कलासक्त वास्तुविशारद

    02-Mar-2022   
Total Views |

Jayesh Apte
 
 
 
वास्तुविशारद व दिग्दर्शक अशा अनवट वाटेवरचा प्रवासी असलेल्या जयेश आपटे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर नजर टाकणारा हा लेख...
 
 
 
चरितार्थ चालविण्यासाठी व्यक्तीला आपल्या निवडलेल्या क्षेत्रात कार्य करावे लागत असते. मात्र, आपल्यातील कलागुणांना वाव देत कलेच्या क्षेत्रातदेखील आपला वेगळा ठसा उमटविण्याचे भाग्य काहींना मिळते, नव्हे, तर ते आपल्या अथक प्रयत्नांतून त्या भाग्यास आपल्या जवळ आणत असतात. नाशिकच्या स्थापत्त्य आणि कलाक्षेत्रात चौफेर मुशाफिरी करणारे एक नाव म्हणजे जयेश आपटे. ते सध्या एका नामांकित आर्किटेक्चर (वास्तुविशारद) महाविद्यालयात विभागप्रमुख या पदावर कार्यरत आहेत. जयेश यांचा आजवरचा वास्तुविशारद व दिग्दर्शक असा अनवट वाटेवरचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरला आहे. निर्मितीचा ध्यास आणि त्यासाठी आवश्यक असणारे कलागुण हे भांडवल यशस्वी कलाकृतीचा गमक असतं, हे जयेश यांच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकली असता प्रकर्षाने जाणवतं.
 
 
 
२००१ मध्ये पुणे विद्यापीठातून ‘आर्किटेक्चर’ केल्यानंतर 'पैस' या अत्यंत अर्थपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या नावाने स्थापत्त्यकलेच्या क्षेत्रात दोनशेहून अधिक उल्लेखनीय प्रकल्प जयेश यांनी यशस्वी केले. अर्थात जयेश यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ‘स्थापत्यशास्त्र’ हा केवळ एक भाग. लहानपणापासूनच नाटक, चित्रपट, लोककला यांचीही त्यांना आवड. बालनाट्यातून कामही केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाही आपण आपल्या आवडीच्या कलाक्षेत्रात काहीतरी करावे, असे जयेशना वाटत होते. परंतु, आर्थिक गणित सांभाळत व्यवसायाकडे लक्ष देणे आवश्यक होते. वयाच्या पस्तिशीच्या टप्प्यावर मात्र आयुष्यात येऊ घातलेला तोचतोपणा टाळण्यासाठी त्यांनी आपल्यातल्या कलाकाराला न्याय द्यायचं ठरवलं व अनेक सकस चित्रपट मराठी रसिकांना देणार्‍या उमेश कुलकर्णींकडे चित्रपट निर्मितीचे धडे घेतले. अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी असणार्‍या जयेशने ५०हून अधिक एकांकिका आणि नाटकातून प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय आणि नेपथ्यकार म्हणून काम केले.
 
 
 
कुठल्याही कलाकाराचं यश हे त्यांच्या जाणीवसंपन्नतेत, विषयांच्या अभ्यासपूर्ण मांडणीत असतं, हे सूत्र घेऊन जयेश अनेक दर्जेदार व उत्तमोत्तम कलाकृतींची नाशिकमध्ये निर्मिती करत आहेत. ’द मिथ’, ’जास्वंद’, ’धगड’सारख्या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या लघुपटांनी रसिकांची मनं जिंकली. नाटक, साहित्य, मालिका, चित्रपट, ‘शॉर्ट फिल्म्स’, ‘वेबसिरीज’ अशा विविध माध्यमांत नाशिकची सांस्कृतिक चळवळ अग्रेसर आहे व नवनवीन प्रयोग सातत्याने होत आहेत. केवळ प्रादेशिक नव्हे, तर जागतिक पातळीवर दखल घेतली जाणारी कलाकृती दादासाहेब फाळकेंच्या नाशिकमध्ये निर्माण व्हावी, यासाठी जयेशसारखे रंगकर्मी व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्नशील आहेत व त्यांना यशदेखील मिळत आहे. जयेश यांनी दिग्दर्शित केलेला ’द मिथ’ हा लघुपट पाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास निवडला गेला, तर ‘जास्वंद’ची देखील निवड झाली.
 
 
 
गोदावरी नदी, कुंभमेळा हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय. इथल्या संस्कृतीचे दर्शन कलाकृतीतून सादर करावे हे कलाकारांचे स्वप्न असते. यातूनच ‘कान्स’ या मानाच्या महोत्सवात निवड झालेल्या ’कुंभ’ चित्रपटासाठी जयेश यांनी दिग्दर्शन साहाय्य केले. ’आर्टिझन’ या भारतीय कलांवर आधारित नावाजलेल्या व नाशिकमधील पहिल्या असणार्‍या ‘वेबसेरीज’ची निर्मिती देखील त्यांनी केली. मात्र, हे इतकेच नाही, तर ’उपमुखम’ या त्यांच्या लघुपटाने जागतिक पातळीवर नाशिकचे नाव मोठे केले. वाडा-मोखाडा भागातील ‘बोहाडा’ हा प्रकार जयेश यांनी बघितला व त्यातून ‘उपमुखम’ची निर्मिती झाली. गावात परतून आलेल्या एका आधुनिक मुलाकडून होणार्‍या आदिवासी संस्कृती, पारंपरिक लोकनृत्य आणि लोककला यांची उकल, त्यातून होणार्‍या मानवी संस्कृतीच्या आकलनाचे दर्शन घडविणारा हा लघुपट वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. ’डॉक्युशॉट’ हा नवा कलाप्रकार हाताळणार्‍या ‘उपमुखम’ला व दिग्दर्शक म्हणून जयेशला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नाशिक व बृहन्मुंबई पोलिसांच्या ‘निर्भया’ पथकासाठी त्यांनी साकारलेल्या ‘निर्भया गीता’चे सर्वत्र कौतुक झाले आहे.
 
 
 
कलाक्षेत्राचा डोळसपणे पाठपुरावा करत शहरातील तरुण कलाकारांना संधी मिळण्यासाठी झटणारे जयेश आपटे हे नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक ठळक नाव आहे. ’अक्षरबाग’ या मराठी पुस्तक अभिवाचनाच्या त्यांनी राबवलेल्या संकल्पनेचे नाशिक, पुणे, मुंबईच नव्हे, तर दुबईतदेखील प्रयोग झाले. ‘तुझी चित्रभाषा अनोखी आहे,’ अशी प्रतिक्रिया मिळवणार्‍या जयेश यांनी ’अन्वेष’ या लघुपटातून स्थापत्त्य कलेच्या क्षेत्रातील आपल्या गुरूला मानवंदना देण्याचा त्यांनी आगळा प्रयत्न केलेला आहे. लता मंगेशकर, आशा भोसलेंकडून त्यांच्या प्रकल्पांना शुभेच्छा मिळाल्या आहेत. “जिद्द, सातत्य हे कुठल्याही क्षेत्रात यशासाठी आवश्यक असतात. त्यात कधीही तडजोड करू नये, जे उत्तम आहे मनाला भिडतंय ते प्रामाणिकपणे मांडण्याची आपली तयारी हवी,”असं जयेश आवर्जून सांगतात. त्यांच्या पुढील प्रवासासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

प्रवर देशपांडे

दै. मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. एम. ए  (राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध), एलएल. बी. पर्यंत शिक्षण, राष्ट्रीय नेमबाज, नाशिक येथे विविध महाविद्यालयात Resource Person आणि अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. JNU-दिल्ली येथील इंडिया फ्युचर ग्रुपशी संलग्न, याचबरोबर नाशिक येथे विविध दैनिकात पत्रकारितेचा सात वर्षांचा अनुभव.