‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’च्या नैतिक शिक्षण उपक्रमाची भरारी...

    02-Mar-2022
Total Views |

Sanskruti1
 
 

श्रीमद्रामायण आणि महाभारत हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांच्यामध्ये चित्रित अनेक प्रसंग आपल्यासमोर उत्तुंग जीवनाचे आदर्श उभे करतात. आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. ते सुसंस्कृत, स्वाभिमानी तसेच देशभक्त नागरिक बनावेत, यासाठी ‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने प्रयत्न करते, त्याविषयी...
 
 
 
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय मातीतील संस्कारांची आणि महापुरुषांची ओळख करून देण्याच्या हेतूने ‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’ मागील १८ वर्षांपासून कार्यरत आहे. श्रीमद्रामायण, महाभारत आणि क्रांतिकारकांच्या जीवनातील वेचक प्रसंग निवडून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत एकूण १६ संस्कारक्षम कथापुस्तिका तयार करण्यात आल्या आह़ेत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला हा उपक्रम देशातील महाराष्ट्र गोवा, केरळ आणि राजस्थान या चार राज्यांमध्ये सुरू आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये याचे कानडी, तेलुगू, मल्याळम आणि तामिळ भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. तसेच प. बंगालमध्ये बंगाली, ओडिशामध्ये उडिया, भाषेत भाषांतर करण्याचे कार्यही पूर्ण झाले आहे. देशातील ९०० शाळांमध्ये सुरू असलेला हा उपक्रम भारतातील प्रत्येक राज्यात त्यांच्या त्यांच्या मातृभाषेत सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू झाला. देशभर टाळेबंदी जाहीर झाली. सर्वकाही ठप्प झाले. या काळात अनेक आस्थापने, व्यवसाय कोलमडून पडले. पण अशा विपरित स्थितीतही प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हतबल झाले नाहीत. ज्यावेळी एक दरवाजा बंद होतो, तेव्हा यशाचे दुसरे दार किलकिले होते. त्याचाच प्रत्यय प्रतिष्ठानला आला. संकटापुढे हार न मानता याचे संधीत रुपांतर करायचे, अशा जिद्दीने प्रतिष्ठानने संपूर्ण उपक्रम ‘डिजिटल’ स्वरूपात तयार केला. कथापुस्तिकांमध्ये असलेल्या सर्व ३५० संस्कारक्षम गोष्टी दृक्श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आल्या. शाळांमध्ये विद्यार्थी येऊ शकत नव्हते, अशा काळात या विद्यार्थ्यांना दर आठवड्याला एका गोष्टीची ‘लिंक’ पाठविण्याची व्यवस्था केली. याचा परिणाम म्हणजे, मागील वर्षी ३० हजार आणि यंदा ४७ हजार, ५०० विद्यार्थी यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी कथा ऐकल्या, पाहिल्या आणि त्या पाठ्यक्रमावर आधारित ऑनलाईन परीक्षाही दिली. त्यानंतर कोरोनाचा दुसरी, तिसरी लाट आली. पुन्हा एकदा सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले. अनेक संस्थांचे उपक्रम स्थगित करण्यात आले. याही स्थितीत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संकटालाच संधीत रुपांतरित करत कार्यविस्ताराच्या योजना आखल्या.
 
 
 
प्रतिष्ठानच्या सर्व गोष्टी तसेच अन्य पूरक उपक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, त्याचप्रमाणे देशाच्या कोणत्याही भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहजतेने सहभागी होता यावे म्हणून प्रतिष्ठानचे स्वत:चे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यासोबतच उपक्रमाशी निगडित शेकडो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनेलवर सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. एका बाजूला तंत्रज्ञानाचा आधार घेत उपक्रमाचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे, तर दुसरीकडे नवीन शहरात हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. अशाच प्रयत्नांतून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बापूराव येवला यांच्याशी फोनवर बोलणे झाले. कोणताही व्यक्तिगत परिचय नसतानाही त्यांनी आपल्या शाळा समूहातील २७ शाळांच्या शिक्षकांची कार्यशाळा नाशिक शहरात आयोजित केली. यावेळी उपस्थित शिक्षकांसमोर बोलताना प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर म्हणाले, “आपण इच्छेने अथवा अनिच्छेने शिक्षक झाला असाल, पण एकदा या क्षेत्रात आल्यावर शिक्षक म्हणून आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.” आपला मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी एक दृष्टांत सांगितला, “एका शहरात इमारतीचे बांधकाम सुरू असते, वाटेने जाणारा एक पांथस्त उत्सुकतेने तिथे काम करणार्‍या मजुराला विचारतो, “दादा, तुम्ही हे काय काम करीत आहात?” तो मजूर म्हणतो, “काय सांगू साहेब, नशिबाचे भोग, दुसरे काय. गेल्या जन्माचे पाप म्हणून हे काम माझ्या नशिबी आले.” पांथस्थ त्याला नमस्कार करून पुढे जातो आणि दुसर्‍या मजुराला हाच प्रश्न विचारतो. तो म्हणतो, “साहेब, दुसरे काय करणार, पापी पेट का सवाल हैं। काम नाही केले, तर मुलाबाळांचे पोट कसे भरणार!” पांथस्थ त्यालाही नमस्कार करून पुढे जातो आणि तिसर्‍या मजुराला हाच प्रश्न विचारतो. तो म्हणतो, “साहेब, या ठिकाणी एक भव्य मंदिर होत आहे. त्या मंदिराचे दगड कोरण्याचे काम मला मिळाले आहे. मी खरोखरच भाग्यवान आहे. एका मंदिराच्या निर्माणात सहभागी होण्याची संधी परमेश्वराने मला दिली आहे. एका अर्थाने मी या मंदिराचा शिल्पकार आहे, निर्माता आहे.”
 
 
Sanskruti2
 
 
 
हे उदाहरण देत सालेकर उपस्थित शिक्षकांना म्हणाले, “आपण शिक्षक म्हणून कार्य करताना कोणत्या भूमिकेतून कार्य करीत आहोत, केवळ पोटापाण्याची सोय म्हणून या पेशाकडे बघतो की, या राष्ट्राचे शिल्पकार म्हणून हा देश घडवित आहोत. आपण आपली दृष्टी बदलण्याची गरज आहे. ‘नजर बदल गयी तो नजारे बदल जाते हैं, कश्ती का रुख बदला, तो किनारे बदल जाते हैं।” प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर यांच्या ओजस्वी मार्गदर्शनातून आज नाशिकमधील ४० शाळा उपक्रमांत सहभागी होत आहेत. एका बाजूला नवीन ठिकाणी उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करत आहे, तर दुसर्‍या बाजूला नवनवीन उपक्रमांची सुरुवात करत आपल्या कार्याचा परीघ वाढविण्याचा प्रयत्न प्रतिष्ठान करत आहे. आपल्या राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, संभाजीनगर अशा अनेक शहरांमध्ये झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढत आहे. अशा वस्त्यांमध्ये धर्मविरोधी, देशविरोधी शक्ती हात पाय पसरत आहेत. अशा स्थितीत त्या-त्या वस्त्यांमध्ये देशाभिमान, धर्माभिमान जागविणारी केंद्रे सुरू करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. वय वर्षे ५ ते १० या वयोगटासाठी अशा १०० वस्त्यांमध्ये आनंद केंद्राचा शुभारंभ करण्याचे ठरले आहे. अशा केंद्रांमध्ये सेवाभावी वृत्तीने शिक्षक म्हणून कार्य करू इच्छिणार्‍यांसाठी अलीकडेच भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी संकुलात दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ७० शिक्षकांची पहिली तुकडी सहभागी झाली. दोन दिवसीय अभ्यास वर्गात एकूण दहा सत्रे झाली. त्या सत्रांमध्ये खेळ कसे घ्यावेत, कथाकथन कौशल्ये, पालक संपर्काचे तंत्र, श्लोक-स्तोत्र शिकविण्यासाठी लागणारी उच्चारांची शुद्धता आणि स्पष्टता अशा विविध विषयांवर सुप्रसिद्ध समुपदेशक उज्ज्वला शेट्ये, प्रा. विजया वैशंपायन, शीतल निकम यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गानंतर १५ सेवा वस्त्यांमध्ये ‘आनंद केंद्रे’ सुरू झाली आहेत.
 
 
 
शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करण्याचे काम करीत असतानाच त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही प्रबोधन व्हावे, या हेतूने ‘कुटुंब प्रबोधन केंद्रे’ सुरू करण्यात आली आहेत. शाळांच्या सहकार्याने पालकांना एकत्र करून आपले कुटुंब सुखी-समाधानी, सुसंस्कृत होण्यासाठी काय करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाते. आज देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या शक्तींच्या माध्यमातून होत असल्याचे दिसते. अशावेळी हा देश एकसंध राहावा, भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या हेतूने देशातील सज्जन शक्तीला सक्रिय करण्याचे प्रयत्न प्रतिष्ठान करीत आहे. देशातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात येत आहे.
 
 
- अस्मिता आपटे