मायावतींना न कळलेले आंबेडकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2022   
Total Views |

mayavati
 
 
"उत्तर प्रदेशातील नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या आकांच्या आदेशानुसार मीडियाने बसपशी जातीयवादी आणि घृणित वर्तन केले आणि आंबेडकरवादी बसप चळवळीचे नुकसान केले, हे काही लपलेले नाही. त्यामुळे बसप प्रवक्ते आता कोणत्याही प्रसारमाध्यमातील वाद-चर्चा कार्यक्रमाला जाणार नाहीत,” असे बसपच्या सर्वोसर्वा बहन मायावती यांनी नुकतेच जाहीर केले. जरा काही झाले की, महापुरुषांच्या नावाचा वापर करून आपले क्षुल्लक रडगाणे गायचे, हे नेते कधी थांबवणार आहेत? बसपच्या प्रवक्त्यांना प्रसारमाध्यमांनी जातीयवादी आणि घृणित वर्तन करून आंबेडकरवादी बसप चळवळीचे नुकसान केले, हा मायावतींचा आरोप. या आरोपाबद्दल लिहिण्याचे कारण की, मुळात आंबेडकरवादी चळवळीला बसप हे पालुपद जोडून आंबेडकरवादी चळवळीचा गट-तट निर्माण करण्याची प्रक्रिया देशभरात राबवली जाते. ती वर्गवारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला मारक आहे. अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरोधात मानवतावादी न्यायपूर्ण भूमिका मांडणारी, त्यासाठी संघर्ष करणारी आंबेडकरवादी चळवळ आहे. ‘तिलक, तराजू और तलवार’च्या नावाने जातीयवादी गळा काढणार्‍या मायावतींना बाबासाहेबांची मानवतावादी चळवळ फार पूर्वी समजलीही असेल. पण पुढे मायावतींसारख्या राजकारण्यांना राजकारणाच्या गर्तेत ही चळवळ म्हणजे फक्त मतांचे गणित मांडणारे क्रूर तंत्रच झाले. त्यामुळेच निवडणूक हरल्यावर मायावतींनी म्हटले की, प्रसारमाध्यमांनी जातीयवादी घृणित वर्तन केले. पण असे घृणित वर्तन, घृणित जातीयवाद होत असताना मायावती किंवा त्यांचा बसप का गप्प बसला? याचे कारण एकच आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लोकांचे भाविनक ‘ब्लॅकमेलिंग’ करणे. लोकांकडून सहानुभूती मिळवणे आणि प्रसारमाध्यमे किंवा इतर क्षेत्रांतील गैर मागासवर्गीयांना भीती दाखवणे की, तुम्ही आमच्या मनासारखे काही केले नाही तर तुम्हालाही घृणित जातीयवादी म्हणून वर्गवारी केली जाईल. उत्तर प्रदेश निवडणुकांचे निकाल पाहता मायावती आणि इतरही जातीपातीवर निवडणुकी लढवणार्‍यांनी शहाणे व्हावे आणि समजून घ्यावे की, मतदार राजा थोडा शहाणा झाला आहे. जातपात नव्हे, तर स्वहित आणि देशहित त्यालाही समजते.
 
                                             डफलीवाले डफली बजा...
 
 
अरे, त्यांची सत्ता असलेल्या राज्यात कुठे काही घडले, तर आपण बॅग भरायचो. तडक ते ठिकाण गाठायचो. ‘लाल सलाम’ स्वागताला असायचेच. मग आम्ही तिथे डफली वाजवायचो, गाणं गायचो. डफली वाजवून-वाजवून हात दुखले, कोकलून, बोंबलून, ओरडून घसा सुकायचा. वाटायचे, सत्ता उलथेल, पण तेच परत सत्तेत आले. 5 पैकी 4 राज्यांत? तू गप रे. तुला कळत नाही. अरे, आता तर आपले काम वाढले. आपल्याला डफली वाजवत आरडाओरडा कुठे करावा लागायचा? अरे, जिथे भाजपची सत्ता असेल तिथे. मी तर घाबरलेलो ‘एक्झिट पोल’ पाहून. न जाणो भाजप हरायचो. दुसरे पक्ष सत्तेत आले, तर त्यांच्याविरोधात आंदोलन करायला आपल्याला पैसे कसे मिळतील? अरे, आपली रोजीरोटी गेली असती. आता कसे निवांत वाटते. पुन्हा आपला रोजगार सुरू झाला. बघ, महाराष्ट्रात 2014 ते 2019 आपला सुगीचा काळ होता. सकाळी उठलं की, या मोर्चात जायचं, त्या मोर्चात जायचं. तोंडाने फक्त मनुवादी, बामणशाही, पेशवाई म्हणत राहायचं बस्स... पण 2019 पासून सगळं बंद झालं. लोक कोरोनाने, दहशतीने मेली, ओबीसी आरक्षण गेलं, मराठा आरक्षणाचं पण तसंच. पण इतकं सगळं होऊनही कुठूनही आपल्याला मागणी आली नाही की, ‘या रे, डफली वाजवून गाणी गायची आहेत.’ हाथसरला, लखीमपूरला आणि शाहीन बागला काय ‘डिमांड’ होती. शेतकरी आंदोलनावेळी पण छान होतं. अरे, पण आपण तर गाण्यात महामानवांचे म्हणजे शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतो आणि भगतसिंगांचे नाव घ्यायचे असेसुद्धा आपल्याला सांगितले जाते. मग या थोरामोठ्यांचं नाव घेऊन आपण असं करतो, हे चूक वाटतं. अरे, त्यात काय इतकं? आपले नेते बघ. शाहू-फुले-आंबेडकर यांसारख्या दैवतांची नाव घेऊन खुर्ची मिळवतात. आपण तर फक्त नुसती रोटी मिळवतो आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर एक फोटो मिळवतो. नाही... नाही. थांब चुकतोस. हे सगळे करून आपण बाबासाहेबांनी दिलेला समाजजागृती आणि देशहिताचा मंत्र विसरतो. बाबासाहेब तर देशाचे हित, कल्याण सर्वप्रथम मानायचे! येड्या गप. भाषणबाजी बंद कर. डफली तयार ठेव. हो, मनुवादी, मूलनिवासी, संविधानविरोधी, हुकूमशाही, हिटलर आणि आणि असहिष्णुता हे शब्द पण पाठ कर समजलं. ते पाच पैकी चार ठिकाणी आलेत!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@