आवड जोपासणारे दुर्गाराज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Mar-2022   
Total Views |

Durgaraj Joshi
 
 
जगण्यासाठी कष्ट करतानाच गाण्याची, संगीताची आवड जोपासणारे, नोकरी करणारे, नंतर व्यवसायात पदार्पण करणारे आणि ‘ओंकार कला मंडळा’ची स्थापना करणारे दुर्गाराज जोशी...
 
 
 
डोंबिवलीकर असलेल्या दुर्गाराज जोशी यांची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने स्वकमाई करीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कधी नोकरी, तर कधी व्यवसाय करीत त्यांनी अर्थाजनासोबत आपली आवडदेखील जोपासली आहे. त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया... दुर्गाराज यांचा जन्म देवगड येथील गोवळ येथे झाला. त्यांचे बालपण गोवळ येथेच गेले. शालेय शिक्षण त्यांनी गोवळ, त्यानंतर पाटगाव आणि मुटाट येथे पूर्ण केले. त्याकाळी अकरावीला बोर्ड होते. बोर्डाची परीक्षा ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. पण महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे तर घरची परिस्थिती हालाखीची होती. पण त्यांचे शिक्षक यांनी त्यांच्यातील गुण हेरले होते. त्यांनी दुर्गाराज यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. किर्लोस्करवाडी सांगली येथील महाविद्यालयात दुर्गाराज यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांच्या शिक्षकानेच त्यांचा शैक्षणिक शुल्काचा भार हलका केला होता. शिक्षकांमुळे दुर्गाराज यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. प्रि डिग्री आणि पदवीचे प्रथम वर्ष त्यांनी सांगली येथे पूर्ण केले. सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालय येथून त्यांनी बी.एस्सी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केले. हे सगळे शिक्षण त्यांनी बारीकसारीक कामे करीतच पूर्ण केले. वृत्तपत्र आणून देणे, घरगुती कामे करणे, रेशन आणून देणे अशी कामे करून ते आपल्या खानावळीचा खर्च भागवित होते. त्यावेळी ६५ रुपये महिना त्यांना खानावळीचा खर्च होता. हा खर्च ते जेमतेम कसाबसा भागवित होते. त्यांचे काकादेखील दरमहा दहा-दहा रुपये देत होते. ‘युजीसी’नेही त्यांना मदत केली. दुर्गाराज यांना पैजा लावण्याचा छंद होता.
 
 
 
जगण्यासाठी पैजा ते लावत असत. एखादे गाव या जिल्ह्यात आहे, त्यावर एखादा म्हणाला नाही, तर ते लगेचच पैज लावतोस का, असे सांगत. त्यातून त्यांना एक किंवा दोन रुपये मिळायाचे. गाणी ऐकण्याचादेखील त्यांना छंद होता त्यातूनच त्यांना संगीताचीही आवड निर्माण झाली. त्यांचे काका हार्मोनियम वाजवत असत. त्यामुळे त्यांच्या घरात संगीत थोडेफार होतेच. दुर्गाराज यांचे वडील शेती करीत होते. दुर्गाराज घरात भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांना चार बहिणी आहेत. कुटुंबांची आणि बहिणीच्या लग्नाची सर्व जबाबदारी दुर्गाराज यांच्यावरच होती. दुर्गाराज यांची आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी दात्यांचा हात होता. ‘बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई’ संस्थेचे ‘सुप्रिटेंडट’ नाबार हे सावंतवाडी तालुक्यातील सात हायस्कूलवर निरीक्षक होते. त्यांनी दुर्गाराज यांना एका नवीन शाळेत हायस्कूलवर मुख्याध्यापक म्हणून नोकरी दिली. १९७५-७७ या दोन वर्षात या शाळेत त्यांनी काम केले. शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे-दोडामार्ग या शाळेत ते कार्यरत होते. या शाळेचा त्यांनी चांगला कायापालट केला होता. त्यांच्या काकांनी कोहिनूर मिल येथे ‘क्वालिटी कंट्रोल’ विभागात नोकरी मिळवून दिली. तीन वर्षे त्यांनी त्याठिकाणी काम केले. जगण्यासाठी आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांचा संघर्ष कायम सुरूच होता. त्यामुळे सतत नवीन नवीन ठिकाणी नोकरीचा शोध ते घेत असत. दोन वेळा त्यांना ‘सेंच्युरी मिल्स’ आणि ‘बॉम्बे डाईंग’ येथून नोकरीच्या संधी आल्या होत्या. दोन्ही ठिकाणी त्यांना १०० रुपयांनी अधिक वेतन मिळणार होते. पण ‘कोहिनूर मिल’नेच त्यांना दोन्ही वर्ष १००-१०० रुपये वेतनवाढ करून दिले होती. त्यामुळे नवीन संधी त्यांनी स्वीकारली नाही. ‘अंबिका शेतमिल्स’ याठिकाणाहून त्यांना नोकरीची संधी आली.
 
 
 
‘अंबिका शेतमिल्स’ने त्यांना एकदम ४०० रुपयांनी पगार वाढवून देण्याची ‘ऑफर’ दिली. इतकी रक्कम ‘कोहिनूर’ला देणे शक्य नसल्याने त्यांना सेवेतून मुक्त होण्याची संधी दिली. सहा वर्षे ‘अंबिका शेतमिल्स’ आणि सात वर्षे ‘खटाव मिल्स’मध्ये त्यांनी नोकरी केली. १९९७ ला ‘खटाव मिल’ बंद पडली. दत्ता सामंत यांच्या संपामुळे कापड व्यवसायाला घरघर लागली. दुर्गाराज यांच्यावर कौटुंबिक जबाबदारीमुळे कर्जाचा डोंगर होता. त्यात नोकरीही गेली. त्यामुळे त्यांच्या पायाखालाची जमीनच सरकली होती. डोंबिवलीतील ‘कस्तुरी प्लाझा’ या मोक्याच्या ठिकाणी त्यांच्या सासुरवाडीची जागा होती. ती जागा त्यांनी व्यवसायासाठी द्याल का, अशी सासर्‍यांना विचारणा केली. भाडे न घेता त्यांनी जागा दुर्गाराज यांना दिली. त्या जागेत त्यांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू असतानाच त्यांनी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. पाच वर्षे त्यांनी भाडे न देता हॉटेल व्यवसाय केला. ती जागा त्यांच्या मेहुण्यांनी विकत घेतली. दुर्गाराज मेहुण्याला भाडे देत होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी ती जागा विकत घेतली. सुरुवातीला वडापावच्या व्यवसायापासून त्यांनी सुरूवात केली. हळूहळू त्यांनी जेवण देण्यापर्यंत हॉटेलचा विस्तार वाढविला. २०१६ पासून त्यांनी पर्यटन क्षेत्रात पावलं रोवायला सुरूवात केली होती. २०२० पर्यंत हॉटेल व्यवसाय सुरू होता. तो व्यवसाय बंद करून त्यांनी पर्यटन कार्यालय तिथे सुरू केले. १९८३ ला त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलांनी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. संगीताची आवड असल्याने त्यांनी ‘ओंकार कला मंडळा’ची स्थापना केली. या माध्यमातून ते अनेक टूर काढत होते. संस्थेच्या माध्यमातून डोंबिवलीकरांसाठी खूप कार्यक्रम त्यांनी केले. संस्थेला एका कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना आमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमात त्यांचा सत्कारही केला होता. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै.‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@