पर्यावरणाची दूरदृष्टी असलेला वृक्षप्रेमी संजय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2022   
Total Views |

Sanjay Chavan
 
 
 
पर्यावरणजतनासाठी वृक्षलागवड केली पाहिजे, असे अनेकांना वाटते. पण, त्या वाटण्यातून प्रत्यक्ष वृक्षलागवडीपर्यंतचा प्रवास करणार्‍या संजय चव्हाण यांच्याबद्दल जाणून घेऊया...
 
 
 
कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे वृक्षारोपण किती गरजेचे आहे, ही बाब सगळ्यांच्याच लक्षात आली. शहरी भागातदेखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाले पाहिजे, असे वाटू लागले. त्यासाठी डोंबिवलीतील ‘जिवलग मित्र परिवारा’ने पुढाकार घेतला. त्यापैकीच एक म्हणजे संजय सखाराम चव्हाण. त्यांच्या कार्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप. संजय चव्हाण यांचा जन्म भांडुप येथे झाला. त्यांचे सगळे बालपण कांजुरमार्ग येथील महाराष्ट्र नगरमधील चाळवजा घरात गेले. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांप्रमाणेच त्यांचेही बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये झाले. त्यांना क्रिकेटची विशेष आवड होती. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षापासून ते क्रिकेट खेळत होते. घराच्या समोर असलेल्या मैदानात ते नियमित किक्रेट खेळत होते. त्यांच्या घरात क्रिकेटचा वारसा नसला, तरीही ते उत्तम क्रिकेट खेळतात. त्यांची ही आवड ते आजसुद्धा जपून आहेत. त्याकाळची परिस्थिती आणि वातावरण यामुळे त्यांनी क्रिकेटचे शास्त्रोक्त प्रशिक्षण कधी घेतले नाही. त्यांच्या वडिलांनी डोंबिवलीत घर घेतले. त्यामुळे ते डोंबिवलीत राहायला आले. महाविद्यालयीन शिक्षण घराजवळच्या महाविद्यालयात घ्यावे, यासाठी त्यांनी पेंढरकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. पेंढरकर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. नोकरी करण्यात संजय यांना फारशी आवड नव्हती. व्यवसाय करायचा, हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. त्यामुळे त्यांनी नोकरी कधीच केली नाही. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तीन वर्षे मित्रांसोबत विविध उद्योगांत आपले नशीब आजमावून पाहिले. त्यानंतर त्यांनी दुग्धविक्रीचा व्यवसाय सुरू केला. मध्यंतरीच्या काळात त्यांनी हॉटेल-व्यवसायही मित्रांसोबत ‘पार्टनरशिप’मध्ये केला होता. मात्र, त्या व्यवसायात त्यांना जम बसविता आला नाही. त्यामुळे त्यांनी हॉटेल व्यवसायाला कायमचा रामराम ठोकला. संजय हे डोंबिवली दुग्ध वितरक संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. दुग्ध व्यवसायासोबतच ते सध्या पाणी आणि कोल्ड्रिंक वितरक म्हणूनही काम करीत आहेत.
 
 
 
संजय हे महाविद्यालयामध्ये असताना त्यांच्या मित्रांचा एक मोठा ग्रुप होता. हे सर्वजण एकत्र येऊन किक्रेटही खेळत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र सर्व मित्र वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले होते. कोणी परदेशात, कोणी मुंबईत गेले. त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्र केले. या सर्व मित्रांनी एकत्र यावे, यासाठी त्यांनी ‘जिवलग मित्र परिवारा’ची स्थापना केली. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा सामाजिक काम करण्याच्या उद्देशाने ते सर्व मित्र एकत्र येतात. एकूण ६५ जण या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येतात. प्रत्येक ‘इव्हेंट’ला प्रत्येकाला येणे शक्य होते असे नाही, पण जितक्यांना शक्य होते तेवढे सगळे एकत्र येतात. कोणत्याही प्रसंगात हे सर्व मित्र एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. केवळ मित्रांच्या नव्हे, तर समाजाच्याही सुख-दु:खात एकत्र यावे, यासाठी त्यांनी सामाजिक कार्याचादेखील वसा हाती घेतला आहे. कोरोना काळात या मित्र परिवाराने ‘आर्सेनिक अल्बम’च्या गोळ्यांचे वाटप केले होते. परिसरात कुणीही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले, तर संपूर्ण इमारत सॅनिटाईझ करण्याचे काम त्यांनी केले होते. एखाद्या रुग्णाला तत्काळ उपचार मिळावेत, रुग्णालयात जागा मिळावी, अशा अनेक गोष्टींसाठी या ‘जिवलग’ने काम केले आहे. त्यांच्या या कामासाठी त्यांना अनेक ठिकाणी सन्मानितदेखील करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात तेथील रहिवाशांसाठी फार काही देता आले नसले, तरी त्यांना पाणी आणि बिस्किट्स देण्याची व्यवस्था केली होती.
 
 
 
कोरोना काळात अडचणीत सापडलेल्यांची मदत करतानाच ‘जिवलग मित्र परिवारा’ने ‘एमआयडीसी’मध्ये यंदाच्या वर्षी २५ वृक्षांची लागवड केली आहे. केवळ वृक्षांची लागवड करून ते थांबले नाही, तर त्यांनी त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही घेतली आहे. या ग्रुपमधील सदस्य नियमित त्याठिकाणी जातात. झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे, कधी झाडांना काठीचा आधार देणे, खतपाणी देणे अशी सर्व प्रकारची निगा ते राखतात. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली होती. अनेकांना ऑक्सिजन न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे प्राणवायू देणारी झाडे लावणे गरजेचे आहे, ही बाब या ‘जिवलग मित्र परिवारा’च्या लक्षात आली. त्यामुळेच त्यांनी ‘एमआयडीसी’ परिसरात यंदाच्या वर्षी २५ झाडे लावली आहेत. दरवर्षी ते वृक्षारोपण करणार आहेत, असे संजय यांनी सांगितले. डोंबिवलीतील पर्यावरणप्रेमी संजय चव्हाण व त्यांच्या सहकार्‍यांनी वृक्षप्रेम दाखवून समाजासमोर आदर्शच निर्माण केला आहे. पर्यावरणाची दूरदृष्टी असलेल्या अनेक पर्यावरणप्रेमी समुहांपैकी या समूहाने शहरात वृक्षांची नितांत गरज असल्याचे दाखवून देतानाच वातावरणातील ऑक्सिजनवाढीस प्रोत्साहन दिले आहे. चिमणीपासून अन्य पक्ष्यांना शहरापासून लांब न जाण्यासाठी दाखविलेले वृक्षप्रेम हे भविष्यात तरुणपिढीला आदर्शवत ठरेल. अशा या पर्यावरणप्रेमीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@