मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांच्या स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या गेल्या तीन वर्षांपासून नवीन कंत्राटदारांना देण्यात आलेलेच नसल्याचे समोर आले आहे. २०१९ मध्येच मुदत संपलेल्या कंत्राटदाराला दर सहा महिन्यांनी मुदतवाढ देऊन देऊन तीन वर्षे तेच तीन कंत्राटदार काम करत आहेत. मुंबई पालिकाका शाळांची स्वच्छता, देखभाल, विद्युत उपकारांची देखभाल ही कामे या कंत्राटदारांकडे आहेत. या सर्व कंत्राटदारांना मुदतवाढीबरोबरच त्यांना देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगर मिळून असलेल्या पालिकेच्या ३३८ शाळांच्या कामांची जबाबदारी या तीन कंत्राटदारांकडे आहे. २०१६-१९ य तीन वर्षांसाठी तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती आणि तीन वर्षांसाठी त्यांना २०९ कोटी रुपये देण्यात येणार होते. मार्च २०१९ मध्ये त्यांची मुदत संपली होती. तरीसुद्धा या कंत्राटदारांना २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या रकमेतही तब्बल १७० कोटींची वाढ होऊन ३७९ कोटी झाली आहे. तीन वर्षांपासून नवीन कंत्राटदारांची नियुक्ती न करता त्याच कंत्राटदारांवर का मेहेरनजर करण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित होतो आहे.