तिमिरातुनी तेजाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2022   
Total Views |

Satyavan Redkar
 
 
 
शासकीय कर्मचार्‍यांचे गाव घडविण्याचा ध्यास बाळगून शैक्षणिक चळवळ उभारणार्‍या सत्यवान यशवंत रेडकर या अवलिया तरुणाविषयी...
 
 
 
नववी इयत्तेत नापास झालेला विद्यार्थी पुन्हा त्याच वर्गात बसून पहिला क्रमांक पटकावतो आणि वयाच्या पस्तिशीत एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ पदव्यांचा धनी होतो. ही तिमिरातून तेजाकडे स्वप्नवत वाटचाल आहे सत्यवान रेडकर या तरुणाची. मुंबईतील घाटकोपरमध्ये जन्मलेल्या सत्यवान यांचे बालपण कुर्ला बैलबाजारसारख्या झोपडपट्टीत दहा बाय दहाच्याभाड्याच्या खोलीत गेले. तेथेच राहून त्यांनी शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी सकाळी रिक्षा धुण्याच्या कामापासून ते सुट्टीच्या दिवसात कॅटरींग सर्विसमध्ये वेटरचेही काम केले. क्लास किंवा शिकवण्या लावण्याची ऐपत नव्हती.तरीही शिकण्याची ओढ आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर २००८ ते २०१० या दोन वर्षांत ६० ते ७० शासकीय परीक्षा देऊन शासकीय अधिकारी बनण्याचा संकल्प तडीस नेला. आजवर त्यांनी भरपूर स्पर्धा परीक्षा दिल्या. परंतु, त्यांनी कोणताही क्लास लावला नाही. स्वअध्ययनाने सर्व शैक्षणिक व स्पर्धा परीक्षेतील यश प्राप्त केल्याने कमी वयात चांगल्या पदावर पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. २०१० साली पवई येथील ‘आयआयटी’मध्ये कनिष्ठ प्रशासनिक साहाय्यक पदावर शासकीय नोकरीत श्रीगणेशा केला. त्यानंतर इतर परीक्षा देत असतानाच २०१७ या वर्षीच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’च्या परीक्षेत कनिष्ठ अनुवाद अधिकारी या पदासाठी नशीब आजमावले. या परीक्षेत संपूर्ण भारतातून ३२३ उमेदवारांच्या निवड यादीत १६६व्या क्रमांकावर खुल्या प्रवर्गात त्यांची निवड होऊन ‘कस्टम्स’ म्हणजेच मुंबई सीमाशुल्क विभागात ते रुजू झाले. सरकारी नोकरीमुळे जीवनात स्थैर्य आले. तरीही आपल्या कार्यकर्तृत्वाचा डंका बडवत न बसता नि:स्पृह वृत्तीने इतर होतकरू विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी मोफत मार्गदर्शन करण्याचा विडा उचलला.
 
 
 
सत्यवान रेडकर यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मु.पो. बोरभाटवाडी, कवठणी. त्यामुळे आपल्या उच्चशिक्षणाचा लाभ इतरांना व्हावा, किंबहुना सामाजिक दायित्वाची क्रांती कोकणातूनच घडवण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी, ’तिमिरातुनी तेजाकडे’ या शासकीय कर्मचार्‍यांचे गाव घडविण्यासाठी राबवित असलेल्या ज्ञानदानाच्या शैक्षणिक चळवळीची सुरुवात केली. स्पर्धा परिक्षांसंदर्भात मार्गदर्शन करणारी निःशुल्क व्याख्याने ते गावोगावी देऊ लागले. व्याख्यानासाठी मानधन सोडाच, पण साधा प्रवासखर्चही घेतलेला नाही. २०१९ ते २०२२ या कालावधीत स्वतःची नोकरी सांभाळून तब्बल ८४ व्याख्याने दिल्याचे ते सांगतात. नोकरीत मिळणार्‍या सुट्ट्यांचा वापर समाज प्रबोधनासाठी व शैक्षणिक परिवर्तनासाठी केला जाऊ शकतो, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर शोक व्यक्त करीत न बसता वडिलांना श्रद्धांजली म्हणून लागलीच त्यांनी कोकणसह पालघर, त्र्यंबकेश्वर, अहमदनगर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले. वेळेचा अभाव असल्याकारणाने महाराष्ट्रभर व्याख्याने घेता येत नसली तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी वैयक्तिक सुट्टी काढून सर्वत्र व्याख्याने देण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे.
 
 
 
‘जिथे उभा राहीन तिथे चिंतन, जिथे मार्गदर्शन करेन तिथे परिवर्तन’ हे त्यांचे ब्रीदवाक्य. तेव्हा, झोपडपट्टीत आपण जे भोगले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, यासाठी स्वकर्तृत्व, मार्गदर्शन, वैयक्तिक संवाद, चर्चा, सोशल मीडियाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी नवचैतन्य निर्माण करीत आहेत. यासाठी त्यांनी ‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही सामाजिक संस्था सुरू केली असून, या संस्थेच्या माध्यमातून शासकीय कर्मचार्‍यांचे गाव घडविण्याची संकल्पना आखली आहे. कोकणातील सर्व तालुक्यांतील सरपंच, जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांचा ‘डाटा‘ गोळा करून त्यांचे स्वतंत्र समूह बनवले आहेत. त्यांच्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका स्वरुपात जनजागृती करण्यास तसेच, वैयक्तिक संपर्क करून प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने व्हॉटसअ‍ॅप, टेलिग्राम समूह निर्मित केले. त्यात मिळणारी माहिती जरी ‘कॉमन’ असली तरी जाहिरातींच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांवर फोन तसेच मेसेजच्या माध्यमातून निराकरण करण्याचे, विविध मार्गाने प्रबोधन करण्याचे कार्य सुरू केले. त्यांच्या या विविध सेवांचा चांदा ते बांदापर्यंतचे विद्यार्थी लाभ घेत असल्याचे ते सांगतात. केवळ ‘युपीएससी’, ‘एमपीएससी’ यासारख्या खर्चिक स्पर्धा परीक्षांच्या मागे न धावता विविध शैक्षणिक अर्हतेच्या अनुषंगाने अ, ब, क, ड गटातील शासकीय पदांवरही निवड होऊन आपले शासकीय करिअर सुरू करता येते ही संकल्पना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवली आहे. मार्गदर्शनासाठी कोणतेही मानधन न घेणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, मार्गदर्शक अधिकारी असलेल्या सत्यवान रेडकर यांच्या संस्थेप्रमाणे त्यांचा ९९६९६५७८२० हा मोबाईल क्रमांकही अनेकांच्या संग्रही असल्याने त्या सर्वांना ते शासकीय नोकरीतील संधीबाबतमार्गदर्शन व शंकानिरसन करीत असतात. अशा या हरहुन्नरी समाजपयोगी अधिकार्‍याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@