फडणवीस पुरून उरले!

    14-Mar-2022
Total Views |

fadanvis
 
 
मुंबई : बदल्यांबाबतचा अहवाल ‘लिक’ झाल्याप्रकरणात रविवारी पोलिसांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी केली. पोलिसांच्या पथकाकडून सुमारे दोन तास फडणवीस यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीचा भाजपकडून राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात आला. राज्यभरात ठिकठिकाणी फडणवीसांना आलेल्या नोटिसीची भाजपकडून होळी करण्यात आली. ही चौकशी संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली.
 
 
“राज्यात बदल्यांचा ‘महाघोटाळा’ झाला. या बदल्यांच्या घोटाळ्याची माहिती मी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिली. या विषयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले आहे. यात ‘सीबीआय’ चौकशी करीत आहे. महाघोटाळा का घडला, याची सरकार चौकशी करू शकत नाही. ‘महाघोटाळा’ अहवाल सरकारने सहा महिने दाबून ठेवला. मी तो बाहेर काढला नसता तर घोटाळा दाबला गेला असता. मला अचानक नोटीस पाठविण्याचे कारण सभागृहात मी केलेले आरोप व सरकारचे दाऊदशी असलेले संबंध हे आहे. मला विचारलेले प्रश्न व प्रश्नावली यात मोठी विसंगती होती. जणू मी गोपनीयता कायद्याचा भंग केला असाच पोलिसांचा माझ्यावर रोख होता. साक्षीदारांचा जबाब घेतात, तसे प्रश्न नव्हते. याउलट आरोपी व सहआरोपी केले जाईल, अशा पद्धतीचे प्रश्न होते. गोपनीय माहिती उघड केल्याचा नव्हे, तर ‘व्हीसल ब्लोअर प्रोटेक्शन कायदा’ माझ्यावर लागू व्हावा हेच मी पाोलिसांना सांगितले,” असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
पुढे ते म्हणाले की, “मी जबाबदार नेत्याप्रमाणे वागलो. हा अहवाल मी राज्य सरकारला कसा देऊ? त्यांनीच हा घोटाळा दाबला त्यांनी काय दिवे लावले असते? त्यामुळे तो अहवाल व कागदपत्रे जाहीर न करता मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. मी गोपनीय कागदपत्रे केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले ते जाहीर केले नाहीत. पण, मंत्री नवाब मलिक यांनी ते माध्यमांना दिले. त्यांना गोपनीय माहती उघड करण्याचा अधिकार नाही, तरीही त्यांनी हे काम केले. मी सरकारचे सर्व काळे कारनामे बाहेर काढणार आहे. सरकारच्या हाती काहीही लागले नाही. त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत,” असेही ते म्हणाले.
 
 
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी राज्यातील पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळी पत्रकार परिषदेेत केला होता. पैसे घेऊन पोलिसांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे बदल्या केल्या गेल्या, असा आरोप फडणवीसांनी केला होता. २६ मार्च, २०२१ रोजी राज्य गुप्त वार्ता विभागातील माहिती ‘लिक’ झाल्याच्या प्रकरणात पाच जणांविरोधात मुंबईतील ‘सायबर’ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर या प्रकरणात रविवारी फडणवीसांची चौकशी करण्यात आली.
 
 
मुंबई पोलिसांनी रविवारी ‘बीकेसी’ पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात फडणवीसांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांनी फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ बंगल्यातच चौकशी केली.