जम्मू-काश्मीरमध्ये ५८ हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प

केंद्र सरकारची लोकसभेत माहिती; दहशतवादी घटनांमध्येही घट

    23-Mar-2022
Total Views |

rai 
 
 
 
नवी दिल्ली : “केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये १५ मंत्रालयांशी संबंधित ५३ प्रकल्प राबवित आहे. त्यामध्ये रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, कृषी, कौशल्य विकास इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश असून त्यासाठी ५८ हजार, ४७७ कोटी रूपये खर्च केला जात आहे. या प्रकल्पांपैकी आतापर्यंत २५ प्रकल्प पूर्ण झाले आहेत,” अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत मंगळवारी दिली. ते म्हणाले की, “पंतप्रधान विकास पॅकेज-२०१५ अंतर्गत जम्मू - काश्मीर केंद्रशासित प्रदेशमध्ये (युटी) राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीला वेग आला आहे.


प्रदेशाच्या औद्योगिक विकासासाठी २०२१ साली एक नवीन केंद्रीय क्षेत्र योजना अधिसूचित करण्यात आली आहे, ज्याचा खर्च रु. २८,४०० कोटी रूपये आहे. त्यामुळे साडेचार लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. त्याचप्रमाणे व्यवसाय पुनरुज्जीवन पॅकेज अंतर्गत 1 हजार ३५२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत,” अशी माहिती केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी दिली.
“दीर्घकाळपासून प्रलंबित असलेल्या १ हजार ९८४ कोटी रुपयांपैकी १ हजार १९३ कोटी रूपयांचे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामध्ये २० वर्षांहून अधिक काळ अपूर्ण असलेले ५ प्रकल्प, १५ वर्षांहून अधिक काळ आणि १० वर्षांहून अधिक काळातील १६५ प्रकल्पांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे २०२०-२१ या वर्षात १,६३८ कोटी रुपये खर्चून १,२८९ रस्ते बांधणीची कामे पूर्ण करण्यात आली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आतापर्यंत १४,५०० किमी रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, ज्याने सुमारे २,००० ठिकाणे जोडली आहेत. त्याचप्रमाणे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसह आयआयटी आणि आयआयएमचीही स्थापना करण्यात येत आहे,” असे राय यांनी यावेळी सांगितले.