स्वतःशी संवाद साधणारी कविता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2022   
Total Views |

Kulupband
 
 
 
अगदी कमी व नेमक्या शब्दांत मानवी भावना व्यक्त करणारा कलाप्रकार म्हणजेच कविता. जगासह देशात, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने धुमाकूळ घातलेला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लावलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सारेच क्रियाकलाप महिनोन्महिने बंद होते. त्यामुळे एरवी कामानिमित्त बाहेर जाणारे, बाहेर राहणारे सगळेच घरातच राहिले आणि सगळ्यांचेच जगणे कुलुपबंद झाले. कोरोना, ‘लॉकडाऊन’चा, निर्बंधांचा सार्‍यांनाच कमालीचा त्रास झाला. पण, त्या काळातही कित्येकांना स्वतःचा शोध घेता आला, तर अनेकांच्या प्रतिभेला पंख लागले. कित्येकांना स्वतःशी संवाद साधता आला, अनेकांना तो कागदावर उतरवता आला. त्यापैकीच एक म्हणजे आशिष निनगुरकर.
 
 
 
आशिष निनगुरकरची ओळख कवी, लेखक, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक, लघुपट निर्माता, अभिनेता अशी बहुआयामी आहे. कोरोना ‘लॉकडाऊन’च्या काळात आशिषने ‘संक्रमण’, ‘नियम’, ‘कुलुपबंद’ या प्रबोधनात्मक लघुपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. त्याचवेळी त्याने त्याची कविताही लिहिली आणि त्याच कवितासंग्रहाचे ‘कुलुपबंद’ नावाने कवी अशोक बागवे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. आशिषने यात अनेक विषय हाताळलेले आहेत. त्यात ‘कुलुपबंद’ नावाने कोरोना काळातील परिस्थितीचे यथार्थ चित्रण आहे, तर कोरोना योद्ध्यांच्या कर्तव्य आणि कर्तृत्वाला सलाम करणारी कविताही आहे. याव्यतिरिक्त उर्वरित कविता वेगवेगळ्या मानवी भावभावनांचे-नातेसंबंधांचे दर्शन घडवणार्‍या, प्रेरणा देणार्‍या, जीवनाचे तत्त्व उलगडून सांगणार्‍या आहेत.
 
 
 
विद्यार्थी परीक्षा देतात, पण बर्‍याचदा निकाल अपेक्षेप्रमाणे लागत नाही. त्यावेळी विद्यार्थ्यांना तर वाईट वाटतेच, पण बोलणारे इतर लोकही असतातच. मात्र, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना एक परीक्षा म्हणजे शेवट नाही, हे सांगणे गरजेचे असते, तेच काम आशिषची निकाल शीर्षकाची कविता करते.
 
 
 
जीवन असते एक परीक्षा
सत्याने लढायचं असतं
प्रामाणिक कष्ट करून
हे गणित सोडवायचं असतं...
  
या शब्दांतून आशिष विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना दिसतो.
माणसाच्या आयुष्यात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग येतात. पण, सुखाचे क्षण लवकर विसरतात, तर दुःखाचे क्षण बराच काळपर्यंत स्मरणात राहतात. त्या परिस्थितीत आपले म्हणवणारेही आपले उरत नाहीत. तरीही त्यामुळे आपण थांबायला नको, हेच आशिष पणती शीर्षकाच्या कवितेतून,
 
 
बदल हवा असतो आयुष्यात
जे झाले ते नशिबात असेल
आपण आपला लढा द्यायचा
हार मानून कसे आता जमेल...
 
या शब्दांत सांगतो.
याचबरोबर स्त्रियांवर स्त्री म्हणून होणार्‍या अन्यायाला ‘रोज हेच घडतंय’ कवितेतून शब्दबद्ध केले आहे, तर ‘भूकंप’ शीर्षकाच्या कवितेतून चक्रीवादळाने, अतिवृष्टीने झालेली वाताहत भूकंपाप्रमाणेच आयुष्य उद्ध्वस्त करून जाते, हे सांगते. पण, याच कवितांच्या पुढे ‘भरारी’ शीर्षकाच्या कवितेत,
 
 
कधी माघार घ्यायची नाही
न थांबता कार्यरत राहायचं
जीवनाचा हा सुखद प्रवास
आनंदानं सर करत जायचं...
 
या शब्दांत जगण्याची उमेद मिळत राहते. अशा अनेक कवितांचा गुच्छ म्हणजेच ‘कुलुपबंद’ हा आशिष निनगुरकरचा कवितासंग्रह. ‘कुलुपबंद’ कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ उत्तम संदेश देणारे आणि वाईटानंतर चांगले होतेच हे सांगणारे आहे.
 
 
 
पुस्तकाचे नाव : कुलुपबंद
कवी : आशिष निनगुरकर
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठसंख्या : ८८
मूल्य : १७५/-
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@