शहाणपण देगा देवा...

    22-Mar-2022
Total Views |
         
icc  
 
 
 
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आधीच काळजी घेणे नेहमी हिताचे असते. एखादा प्रकार घडल्यानंतर त्यावर उपाययोजना करणे, यापेक्षा ते घडू नये यासाठी आधीच दक्षता घेणे यातच खरे शहाणपण असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळपट्ट्यांच्या बाबतीत सध्या असाच काहीसा विचार करण्याची गरज असल्याचे मत अनेक क्रिकेट समीक्षकांचे आहे. कारण, बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान खेळपट्टीवरून ‘आयसीसी’ने ताशेरे ओढल्याचे ऐकिवात आले. या सामन्याचे सामनाधिकारी (मॅच रेफ्री) जवागल श्रीनाथ यांनी दिलेल्या अहवालानुसार ही खेळपट्टी सरासरीपेक्षाही वाईट होती. सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच चेंडूला वळण मिळत होते. मुख्य म्हणजे सामन्यादरम्यान गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये समान लढतच रंगली नसल्याचेही श्रीनाथ यांनी म्हटले. ‘आयसीसी’ची मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेता ही खेळपट्टी सरासरीपेक्षाही वाईट असल्याचे श्रीनाथ यांनी सांगितले. या सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्धी श्रीलंकेच्या संघाविरूद्ध २३८ धावांनी विजय मिळवत मालिकेत दोन-शून्य असे निर्भेळ यश मिळविले. भारतापुढे श्रीलंकेचा काहीच निभाव लागू शकला नाही. ही कसोटी पार पडल्यानंतर सामनाधिकार्‍यांनी जवळपास आठवडाभराच्या अवधीनंतर ‘आयसीसी’कडे खेळपट्टीबाबत अहवाल सुपूर्द केला. त्यानंतर ‘आयसीसी’ने याबाबत दंडात्मक कारवाई केली. परंतु, प्रश्न हा उपस्थित होतो की, जर खेळपट्टी सरासरीपेक्षा वाईट होती, तर सामना खेळण्याआधी ‘आयसीसी’कडून याबाबत काहीच का कार्यवाही करण्यात आली नाही? क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच हा प्रकार घडला असे नाही. यापूर्वीही अनेक देशांमध्ये असे प्रकार घडले आहेत. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकत्याच खेळल्या गेलेल्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या या खेळपट्टीलाही ‘आयसीसी’ने सरासरीपेक्षा कमी दर्जा दिला होता. अनेकदा तर खेळपट्टी घातक ठरल्याचे पाहायला मिळाल्याने सामनेही अर्ध्यावरच रद्द करावे लागल्याचे प्रकार क्रिकेट विश्वात घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार घडण्यापूर्वीच ‘आयसीसी’ने यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांचे आहे. सामन्यानंतर दंडात्मक कारवाईपेक्षा सामना सुरू होण्यापूर्वीच असे प्रकार टाळण्यासाठी दक्षता घेण्याची कार्यवाही करणे उचित ठरेल, असा इशारा क्रिकेट समीक्षकांनी दिला आहे.
 
 
आधी मौनव्रत का?
 
 
नुकत्याच पार पडलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारताने श्रीलंकेला दोन-शून्य अशा फरकाने पराभूत करत आपली निर्भेळ यशाची मालिका सुरूच ठेवली. कसोटी मालिकेआधी भारताने श्रीलंकेला तीन सामन्यांच्या ‘टी-२०’ मालिकेतही तीन-शून्य अशा फरकाने पराभूत केले. श्रीलंकेला भारत दौर्‍यावर एकाही सामन्यामध्ये विजय मिळविता आला नाही. बंगळुरू येथे अखेरच्या कसोटी सामन्यामध्ये भारताने तब्बल 238 धावांनी विजय मिळवत श्रीलंकेला नामोहरम केले. संपूर्ण दौर्‍यात एकाही सामन्यामध्ये भारतापेक्षा वरचढ ठरू न शकलेल्या श्रीलंकेच्या संघावर चौफेर टीकाही झाली. परंतु, असे असतानाच श्रीलंकेतील काही क्रिकेट समीक्षकांनी बंगळरू येथील सामन्याच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या समीक्षकांनी खेळपट्टीवर आक्षेप नोंदवल्यानंतर ‘आयसीसी’नेही याबाबत कार्यवाही करत सामनाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला आणि याबाबत दंडात्मक कारवाई केली. खरे तर गोलंदाजी, फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण असो आदी सर्व आघाड्यांवर श्रीलंकेचा संघ निष्प्रभ ठरल्याचे या सामन्यात पाहायला मिळाले होते. परंतु, त्यानंतरही काही समीक्षकांनी खेळपट्टीचा दर्जा सरासरीपेक्षा कमी असल्यानेच श्रीलंकेचा संघ अपेक्षित कामगिरी करू न शकल्याचा जावई शोध लावला. परंतु, केवळ बंगळुरूच नव्हे, तर याआधी पार पडलेल्या मोहाली कसोटी सामन्यामध्येही भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला होता, हे जणू काही ते विसरले की, काय असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. मोहाली कसोटीतही भारताने २२२ धावांनी श्रीलंकेविरूद्ध विजय मिळविला होता. तसेच, जर खेळपट्टी सरासरीपेक्षा वाईट होती, तर सामना खेळण्याआधी याबाबत आक्षेप का नोंदवण्यात आला नाही, याचेही उत्तर खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित करणार्‍यांनी खरे तर द्यायला हवे. सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे प्रशिक्षक, कर्णधार, खेळाडू, संघ व्यवस्थापक, मेन्टार आदींकडून पाहणी केली जाते. यांसोबतच सामनाधिकार्‍यांकडूनही खेळपट्टीचा आढावा घेतला जातो. इतकेच नव्हे, तर या सामन्यांचे समालोचन करणार्‍या चमूंपैकी काही तज्ज्ञ मंडळींकडून या खेळपट्टीबाबत विश्लेषण केले जाते. या सामन्यातील खेळपट्टी कशी आहे, याबाबत मार्गदर्शन केले जाते. यादरम्यान कोणीही या खेळपट्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. परंतु, सामना संपल्यानंतर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हे कितपत योग्य आहे? याचाही विचार करणे गरजेचे आहे.
 
- रामचंद्र नाईक 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.