नवी दिल्ली : दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी राजस्थानमधील कोटा येथील चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे कोटा येथे एक महिन्यासाठी ‘कलम १४४’ लागू करण्यात आले आहे. ‘कलम १४४’ मंगळवारपासून लागू झाले असून ते २१ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. राजस्थान सरकारकडून ‘द काश्मीर फाईल्स’चे यश रोखण्याचा हा प्रयत्न आहे का, असाही सवाल विचारण्यात येत आहे.
‘कलम १४४’ लागू करण्यात आल्याने आता कोटा जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकणार नाहीत. यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे कोटामध्ये जातीय तणाव निर्माण होण्याची भीती कोटा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली होती. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी राजकुमार सिंह यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे आता महिनाभर कोटा शहरात मिरवणूक किंवा निदर्शनेही करता येणार नाहीत.
दरम्यान, भाजपने या निर्णयाविरोधात सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे उपनेते राजेंद्र राठोड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या चित्रपटाचे देशभरात सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी लोकांमध्ये असलेला उत्साह स्पष्टपणे पाहायला मिळतो. ‘कलम १४४’ लागू करण्याचा प्रशासनाचा निर्णय दुर्दैवी आहे. कारण कोटातील नागरिकांनी हा चित्रपट पाहू नये, यासाठीच हा निर्णय घेतला आहे,” अशी टीका भाजपने केली आहे.