व्लादिमीर पुतीनचा शेवटचा जुगार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2022   
Total Views |
 
 
putin
 
 
युक्रेनमध्ये राष्ट्रभावना नसल्यामुळे अवघ्या काही दिवसांत तो शरण येईल आणि युक्रेनियन लोक रशियन सैन्याचे स्वागत करतील, हा पुतीन यांचा अंदाज पूर्णपणे चुकला. कदाचित या युद्धाला पुतीन यांच्या मनातील असुरक्षितता कारणीभूत असावी.
 
युक्रेनमधील युद्धाला लवकरच तीन आठवडे पूर्ण होतील. युक्रेन ‘नाटो’ गटात सहभागी होणार नाही, असे वारंवार सांगूनही रशिया युद्ध थांबवायला तयार नाही. या युद्धामध्ये रशियाचे प्रचंड नुकसान होत आहे. काही अंदाजांनुसार रशियाकडे आणखी केवळ दहा दिवस लढता येईल, एवढाच दारुगोळा शिल्लक आहे. एवढ्या काळात रशिया संपूर्ण युक्रेनवर विजय मिळवणे अशक्य आहे. या युद्धाचे भवितव्य चीन काय भूमिका घेतो; आंतरराष्ट्रीय निर्बंधांची पर्वा न करता रशियाशी किती प्रमाणात व्यापार चालू ठेवतो आणि किती शस्त्रास्त्रं पुरवतो, यावर अवलंबून आहे. या युद्धामुळे अमेरिका आणि युरोपीय देश अनपेक्षितरित्या जवळ आले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत अशी भावना वाढीस लागली होती की, युरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि अन्य संपन्न देशांना व्यापार आणि गुंतवणुकीसाठी रशिया आणि चीन महत्त्वाचे आहेत. पण, स्वतः स्वतःचे संरक्षण करण्याऐवजी अमेरिकेने ती जबाबदारी उचलावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. युक्रेनमधील युद्धामुळे युरोपीय देशांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटले. अनेक देशांनी स्वतःच्या संरक्षण खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याचा निर्णय घेतला. रशियाविरूद्ध आजवरचे सगळ्यात कठोर निर्बंध लादण्यासाठी युरोपीय देश अमेरिकेसोबत आले.
दि. ७ मे, २००० पासून रशियाचे अध्यक्ष म्हणून आणि २००८-२०१२ पर्यंत पंतप्रधान या नात्याने रशियाची सत्ता पुतीन यांच्याच हातात राहिली. त्यानंतर ते पुन्हा रशियाचे अध्यक्ष झाले. त्यांची सध्याची टर्म २०२४ मध्ये संपत असून, त्यानंतरही सहा वर्षांच्या आणखी दोन वेळा सत्तेवर राहाण्याचा मार्ग त्यांनी घटनादुरुस्तीद्वारे मोकळा केला होता, असे झाल्यास पुतीन रशियावर सुमारे २५ वर्षं राज्य करणार्‍या स्टॅलिनला मागे टाकतील. पण, युक्रेनवरील आक्रमणाचा जुगार पुतीन का खेळले, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
सोव्हिएत रशियात १९८०च्या दशकात साम्यवादी व्यवस्थेविरूद्ध आक्रोश तीव्र झाला आणि लोकांच्या भावनांची दखल घेऊन तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्ट्रॉइका’ म्हणजेच पुनर्बांधणी आणि ‘ग्लासनोत’ म्हणजेच पारदर्शक व्यवस्था आणण्याची घोषणा केल्या. त्याचीच परिणिती पुढे साम्यवादी गट आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनात झाली. त्यावेळी पुतीन रशियात नव्हते. ‘केजीबी एजंट’ म्हणून ते पूर्व जर्मनीमध्ये तैनात होते. तिथे ड्रेस्डेन शहरात ते जर्मन गुप्तचर पोलिसांच्या (स्टासी) कार्यालयात होते. डिसेंबर १९८९ मध्ये पूर्व जर्मनीत उठाव होऊन सामान्य लोकांनी या इमारतींना वेढा घातला. पुतीन यांनी सोव्हिएत सरकारकडे मदत मागितली, पण ती आलीच नाही. ही घटना त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. पुतीन साम्यवादी व्यवस्थेचा दु:स्वास करत असले तरी त्यांच्या दृष्टीने सोव्हिएत रशियाचे विघटन आणि त्यातही स्लाविक वंशिय युक्रेनचे स्वातंत्र्य हा रशियन आत्मसन्मानावर केलेला हल्ला होता.
त्यांचे मत आहे की, सोव्हिएत रशियाने त्यावेळेस कच खाल्ली नसती, तर त्याचे विघटन झाले नसते. विघटन झाल्यावर शीतयुद्धाची भीती संपुष्टात आली असली तरीही अमेरिकेने विश्वासघाताने ‘नाटो’चा विस्तार चालू ठेवला. पहिले वॉर्सा कराराने बांधलेले पूर्व युरोपीय देश आणि त्यानंतर सोव्हिएत रशियाचा भाग असलेले बाल्टिक देश, असे करत ‘नाटो’ युक्रेनच्या दाराशी येऊन पोहोचला. त्यावेळेस रशिया दुबळा असल्यामुळे पुतीन काही करू शकले नाहीत. आजही तेल, नैसर्गिक वायू, खनिज संपत्ती आणि शस्त्रांस्त्रांखेरीज रशियाकडे देण्यासारखे काही नाही, असे असले तरी पुतीन यांनी आपल्या मर्यादित ताकदीचे उपद्रवमूल्य वेळोवेळी अमेरिका आणि युरोपीय देशांना दाखवून दिले. २०१४ साली युक्रेनमधील क्रिमियावर आपला ऐतिहासिक हक्क सांगत त्यावर कब्जा करणे, डोनबास प्रांतातील फुटीरतावाद्यांचे स्वातंत्र्य मान्य करणे. २०१६ साली सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल असद यांच्या राजवटीला पाठिंबा देत त्यांच्याविरूद्ध तुर्की, सौदी, कतार आणि अन्य अरब राष्ट्रांच्या पाठिंब्यावर लढणार्‍या सैनिकांना पळता भुई थोडी करणे किंवा मग चीनशी जवळीक साधून पुतीन यांनी कायमच आपली दखल घ्यायला लावली. दरम्यानच्या काळात रशियाने ‘सायबर’ युद्ध, मर्यादित युद्ध आणि आता समुद्र तळाशी युद्ध, अशी नवनवीन शस्त्रास्त्रे आपल्या भात्यात जोडली. ‘सायबर’ युद्धतंत्रातही मोठी प्रगती साधली. पण, युक्रेनबाबत पुतीन यांचे गणित पूर्णतः चुकले.
युक्रेनमध्ये राष्ट्रभावना नसल्यामुळे अवघ्या काही दिवसांत तो शरण येईल आणि युक्रेनियन लोक रशियन सैन्याचे स्वागत करतील, हा पुतीन यांचा अंदाज पूर्णपणे चुकला. कदाचित या युद्धाला पुतीन यांच्या मनातील असुरक्षितता कारणीभूत असावी. इतिहासातील बराचसा काळ युक्रेन रशियन साम्राज्याचा आणि त्यानंतर सोव्हिएत रशियाचा भाग होता. बहुतांश युक्रेनियन स्लाविक वंशीय असून, सांस्कृतिकदृष्ट्या रशियाच्या जवळचे आहेत. युक्रेनच्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 30 वर्षांपैकी सुमारे निम्मा काळ युक्रेनमध्ये रशियावादी पक्ष निवडून येत होते. पण, ज्या आक्रमकपणे रशियाने २०१४ साली क्रिमिया आणि डोनबास प्रांतांचा लचका तोडला, त्यामुळे रशियन वंशाचे युक्रेनियन लोकही रशियाच्या विरोधात गेले. त्यानंतर गेली आठ वर्षं सातत्याने युक्रेनमध्ये रशियाविरोधी सरकार निवडून येत आहे. आजवर वंशवादी आणि नाझीवादी प्रवृत्तींना थारा देणार्‍या युक्रेनने वोल्दोमीर झेलेन्स्कीसारख्या ज्यू नेत्याला अध्यक्ष बनवले आहे. झेलेन्स्की यांनी रशियाचे आक्रमण झाले असताना देश सोडायला नकार दिला. एवढेच नव्हते, तर दररोज टेलिव्हिजनवर येऊन लोकांशी तसेच, जागतिक नेत्यांशी ते संवाद साधत असतात. त्यांच्या या धैर्यामुळे आज संपूर्ण युक्रेन झेलेन्स्कींच्या पाठी एकवटला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, वंशवाद आणि कुडमुड्या उद्योगपतींनी पोखरलेला देश ही युक्रेनची प्रतिमा मागे पडली आहे. सोव्हिएत रशियाचा भाग असणारा युक्रेन आपल्या पुढे जात आहे, हे सहन करणे पुतीन यांच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे या युद्धाच्या सुरुवातीला दिली गेलेली नाझीवादाचा बिमोड करणे किंवा युक्रेनच्या ‘नाटो’त सहभागाला प्रतिबंध करणे ही कारणे आता मागे पडली आहेत. आता युक्रेनचे युद्ध हा पुतीन यांच्या अहंकाराचा प्रश्न झाला आहे.
लष्करी ताकदीच्या बाबतीत युक्रेनची रशियाशी तुलनाही होऊ शकत नाही. रशियाला प्रतिकार करताना युक्रेनने एकदाही रशियाची सीमा ओलांडली नाही. पण, तरीही रशियाने युक्रेनमधील विध्वंस कायम ठेवला आहे. या युद्धाच्या सुरुवातीला रशिया युक्रेनच्या पूर्वेकडीलभागांवर हल्ला करत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून रशियाने आपल्या हल्ल्यांची व्याप्ती वाढवली असून, पश्चिम युक्रेनमधील युरोपीय महासंघाचे सदस्य असलेल्या पोलंडच्या सीमेवरही बॉम्बफेक करण्यात येत आहे. युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा आणि ‘इंटरनेट’ सेवा खंडित झाल्या असून, सामान्य लोकांना अन्न तसेच,पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. सुमारे २५ लाख लोकांनी युक्रेन सोडला असला तरी त्यांच्या मनातील राष्ट्रभावना आणखी तीव्र झाली आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या भीतीने सुमारे लाखभर रशियन लोक देश सोडून बाहेर पडले आहेत. हे युद्ध असेच सुरु राहिले, तर युक्रेनची सीरियासारखी अवस्था होईल. पण, रशियासाठीही त्यातून रक्तबंबाळ झाल्याशिवाय बाहेर पडणे अवघड होईल. २० वर्षांहून जास्त काळ रशियाची सत्ता हातात असलेल्या पुतीन यांच्यासाठी रशियाचा दुखावलेला स्वाभिमान परत मिळवण्याचे ध्येय हे सामान्य रशियन लोकांना या युद्धामुळे सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टांपेक्षा मोठे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@