नवी दिल्ली : काश्मीरमध्ये झालेल्या काश्मिरी हिंदू पंडितांच्या नरसंहारावर आधारित दिग्दर्शित विवेक अग्निहोत्री यांचा 'दि काश्मीर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या देशभर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे, कॉंग्रेसने यावर राजकारण सुरु केले असून अनेक ट्विट करत हा नरसंहार नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोष देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद ट्विट करत कॉंग्रेसची विकेट घेतली.
व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट केले की, "जेव्हा एखाद्याला 'आपण तळाशी चाललो आहोत, आणि फक्त इथूनच वर येऊ शकतो' असे वाटते, तेव्हा ते आणखी मार्ग शोधतात एक नवा नीचांक गाठण्यासाठी. त्यांनी पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या भावना दुखावण्याचा निर्णय घेतला आहे. 'दि काश्मीर फाईल्स' हा चित्रपट डोळे उघडणारा आहे. कदाचित, हे हिमनगाचे फक्त एक टोक आहे." असे म्हणत केरळ कॉंग्रेसच्या ट्विटला उत्तर दिले आहे.
केरळ काँग्रेसने काश्मिरी हिंदूंचा नरसंहार नाकारण्यासाठी आणि ९०च्या दशकात काश्मीरमधील जिहादी दहशतवाद्यांच्या कृत्यांचा निषेध करण्यासाठी अनेक ट्विट पोस्ट केल्यानंतर व्यंकटेश प्रसाद यांनी अशी प्रतिक्रिया दिली. काश्मिरी पंडित नरसंहाराची क्रूर आणि दुःखद माहिती मोठ्या पडद्यावर घेऊन येणाऱ्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाला प्रतिसाद म्हणून काँग्रेस पक्षाने एक ट्विट केले होते.
यामध्ये कॉंग्रेसने म्हंटले होते की, ज्यांनी काश्मिरी पंडितांना निशाना बनवले ते दहशतवादी होते. १९९० ते २००७ या १७ वर्षाच्या काळात दहशतवादी हल्ल्यात ३९९ पंडितांची हत्या झाली. याच काळात दहशतवाद्यांनी १५ हजार मुस्लिमांची हत्या केली होती. काश्मीर खोऱ्यातून काश्मीर पंडितांचे पलायन तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांच्या निर्देशावर झाले होते. ते रा. स्व. संघाच्या विचारसरणीचे होते," असे म्हणत नवा वाद निर्माण झाला होता. यावर सोशल मिडियावर अनेकांनी याचा विरोध केला आणि काही काळानंतर हे ट्विट हटवण्यात आले.