बचतगटवाल्या ताई : रूची माने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2022   
Total Views |

Ruchi Mane
 
 
 
महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य करणार्‍या रूची माने. बचत गट आणि प्रशासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल केला. त्या कार्याचा मागोवा...

 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. पण त्या योजना महिलांपर्यंत नेणे, त्यांची कार्यवाही करणे, त्यासाठीच्या नियमावलींची पूर्तता करणे हेसुद्धा एक मोठे काम आहे. त्यासाठी कामाचे नियोजनबद्ध सातत्य सगळ्यांनाच जमते असे नाही. अभ्यास, मेहनत, सातत्य आणि समाजाचा विकास हे लक्ष्य असणारी व्यक्तिच या कार्यात यशस्वी होते. अशा मुठभर मोजक्या व्यक्तिंपैकी एक आहेत बोरीवलीच्या रूची माने. रूची माने आणि उत्तर मुंबईमधील महिला बचत गट, शासकीय योजनांद्वारे समाजाचे उत्थान हे समीकरण तयार झाले आहे. पाणीवाल्याबाई म्हणून मृणाल गोरेंना ओळखले जाई. तशीच रूची माने यांची ‘बचत गटवाली ताई’ म्हणून समाजात ओळख आहे. रूची यांच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याचे महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीदेखील अभिनंदन केले. रूची यांचे हे अभिनंदन म्हणजे ‘आधारीका’, ‘परिवर्तन’ आणि ‘कल्याणी समाज विकास संस्था’च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या शेकडो बचत गटांच्या यशस्वी कार्यालाही होते. रूची यांनी २००८ सालापासून बचत गट बांधायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी बचत गट म्हणजे काय? यापासून त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. बोरीवलीच्या गल्लीबोळात जाऊन गरीब महिलांचे एकत्रिकरण केले, पहिल्याच वर्षी बचत गटांना अनुदान मिळवून दिले. बचत गट बनवणे आणि त्यात महिलांचा सहभाग टिकवून ठेवणे, सहभागी महिलांचा विश्वास संपादन करणे हे कठीण काम असते. या पार्श्वभूमीवर रूची यांच्या कार्याचे वैशिष्ट्य उठून दिसते. ते म्हणजे २००८ ते आज २०२२ इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत रूची यांनी बचत गटाच्या महिलांशी संपर्क, संवाद आणि स्नेह कायम ठेवला आहे. तो स्नेह इतका आंतरीक आहे की, या शेकडो बचतगटातील महिलांना कोणतीही समस्या आली तरी त्या समस्यांसाठी मार्गदर्शक म्हणून त्या रूची यांनाच पाहातात. बचत गट किंवा बचत गटांच्या समन्वयातून निर्माण झालेल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये रूची यांना कोणतेही पद नाही. तरीसुद्धा या महिलांना विविध शासकीय प्रणालीतून प्रशिक्षित करणे, त्यांच्यासाठी शासकीय योजना आणणे, त्यातून महिलांना रोजगार मिळवून देणे हे काम रूची करतात. गेली १४ वर्ष हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळेच तर शेकडो बचत गट उभे राहिले आणि त्यांच्या प्रशासकीय स्तरावर संस्था निर्माण झाल्या. रूची यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने १५०० महिलांना ‘मुद्रा योजनां’चा लाभ मिळाला, १३०० महिलांना ब्युटिपार्लर आणि तत्सम प्रशिक्षण मिळाले आणि त्या आत्मनिर्भर झाल्या. तसेच, ३५० वृद्ध निराधार महिलांना ‘पेन्शन योजने’चा लाभ रूची यांनी मिळवून दिली. रूची यांनी बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांच्या जीवनात आशेचा किरण आणि स्थैर्य आणले. काल-परवाच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये देशभरातील महिलांसाठी बचत गटाबाबत प्रशिक्षण आयोजित केले गेले होते. त्यावेळी रूची यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावण्यात आले होते. जमिनीशी जोडलेले राहून काम केल्यामुळे रूची यांचे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले यात नवल ते कसले?
 
 
 
असो, केवळ बचत गटांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या महिलांसाठी रूची यांनी इतके कष्ट का घेतले असावेत? तर याचे उत्तर त्यांच्या जीवनाचा मागोवा घेताना कळते.रूची यांचे माहेर चिपळून जामसूदचे. जामसूद गावचे साळवी कुटुंब कामानिमित्त मुंबईत स्थाईक झाले. वसंत साळवी आणि स्मिता साळवी यांना दोन अपत्ये. त्यापैकी एक रूची. मध्यमवर्गीय सुसंस्कारी कुटुंब. रूची यांचे बालपण अत्यंत सुखात गेले. वाणिज्य शाखेतून पदवी, पुढे ‘एमबीए’पर्यंत शिक्षण घेतलेल्या रूची यांचा विवाह पोलीस क्षेत्रात असलेल्या अनिल माने यांच्याशी झाला. त्यांनतर रूची यांच्या आयुष्यात-विचारात अमुलाग्र बदल झाला. अनिल हे रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. पोलीस ठाण्यात असंख्य तक्रारी येत. या सगळ्या तक्रारी, गुन्हे ते कायद्याच्या चौकटीत राहून सोडवतच. पण मानवी संवेदनशीलतेने ते पीडितांना सहकार्य करत. अनिल याबद्दल रूचींसोबत चर्चा करत. हे सगळे ऐकून रूची यांना वाटे की, आपले आयुष्य इतके संपन्न आणि सुरक्षित आहे. पण या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याच भगिनी किती अस्थिर जीणे जगत आहेत. त्यांच्यासाठी काही तरी करायला हवे. याच काळात त्यांना स्थानिक भाजप नेत्यांनी बचत गटासंदर्भात काम करण्याचे सुचविले. रूची यांनी ही सूचना मनापासून मान्य केली. त्यानंतर रूची यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी स्वतःला अक्षरशः वाहून घेतले. त्या कार्यातून त्यांनी हजारो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक आमुलाग्र बदल केला. मात्र, एक महिला निस्वार्थीपणे काम का करत असेल? या विचारांनी समाजातील काही प्रस्थापित अस्वस्थ झाले. सामाजिक काम करताना रूची यांना अडथळे यावेत यासाठी त्या एक-दोन लोकांनी प्रयत्न सुरू केले. पण सत्याला अंत नसतो. महिला सक्षमीकरण करण्यामध्ये रूची यांचा स्वत:चा असा काही स्वार्थ नव्हताच. ना पैशाचा ना सत्तेचा. त्यामुळे त्यांना सेवाकार्यापासून दूर करणार्‍यांचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत. त्याउलट त्यांचे महिला सक्षमीकरणाचे कार्यक्षेत्र पहिल्यापेक्षा जास्त विस्तारले. या सगळ्या काळात रूची यांचे पती अनिल माने यांचा त्यांना खूप आधार होता आणि आहे. तसेच, रूची यांची श्री स्वामी समर्थ महारांजावर खूप श्रद्धा आहे. रूची म्हणतात की, “स्वामी म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरोखरच स्वामी प्रत्येकवेळी मला मार्ग दाखवतात. ध्येय पूर्ण करण्याची ताकद देतात.” असो, सश्रद्ध असलेल्या आणि कोणत्याही प्रसंगात आपल्या महिला सक्षमीकरण या ध्येयापासून तसूभरही न ढळलेल्या रूची माने या आधुनिक महिला शक्तीचे प्रतीकच आहेत.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@