मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत आज विरोधीपक्षातर्फे विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार ॲड आशिष शेलार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. त्यावर सरकार याबाबत अधिवेशन संपण्यापुर्वी निवेदन करुन आपली भूमिका मांडेल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
राज्यात एसटीचा संप बेमुदत सुरू असून या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १०० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच अन्य कर्मचारी उदरनिर्वाह करण्यासाठी वेठबिगार म्हणून काम करतो आहे, ट्रक चालवतो आहे. तसेच एसटी बंद असल्यामुळे शेतकरी, कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. तसेच आता परिक्षा सुरू होत असून विद्यार्थी परिक्षा केंद्रापर्यंत कसे पोहचणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
न्यायालयात तारखांवर तारखा पडत असून याबाबत सरकारकडून ही कोणताही तोडगा निघत नाही. उलट पक्षी सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना धमकी देऊन आम्ही तुम्हाला कामावरुन कमी करू. दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी भरु असे करीत आहेत. त्यामुळे हा विषय राज्यातील जनतेच्या दृष्टीने महत्वाचा व जिव्हाळयाचा असल्याने आजचे सभागृहाचे कामकाम बाजूला ठेवून याबाबत चर्चा करावी, अशी मागणी करीत भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. पण अध्यक्षांनी तो नाकारला त्यामुळे भाजप आमदार आक्रमक झाले.
जोरदार घोषणाबाजी करीत वेलमध्ये उतरु लागले. त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करावे अशी मागणी झाली. अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सरकारच्या वतीने उत्तर देताना हे अधिवेशन संपण्यापुर्वी सरकार याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल असे त्यांनी जाहीर केले.