पाणथळी : जैवविविधतेचा खजिना

    02-Mar-2022   
Total Views |

wetlands
 
 
ठाणे खाडी परिसरात नुकतेच रामसर स्थळाच्या यादीकरिता दहा किमीपर्यंतचा भाग ‘हरित प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने जैवविविधतेचा खजिना असलेल्या पाणथळींविषयी...
मुंबई महापालिकेच्या विकास खात्याने अलीकडेच एक धक्कादायक नियमाची घोषणा केली. ठाणे खाडीतील पक्ष्यांच्या निर्भयस्थानासाठी (Bird-Sanctuary) ठाणे खाडी रामसर पाणथळी म्हणून बनविण्याकरिता दहा किमी त्रिज्येच्या परिघात ‘हरित प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर झाले आहे. या नियमामुळे परिघातल्या बांधकामाच्या प्रकल्पांना बाधा येऊ शकते. या भागात विकासाची बांधकामे करण्याकरिता संदर्भित विकासकांनी वनविभागाची मान्यता घेणे जरुरी आहे.
ठाणे खाडीतील पक्ष्यांच्या निर्भयस्थानाचे वैश्विक महत्त्व
या पाणथळीच्या निर्भयस्थानावर अनेक पक्षी-प्राणी निर्भयपणे वावरत असतात. हे फ्लेमिंगोसारखे पक्षी लांबून येतात आणि ठाणे खाडीच्या निर्भयस्थानाला भेट देतात. या १६.९ चौ.मी. क्षेत्रात अनेकविध पक्षी-प्राण्यांचे अस्तित्व असते. वर्षातील काही विशिष्ट काळामध्ये ही जैवविविधता म्हणजे पक्षी-प्राण्यांचे व वनस्पती असणे वा बागडणे आपल्या दृष्टीस पडते. मध्य आशियातील हे पाणथळीचे ठिकाण जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानतात. या पाणथळीला रामसर यादीमध्ये आणण्याकरिता महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न होत आहेत. विविध पक्ष्यांमध्ये लेसर व ग्रेटर फ्लेमिंगो, काळ्या डोक्याचे इलिस, निळे व हिरवे शॅन्क, मार्श व कल्लु सॅन्डपायपर, तपकिरी डोक्याचे गल, विस्कर, गलबिल्ड, लिटल व कास्पियन टेम, पांढर्‍या पोटाची लिटल गिधाडे, युरेशियन मार्श हॅरिअर इत्यादी पक्षी, सरपटणारे प्राणी, मधमाशा व इनव्हर्टीब्रेटस, वास्प, मॉथ, स्पायडर व बेंथिक ऑगनिझम इत्यादी विविध प्राणी तेथे बागडण्यासाठी येतात.
या हरित दहा किमी क्षेत्राच्या मर्यादा
उपनगरीय भागातील - कुर्ला (एल), चेंबूर (एम पूर्व व एम पश्चिम), भांडुप (एस), मुलुंड (टी), घाटकोपर (एन पूर्व), कांदिवली, बोरिवली, अंधेरी पूर्व, वांद्रे पूर्व.
शहरातील भाग - दादर (जी उत्तर), माटुंगा (एफ उत्तर), परळ (एफ दक्षिण)
या भागातील बांधकामावर बंदी आणलेली नाही. पण, ते नियमबद्ध केले जाईल.
पाणथळांची रामसर स्थळे
दि. २ फेब्रुवारी, १९७१ मधील कॅस्पियन समुद्राच्या तीरावर भरलेल्या इराणच्या रामसर शहरातील पाणथळीवरच्या महत्त्वाच्या अशा आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये १४२ देशांच्या उपस्थितीत ‘रामसर स्थळे’ म्हणून जगातील सर्व देशानी नियमाने वागून पाणथळींचे संरक्षण करावे, हा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वाच्या रामसर यादीत प्रत्येक देशांनी त्यांची एक तरी महत्त्वाची पाणथळी यादीत आणावी. रामसर (राजधानी सख्तसार म्हणून ओळखला जाणारा) हा भूभाग अल्बोर्झ पर्वत आणि कॅस्पियन समुद्र यांच्यामध्ये वसला आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर-मध्यमेश्वर स्थळाला अलीकडेच रामसर स्थळाची मान्यता देण्यात आली आहे. तसेच, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला रामसर दर्जा घोषित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे सरकारकडून रामसर दर्जासाठी ठाणे खाडी क्षेत्रासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
पाणथळी म्हणजे काय?
दि. २ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्राने ठरविल्याप्रमाणे सर्व ठिकाणी ‘जागतिक पाणथळ दिन’ साजरा करण्यात आला. पाणथळी ही निसर्गनिर्मित असून तेथे मुख्य विविध वनस्पती व प्राण्यांचे वास्तव्य आढळून येते. पाणथळी म्हणजे काय, ते तिच्या व्याख्येवरून आपण माहिती करून घेऊया. या पाणथळीमध्ये ताजे जल किंवा समुद्री पाणी असते व ते किनार्‍यावरील पर्यावरणीय प्रणालीमध्ये सामावलेले असते. तेथे सर्व तळी, नद्या, भूमिगत जलसाठा, दलदल आणि चिखल, ओले गवत, कुजलेला झाडपाला, भातखाचरे, वाळवंटातील जलसाठे, नदीमुखातील जलस्थान (estuary), नदीवरील त्रिकोणी भूजप्रदेश (deltas), आणि लाटांमुळे जमलेले पाणी, खारफुटी, पोवळ्यांचे खडक (coral reef), मानवनिर्मित मत्यस्य तलाव, जलसाठे व मिठागरे इत्यादींचा पण त्यात समावेश झालेला आहे.
या सर्व पाणथळींच्या विशेष वास्तू निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आहेत आणि त्यातून त्या पाणथळी वापरणार्‍यांना विविध लाभ मिळतात. पाणथळींचे अस्तित्व भौगोलिकदृष्ट्या पृथ्वीच्या गोलार्धात फक्त सहा टक्केच आहे. तरी त्यावर ४० टक्के वनस्पतींचे व प्राणीमात्रांचे गुजराण व विविध जाती व प्रजातींचा जीव सांभाळला जातो. या पाणथळींच्या जैविक वा प्रतिजैविक उत्थानातून मानवाचे अन्नधान्य, आरोग्य व उपजीविका संभाळल्या जातात. म्हणून या पाणथळी मानवी कल्याणासाठी, पर्यावरण टिकविण्यासाठी, वातावरण बदलासाठी, जलप्रकोपावेळी आणि जलशुद्धीकरिता मदत करणार्‍या आणि महत्त्वाच्या समजल्या जातात. या पाणथळींवर विश्वातील अब्जाहून जास्त मानवी समाज म्हणजे एकूण जनांच्या एक अष्टमांश जणांचे उपजीविकेचे साधन आहे. समुद्र किनार्‍यावरील कार्बनचा ताबा घेणार्‍या पाणथळी उष्णकटीबद्धीय वनविभागापेक्षा ५५ पटीच्या वेगानी कार्बनचे शोषण करतात. या पाणथळींच्या शेतीत काढलेले तांदळाचे पीक साडेतीन अब्ज लोकांचे महत्त्वाचे अन्न म्हणून निर्माण होते.
संकटग्रस्त पाणथळी
पर्यावरणाचे संरक्षण करणार्‍या पाणथळींची संख्या फार कमी व्हायला लागली आहे आणि त्यांच्यावर गदा आली आहे. सध्याचे हे संकट मानवी प्रजेच्या सततच्या वाढीमुळे, मानवाकडील न टिकणारे उद्योग, निर्मिती व बेसुमार विकासाची तांत्रिक साधने आणि संकटात टाकणारे वातावरणातील बदल त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरतात.
पाणथळी नष्ट होण्याचा वेग जंगले नष्ट होण्याच्या वेगापेक्षा तिपटीने अधिक आहे आणि पृथ्वीतलावरच्या पाणथळी फारच संकटग्रस्त आहेत. गेल्या ५० वर्षांत म्हणजे १९७० सालापासून जगातील ३५ टक्के पाणथळी नष्ट झाल्या आहेत. या पाणथळी नष्ट होण्यासाठी मानवी विकासकामातील जलनाले, शेतीकरिता भराव घालणे आणि बांधकाम करणे, प्रदूषण होणे, वाढलेली मच्छीमारी, नैसर्गिक साधनांचा अती वापर, काही प्राणीजातींचे त्यावर आक्रमण आणि वातावरणीय बदल इत्यादी संकटे पाणथळींच्या जीवावर उठली आहेत. हे पाणथळींवरचे नष्टचर्य काही गैरसमजुतीतून तयार झाले आहे. अनेकांना वाटते की, ही पाणथळी म्हणजे टाकाऊ म्हणजे कचर्‍यासारखी आहेत. परंतु, ती मानवांना उपजीविकेची साधने म्हणून, कामधंदा म्हणून आणि महत्त्वाची पर्यावरणयुक्त ठरणारी अशी आहेत. मानवाने या खोट्या व गैरसमजुतीच्या वलयाचा त्याग करायला हवा.
पाणथळींच्या व्याख्येमध्ये सरकारने बदल करून पाणथळींच्या अस्तित्वावर गदा आणली आहे. यातून त्यांचा र्‍हासच होणार आहे. केंद्र सरकारने २०१६ साली ‘पाणथळ संरक्षण नियमावली’च्या मसुद्यात बदल केला. त्यानुसार मानवनिर्मित जलाशय, सिंचन, पिण्याचे पाणी आणि मनोरंजनासाठी तयार केलेली जलाशये, नद्यांची पात्रे, खारजमिनी, मिठागरे, भातखाचरे, आदींना पाणथळींच्या व्याख्येतून वगळण्यात आले आहे. २०१७ मध्ये ही सुधारित नियमावली लागू करण्यात आली. त्यामुळे नैसर्गिक व मानवनिर्मित अशी विभागणी झाली. परंतु, ही विभागणी पाणथळींच्या भविष्यातील संवर्धनाच्या दृष्टीने घातक ठरणार आहे. ‘नॅशनल वेटलॅन्ड अ‍ॅटलास’प्रमाणे मुंबईत ४९५ पाणथळी आहेत. परंतु, सरकारने न्यायालयासमोर सादर केलेल्या यादीत केवळ आठ आणि मुंबई उपनगरातील ४८ पाणथळींना मान्यता देण्यात आली आहे. या नवीन नियमावलीमुळे पाणथळींच्या संरक्षणाकरिता सरकार उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाणथळी वातावरण बदलांच्या संकटांना कसे तोंड देतात?
पाणथळी ही वातावरण बदलांवर तड देणारी जशी काही नैसर्गिक यंत्रेच आहेत. या पाणथळी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे शोषण करतात व वातावरणातील उष्णतेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात तसेच प्रदूषणही कमी करतात. म्हणून त्यांना ‘पृथ्वीवरची मूत्रपिंड’ म्हणूनही ओळखले जाते. या पाणथळी वनांनी शोषलेल्या एकूण कर्बाच्या दुप्पट कर्ब शोषण्याच्या ताकदीच्या असतात. पण, या पाणथळी कोणी नष्ट केल्या, तर ती शोषण केलेली मोठाली कर्बव्याप्ती बाहेर फेकून देण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. पाणथळी या पूरनियंत्रणासाठी, दुष्काळाच्यावेळी, तुफानाच्या वेळी व त्सुनामीच्यावेळी फार मोलाची भूमिका बजावतात. तज्ज्ञांनी या पाणथळींच्या फायद्याच्या गोष्टी अपरिपक्व लोकांना समजावून सांगाव्यात. अज्ञान लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता हा मुद्दा जाणकारांनी राष्ट्रीय व वैश्विक पातळीवर उचलून धरायला हवा. त्यातूनच या पाणथळींचे नष्टचर्य संपेल.
राज्यातील इतर संभाव्य जागा
जायकवाडी पक्षी अभयारण्य, माहुल शिवडीची खाडी, उजनी जलाशय, वेंगुर्ला रॉक्स या पाणथळीच्या रामसर स्थळांच्या राज्यातील काही संभाव्य जागा म्हणता येतील. पण, आता सरकारने पाणथळींसाठीच्या नवीन नियमावलीचा पुनर्विचार करावा. घरे बांधण्यासाठी भूखंड मिळत नाहीत म्हणून पाणथळींचा नाश करु नये.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.