी म्हणजेच स्थिरता’ या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. व्यवसायांकडे वळले पाहिजे,” असे ते सांगतात.
 
 
 
कोरोना काळातील आपला अनुभव मांडताना कौस्तुभ सांगतात की, “आमच्या ट्रॅक्टर्सच्या उत्पादनात आम्ही नवीनच असल्याने पैसे उभे करणे, हे आमच्यापुढचे खूप मोठे आव्हान होते. आम्हाला वाटत होते की, हा काळ आमच्यासाठी खूप कठीण जाईल, पण आम्हाला एकदम उलट अनुभव आला. खूप गुंतवणूकदार इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये गुंतवणूक करायला पुढे येत होते. ‘लॉकडाऊन’च्या काळात आम्हाला ‘वर्क फ्रॉम होम’ करणे शक्यच नव्हते. तेव्हा या काळाचा सदुपयोग म्हणून आम्ही एक सायकल तयार केली. ती म्हणजे ‘इलेक्ट्रिक ट्रायसायकल.’ सायकलला अत्याधुनिक पद्धतीने, ‘इलेक्ट्रिसिटी’ची जोड देऊन तिला वेगळ्या रूपात सादर केले. हे उत्पादन एवढे लोकप्रिय झाले आहे की, मुंबई महापालिकेकडून आम्हाला हजार सायकल्सची ऑर्डर मिळाली आहे.”
 
 
 
“काळ कायमच बदलत असतो. जे आज चांगले आहे, ते कदाचित उद्या कालबाह्य ठरु शकते. अशीही वेळ येऊ शकते की, आपल्याला आपला संपूर्ण व्यवसायच बदलावा लागू शकतो आणि हे काही नवीन नाही. सगळेच मोठे-मोठे उद्योजक हे करत आले आहेत आणि आपल्यालासुद्धा हे करावेच लागेल,” इतका साधा संदेश कौस्तुभ देतात. परिस्थिती बदलतच राहणार आहे, त्यानुसार आपण बदलणे गरजेचे आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये नवी संधी दडलेली असते, आपल्याला ती शोधायची असते. आपण जर हे करू शकलो, तरच आपण कुठल्याही परिस्थितीत टिकू शकू. प्रत्येकाला आपली संकल्पना चांगलीच वाटत असते, पण खरोखरच त्यातून कुठला व्यवसाय उभा राहू शकतो का? याची आपण आधी माहिती गोळा केली पाहिजे. आज सोशल मीडियासारखी साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून आपण अगदी कमी किमतींमध्ये त्यांचा आपल्या उत्पादनांसाठी वापर करू शकतो. आपण आधी आपल्या उत्पादनाचा सर्व्हे केला पाहिजे. आपल्या उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकता. व्यवसाय उभारताना आपल्याला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज लागली तर ती घ्या. आपल्या उत्पादनाने खरेच काही चांगले काम होणार आहे का? लोकांना फायदा होणार आहे का? याची माहिती सर्वप्रथम मिळवा. लोकांना आवडेल अशा पद्धतीने जर लोकांपर्यंत आपण आलेले उत्पादन पोहोचवले तर आपल्याला त्यातून व्यवसाय उभा करायला काहीच अडचण येणार नाही. इतक्या साध्या-सोप्या गोष्टींमधून व्यवसायाची कहाणी सांगणारे कौस्तुभ धोंडे यांचा उद्ममशील प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.
 
 
- हर्षद वैद्य