एमसीएने मुंबई पोलिसांचे थकवले १४.८२ कोटी

पोलिसांच्या ३५ स्मरणपत्रांना केराची टोपली

    19-Mar-2022
Total Views |

MCA
मुंबई : "मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मुंबई पोलिसांचे १४.८२ कोटी रुपये थकविले आहेत. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या ३५ स्मरणपत्रांना केराची टोपली दाखविली आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही मुंबई पोलीस थकबाकी पैसे वसूल करण्यासाठी स्वारस्य घेत नाही. तर थकबाकीदार एमसीएला पुन्हा पुन्हा नवीन क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा उपलब्ध करत आहेत. आधी थकबाकी वसूल केल्यानंतरच क्रिकेट सामन्यास सुरक्षा द्यावी." अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांना नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे.
 
 
मुंबई पोलिस एमसीए क्रिकेट सामन्यासाठी सुरक्षा पुरवतात. मुंबईतील क्रिकेट सामन्यांसाठी शुल्क आकारले जाते. विविध सामन्यांसाठी आकारलेले १४.८२ कोटी रुपये थकीत असून मुंबई पोलिसांनी थकबाकीची रक्कम वसूल करण्यासाठी एमसीएला ३५ स्मरणपत्रे पाठविली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई पोलिसांनी दिली.
 
 
मुंबई पोलिसांनी गेल्या ८ वर्षातील विविध क्रिकेट सामन्याबद्दल माहिती दिली. या सामन्यांमध्ये वर्ष २०१३मध्ये संपन्न झालेला महिला क्रिकेट विश्वचषक, वर्ष २०१६चा विश्वचषक टी -२०, वर्ष २०१६मधील कसोटी सामने, २०१७ आणि वर्ष २०१८मध्ये खेळले गेलेली आयपीएल आणि एकदिवसीय सामन्यांचे १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपये एमसीएने अद्याप भरलेले नाहीत. एमसीएने गेल्या ८ वर्षात फक्त २०१८च्या आयपीएल क्रिकेट सामन्यासाठी आकारलेले १.४० कोटीचे शुल्क प्रामाणिकपणे अदा केले आहे. मुंबई पोलिसांनी दावा केला आहे की आतापर्यंत मुंबई पोलिसांनी एमसीएच्या अध्यक्षांना ३५ स्मरणपत्रे पाठवली आहेत. तर या थकबाकी रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे.
 
 
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत झालेल्या क्रिकेट सामन्यासाठी घेतलेल्या सुरक्षा अंतर्गत शुल्क अद्याप आकारलेले गेले नाही कारण किती शुल्क आकारले जावे यासाठी महाराष्ट्र सरकारने अद्याप आदेश जारी केलेला नाही. मुंबई पोलिसांनी याबाबत गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना ९ वेळा पत्रव्यवहार केला आहे पण ढिम्म गृह खाते प्रतिसाद देत नाही. मी याबाबत पत्रव्यवहार करत असून मुंबई पोलिसांनी अद्यापही ठोस कारवाई न केल्याने एमसीए मुंबई पोलिसांना गांभीर्याने घेत नाही.
 
 
अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य अधिकारी वर्गास पत्र पाठवून मागणी केली आहे की एमसीएकडून १४.८२82 कोटी थकबाकी वसूल न होइपर्यंत कोठल्याही क्रिकेट सामन्याला सुरक्षा न देणे आणि थकबाकी वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करावी.