पुणे : "शिवसेना राज्यमंत्री रघुनाथ कुचिक या नराधमाकडून पुण्यातील एका मुलीचा बलात्कार करण्यात आला आणि नंतर गर्भपातही करण्यात आला. या सर्व गोष्टी समोर येऊन सुद्धा त्या पिडीत मुलीला न्याय मिळत नाही. यामुळे तिच्याकडून फेसबुकवर आत्महत्या करण्याबद्दल लिहिलं जातं. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी राज्य सरकारची असेल!", असे भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी एका व्हिडीओमार्फत रविवारी ठाकरे सरकारला सुनावले.
"पुण्यातील पिडीत मुलीवर झालेला बलात्कार आणि जबरदस्ती केलेल्या गर्भपाताबद्दल तिने समोर येऊ या आधीही सांगितले होते. याबद्दल हातात पुरावे असून सुद्धा आरोपीस बेल कसा मिळू शकतो. इतकेच नाही तर आता त्याच्याकडून पिडीतेला तक्रार मागे घेण्याबद्दल मानसिक त्रासही देण्यात येतोय. यास कंटाळून पिडीतेला स्वतःला आत्महत्या करण्याची वेळ आली आहे; याबाबत तिने फेसबुकवरही लिहिलं आहे.", असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
"तिने तिच्या जीवाचे काही बरे-वाईट केले तर पुणे पोलिसांइतकेच हे राज्यसरकार ही त्यास जबाबदार असेल. पुण्यातले पोलीस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, गृहमंत्री यांना फोन करून सुद्धा त्यांनी काही उत्तर दिले नाही. यावरून तुमच्यादृष्टीने महिलांच्या इज्जतीची किंमत काय आहे, हे आज महाराष्ट्राने पाहिलं आहे.", असे म्हणत चित्रा वाघ यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना आणि राज्य सरकारला पिडीतेचा जीव वाचवण्याची विनंती केली आहे.